इंटरनेटची उपलब्धता आणि वेब कनेक्शनमुळे पॉर्न कंटेट तरूणांपर्यंत पोहोचणं हे अधिकच सोपं झालं आहे. तासनतास एकाच जागी बसून विशिष्ट प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी पॉर्न मोठ्या प्रमाणावर लोकांकडून पाहिले जातात. पण यामुळे फक्त नात्यांवरच परिणाम होत नाही तर आपल्या वर्तनावरही गंभीर परिणाम घडून येतो. पॉर्न पाहिल्याने वयात येणाऱ्या आणि तरुण मुलांच्या मानसिक तसंच शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या एका अभ्यासानुसार पॉर्न पाहणारे लोक आपल्या सेक्स लाईफचा चांगला आनंद घेऊ शकत नाहीत. इतकंच नाही तर पोर्नोग्राफी कंटेट पुरूषांमध्ये इरेक्टाईल डिसफंक्सन वाढण्यासही कारणीभूत ठरू शकते.
पॉर्नमधील गोष्टी कितपत वास्तविक असतात?
पॉर्नच्या बघण्याच्या सवयीबाबत लैंगिक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात , ''पॉर्नच्या माध्यमातून जे काही पाहिलं जातं ते कृत्रिम आणि अतिरंजित असतं. पॉर्नमध्ये काम करणारे पोर्नस्टार त्यांच्या वैयक्तिक जीवनातही अशा प्रकारचा सेक्स करत नाही. उदा. सिनेमात अनेकदा एक हिरो ८ ते १० अनेक गुंडाना मारताना दाखवला जातो. प्रत्यक्षात मात्र एक व्यक्ती एवढ्या लोकांचा एकट्यानं सामना करू शकत नाही. करमणुकीसाठी ही कलाकृती तयार केली जाते. त्याचप्रमाणे पोर्नसुद्धा करमणुकीसाठी तयार करण्यात येत असून ते आभासी आहेत. त्यात वास्तवदर्शी असे काहीच नाही. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, स्वतःकडून किंवा जोडीदाराकडून त्याप्रकारच्या अपेक्षा करू नयेत. मुख्य म्हणजे ''पॉर्न व्हिडीओमध्ये अनेकदा जे संबंध दाखवले जातात. ते प्रत्यक्षात घडत नसून तसं भासवलं जातं. हावभाव, हालचाली, प्रचंड प्रमाणात उत्तेजना कृत्रिम असतात. कारण त्यांना व्हिडीओ तयार करण्यासाठी अशा प्रकारच्या सूचना दिल्या जात असतात. एकाचवेळी ३, ४ कॅमेरे लावले जातात. प्रत्यक्षातील संबंध अर्धा मिनिट असेल तरी वेगवेगळ्या अँगलनं तो बराच वेळ सुरू असल्याचं दाखवलं जातं.''
पॉर्न अतिप्रमाणात बघण्याचे साईड इफेक्टस
१. पॉर्न बघणाऱ्या माणसाला ते पाहण्याचं व्यसन लागल्याने आपण जे पाहतो ते खरंच आहे असं मानून खऱ्या आयुष्यातही पार्टनरकडून तो पॉर्नस्टार प्रमाणे अपेक्षा ठेवतो. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो.
२. अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीमुळे वास्तविक जीवनात नुकसान होऊ शकतं. तज्ज्ञांच्या मते अनेक पुरूषांसह महिलाही आपल्या पार्टनरकडून पोर्नमधील पात्रांप्रमाणे दिसणं, हावभाव, इंद्रिय तशीच असायला हवीत अशी अपेक्षा करतात.
३. पॉर्न पाहून पार्टनरसह तुलना केल्यानं स्वतःचं सेक्स लाईफ खराब होण्याची शक्यता असते.
४. तरूण मुलामुलींना पॉर्न पाहिल्यानंतर आपली फिगर, अवयवांबद्दल न्यूनगंड वाटतो. इंद्रीय पॉर्नमध्ये दाखवल्याप्रमाणेच असायला हवेत तरच पार्टनर आकर्षित होईल, असा समज निर्माण होतो. या वाईट सवयीचं व्यसन लागण्याची शक्यता असते.
नियंत्रण कसं ठेवायचं?
पत्रकार आणि सोशल मीडिया तज्ज्ञ मुक्ता चैतन्य सांगतात, ''गेमिंग, दारूचे व्यसन असल्यास मेंदूवर जसा परिणाम होतो. त्याचप्रमाणे पॉर्न सतत पाहून मेंदूवर प्रभाव पडतो. डोपामाईन या मेंदूतील रसायनाला हॅप्पी हार्मोन असं म्हणतात. ज्यामुळे व्यक्तीला समाधान, आनंद मिळतो. पॉर्न ॲडिक्शनमध्येही हे रसायन मेंदूत स्त्रवल्याने आनंद मिळवण्यासाठी वारंवार त्याच प्रकारच्या गोष्टींवर व्यक्ती अवलंबून राहते.''
हे पाहणं टाळायचं कसं यासंदर्भात मुक्ता चैतन्य सांगतात, डिजिटल फूटप्रिंटच्या, सर्च हिस्ट्रीच्या आधारावर बोल्ड कंटेट सोशल मीडियावर समोर येत असतो. तुमच्या स्क्रिनवर सातत्यानं असा कंटेट समोर येत असेल तर हाईड करू शकता किंवा गुगल हिस्ट्री बंद करू शकता. कारण सेव्ह झालेल्या हिस्ट्रीवरून तुम्हाला काय दाखवायचं हे ठरत असतं. युट्यूबवरही असा कंटेट रिस्ट्रीक्ट करून तुम्ही असे व्हिडीओ पाहण्यावर नियंत्रण ठेवू शकता.
पालकांनी कशी काळजी घ्यायची?
मुक्ता चैतन्य सांगतात, ''अनेक पालक स्वतःच्या फोनमध्ये पॉर्न कंटेट पाहतात. त्यामुळे मुलांनाही ॲक्सेस मिळतो. पालक जर अशा प्रकारचा कंटेट पाहत असतील तर त्यांनी फोन हिस्ट्री बंद करायली हवी, जेणेकरून मुलांचा ॲक्सेस मिळणार नाही. याशिवाय फोनमध्ये एक वेगळे फोल्डर तयार करायला हवं. त्यात क्लिप्स, व्हिडीओज असतील आणि हे फोल्डर पूर्णपणे लॉक्ड असेल. यामुळे मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचणार नाहीत.'
''सध्या मुलांच्या फोनमध्ये पॅरेंटल कंट्रोल लिंक्स असतात. म्हणजेच गुगलची एक फॅमिली लिंक असते. ज्या माध्यमातून पालकांना आपल्या फोनशी मुलांचा फोन लिंक करता येऊ शकतो. जेणेकरून मुलं काय बघताहेत, काय सर्च करत आहेत. याची माहिती पालकांना मिळू शकते. विशिष्ट प्रकारचा मजकूर रिस्ट्रीक्टही करता येऊ शकतो. विशेष म्हणजे फॅमिली लिंक्सच्या आधारे मुलांचे फोन विशिष्ट वेळेला बंद करता येऊ शकतात. परिणामी पालक झोपल्यानंतर मुलं फोनमध्ये वाटेल ते पाहतात. असे प्रकार होण्यापासून रोखता येऊ शकतं. १३ वर्षांखालच्या मुलांसाठी या लिंक्सचा वापर करता येऊ शकतो. जेणेकरून कमी वयातील मुलांना वाईट मार्गाला जाण्यापासून रोखता येऊ शकतं.''