डॉ. यशपाल गोगटे
मला वेड लागले प्रेमाचे किंवा कहो ना प्यार है अशा गाण्याच्या ओळी कानावर पडल्यानंतर आपल्या
डोळ्यासमोर हातात हात धरून बागेत फिरणारे लैला मजनू येतात. परंतु या प्रेमाचे वेड लावण्यामागे कारणीभूत
असलेली हार्मोन्स मात्र सर्वसामान्यांना माहिती नसतात. पण प्रेमात पडतात म्हणजे काय?
प्रेमात पडलेल्या युगुलांच्या शरीरात होणारा केमिकल लोचा अर्थात हार्मोन्स बदल.
प्रेमाची भावना आणि जोडीने राहणे ही भावना मुख्यतः सस्तन प्राणी व पक्षी यांच्यातच आढळते. सर्व प्रकारच्या प्रेमाचे मूळ हे मातृत्वाच्या भावनेतूनच निर्माण होते. जन्मलेल्या बाळांसाठी आपोआपच आईचा पान्हा फुटतो. या क्रियेला milk let down reflex असे म्हणतात आणि याकरता जवाबदार असलेले हार्मोन म्हणजे ओक्सिटोसिन
हे होय. पुढे जाऊन सर्व प्रकारच्या प्रेम भावना निर्माण होतात त्या या ओक्सिटोसिनच्या कमी जास्त होणाऱ्या
प्रमाणामुळे. मेंदूच्या तळाशी वाटाण्याच्या आकाराच्या पिट्युटरी ग्रंथीतून हे हार्मोन तयार होते. पिट्युटरी ग्रंथीतून
निर्माण होणाऱ्या ओक्सिटोसिन चा जोडीदार हार्मोन म्हणजे वॅसोप्रेसीन (vasopressin). याच बरोबर कार्यरत
असणारी हार्मोन्सची दुसरी जोडगोळी ही सेरोटोनिन - डोपामिनची (serotonin- dopamine). मेंदूत तयार होणाऱ्या या हार्मोन्सचे कार्यही कमी लेखता येणार नाही.
या संपूर्ण व्यवस्थेला सक्रिय ठेवण्याकरता ऍड्रिनल ग्रंथीतून निर्माण होणारे कॉर्टिसॉल (cortisol) व जननग्रंथीतून निर्माण होणारे टेस्टोस्टेरॉनही (testosterone) तेवढेच जवाबदार ठरते.
अर्थात शरीरातील संपूर्ण हार्मोनव्यवस्थाही प्रेमा साठी तत्परच असते.
खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन्स डे हा एक प्रेमाचा उत्सव म्हणूनच साजरा केला जातो. शास्त्रीय दृष्ट्या प्रेम हे तीन प्रकारे विभाजित केले जाऊ शकते- मातृप्रेम, प्रणय (रोमँटिक लव्ह ) व बंधू-मित्र प्रेम.
त्यानुसार वरील उल्लेखित हार्मोन्स वेगवेगळ्या प्रेम प्रकारात सक्रिय होत असतात. मातृप्रेमासाठी गरजेचे हार्मोन हे ओक्सिटोसिन आहे. बाळंतपणाच्या कळांपासून ते दूध येण्यापर्यंत सर्वच कार्यांसाठी हे हार्मोन जवाबदार असते
बंधू-मित्र प्रेम हे ऑक्सिटोसिन व डोपामिन यावर अवलंबून असते. यात जिव्हाळा, आपुलकी व विश्वास अधिक असतो.
या बंधू- मित्र प्रेमाचा अतिरेक म्हणजे प्रत्येक वेळेस फेसबुकवर टाकलेल्या पोस्टना मिळणाऱ्या लाईक्स मोजणे. त्या अधिक असल्यास शरीरात डोपामिनचे प्रमाण वाढते. अधीनते (addiction) साठी जवाबदार डोपामिन हे हार्मोन आहे. त्यामुळेच दारू, सिगारेट व तंबाखू सारखे फेसबुक- व्हाट्सअप चे देखील व्यसन लागू शकते.
प्रणय अर्थात रोमँटिक लव्ह ही भावना हार्मोनच्या दृष्टिकोनातून जटिल प्रकारात मोडते. या प्रेमाची सुरवात ही
ओक्सिटोसिनमुळेच होते, या बरोबरच कॉर्टिसॉल, सेरोटोनिन व टेस्टोस्टेरॉन हे देखील सक्रिय होतात. हे हार्मोन्स या सुरवातीच्या काळातीलअनिश्चितता, उत्सुकता, असुरक्षितता अश्या संमिश्र भावना निर्माण करतात.
थोडक्यात धडधड वाढते ठोक्यात अशी काहीशी अवस्था अनुभवाला येते.
पुढे जाऊन हे प्रेम खुलले व त्याचे रूपांतर सहजीवनाच्या आकर्षणात झाले कि अनियमितता तयार करणारे कॉर्टिसॉल हे हार्मोन कमी होत जाते व ओक्सिटोसिन व डोपामिनचे प्रमाण वाढत जाते. स्टेबल रिलेशनचा हा काळ असतो व बरेच वेळा याचेच रूपांतर विवाहात होते. त्यामुळे सुरवातीच्या काळातील प्रेमात - पप्पी लव्ह मध्ये व स्टेबल रिलेशनमधील फरक जाणून योग्य तो निर्णय घेणे आवश्यक
असते हे मुख्यतः तरुण पिढीने लक्षात घ्यायला हवे.
शरीरातील ओक्सिटोसिनचे प्रमाण संतुलित असल्यास प्रेमाचे
रूपांतर आयुष्यभराच्या जोडीदारांमध्ये होते व त्यांचे सहजीवन सफल झालेले आढळते.
प्रेमाच्या विरुद्ध असलेले राग, क्रोध अथवा हिंसा या भावनांमागे देखील हार्मोन्सच जवाबदार असतात. Obsessive love व possessiveness हे देखील या हार्मोन्सच्या अतिरेकामुळे होतात. त्यामुळे कुठलेही नाते जोडतांना व तोडतांना सारासार विचार करणे गरजेचे असते. काही वेळेस आततायीपणाने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात.
(लेखक हार्मोन तज्ज्ञ आहेत.)