Lokmat Sakhi >Health >Adolescence > वयात येणाऱ्या मुलीशी मासिक पाळीसंदर्भात बोलायला बिचकता ? - बोला, ही शास्त्रीय माहिती सांगा..

वयात येणाऱ्या मुलीशी मासिक पाळीसंदर्भात बोलायला बिचकता ? - बोला, ही शास्त्रीय माहिती सांगा..

मासिक पाळी म्हणजे काहीतरी भयंकर, लाजीरवाणं असं मुलीला वाटू नये, वयात येताना काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या तर गैरसमज कमी होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 02:19 PM2021-04-29T14:19:34+5:302021-04-29T14:23:21+5:30

मासिक पाळी म्हणजे काहीतरी भयंकर, लाजीरवाणं असं मुलीला वाटू नये, वयात येताना काही गोष्टी स्पष्ट सांगितल्या तर गैरसमज कमी होतात.

Talking to your daughter about first period? speak up, share right information Narikaa | वयात येणाऱ्या मुलीशी मासिक पाळीसंदर्भात बोलायला बिचकता ? - बोला, ही शास्त्रीय माहिती सांगा..

वयात येणाऱ्या मुलीशी मासिक पाळीसंदर्भात बोलायला बिचकता ? - बोला, ही शास्त्रीय माहिती सांगा..

Highlights मासिक पाळी म्हणजे त्रास किंवा घाण नसून ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.’

डॉ. गौरी करंदीकर

‘‘मला पण जाऊ दे ना गं आई, मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत पण मी दादाच्या मित्र-मैत्रिणीबरोबर त्याच्या मित्राच्या घरी रत्नागिरीला खास आंबे खायला गेले होते’’ - रियाची रडारड सुरू होती.
‘‘मागच्या वर्षी ठीक होतं रिया, पण आता तुला मी पाठवणार नाही’’ आईनंसुद्धा जोर धरला होता.
‘‘का बरं पाठवणार नाहीस मला? सांग ना..’’ आता मात्र रियाच्या आईला, थोडं मोकळेपणी, काही स्पष्टपणे तिला सांगावस वाटलं.
ती म्हणाली, ‘‘चल आपण बागेत जाऊ, मग मी तुला सांगते.’’


‘हे बघ, किती सुंदर फूल आहे जास्वदींचं. आता तर किती रंगांमध्ये दिसतं. लाल, गुलाबी, पांढरं. सकाळच्या वेळी त्याची कळी असते, मग जसा दिवस मोठा होतो, तशी ती कळी उमलते. मग त्या फुलामध्ये पुनरुत्पादनाची क्षमता येते. तसच, तू आता दहा वर्षाची झाली आहेस. मी नुकताच तुझ्याबाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. रिया, तुला वाटत असेल ना, किती भराभर उंच होत आहेस. त्याचबरोबर स्तनाचीही वाढ होत आहे. हळुहळु कमरेचा भागही थोडा मोठा होत आहे. काखेमध्ये केसांची वाढ सुरु झाली आहे. हे सर्व बदल सुरु झाल्यावर एक-दीड वर्षानंतर सुरु होते ती म्हणजे मासिक पाळी’. मेन्स्ट्रुअल सायकल.‘
‘मासिक पाळी? माझ्या मैत्रिणीपण याविषयी  काहीतरी बोलत होत्या.’ - रिया गोंधळली होती.
‘‘बरोबर तेच आहे. सगळ्याच मुलींमध्ये होतं. प्रत्येक मुलीमध्ये जन्मत: स्त्रीबीजाचा साठा असतो आणि ते बीज फलित होण्याचे कार्य ह्या वयात सुरु झाल्यामुळे दर महिन्याला गर्भाशयात नवीन स्तर तयार होतो आणि गळुन पडतो आणि त्याच वेळेला चार-पाच दिवस रक्तस्त्राव होतो आणि मग मुलींमध्ये पुनरुत्पादनाची क्षमता येते.’’
‘‘मग मला आता खेळता येणार नाही का? दर महिन्याला हे असं होणारच का?’’ - रियाच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. 
‘छे, सुरुवातीचे काही वर्षे ही मासिक पाळी अनियमित असू शकते. पण मासिक पाळी म्हणजे त्रास किंवा घाण नसून ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.’
ज्या मुली स्थूल असतील किंवा खूप बारीक असतील त्या मुलींमध्ये ही अनियमितता टिकून राहते व पुढे समस्या होतात. त्यामुळे खाणं-पिणं कमी करायची जरूर नसते. मात्र त्याच्या प्रकारावर नियंत्रण ठेवणं तेवढंच महत्त्वाचं असतं. वाढत्या शरीराला पोषक अशा आहाराची आवश्यकता असते. कारण या दशकातले म्हणजे १०-२० वयामध्ये जे शरीरातले साठे  तयार होतात, त्याच्यावर आपल्या आयुष्यातले आरोग्य अवलंबून असते. जीवनसत्त्वयुक्त आहार तर मुलींमध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये महत्त्वाचा असतो. मात्र फास्टफुड, जंक फूडची सवय ही नेहमीच हानीकारक ठरते. त्यामुळे पौष्टिक आहार हे चांगल्या आरोग्यासाठी जरुरी आहे.
मात्र त्याच्याच बरोबर खेळणंही तितकच आवश्यक आहे. खेळणं, योगासनं, सूर्यनमस्कार ह्याच्याने आपल्या शरीरामध्ये घडत असलेले जे बदल आहेत ते योग्य रीतीने पार पाडतात व त्यातील संतुलन पाळले जाते. खेळपटू असलेल्या मुलींमध्ये क्वचितच मासिक पाळीच्या तक्रारी आढळतील. हं, मात्र अचानक सगळं खेळणं बंद केलं म्हणजे अंतस्त्रव ग्रंथीला संतुलित व्हायला वेळ लागतो. नियमित खेळाने शरीराला व्यायाम होतो. त्याचबरोबर मनाची शक्तीही वाढते. एकाग्रता वाढु शकते आणि आयुष्यात अशा माणसाची निर्णयशक्ती नेहमी चांगली होते. त्यामुळे नुसताच शारीरिक फायदा न होता व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा ह्याचा पुरेपुर फायदा होतो.’’


‘‘अरे वा काकू, तुम्ही तर रियासाठी छान अभ्यास केलाय ह्या विषयाचा’’ - तेवढ्यात तिथं आलेली दीपाली हसत हसत आईजवळ बसली.
  ‘‘मलाही कोणी ह्याबाबत माहिती दिली असती, तर पहिल्यांना मासिक पाळी सुरु झाली, तेव्हा मी इतकी भयभीत झाली नसते. मला तर अनेक महिने गेल्यानंतर शाळेतल्या कार्यक्रमात ह्या सगळ्यांची माहिती मिळाली. पण बरं का? रिया, आता जो स्त्राव सुरु होतो ना, तेव्हापासून स्वच्छतेला पण तेवढंच महत्त्व द्यायला हवं बरं का. त्या स्त्रावाला वास येत असल्यास, तुला खाज येत असल्यास किंवा लघवीला त्रस होत असल्यास आईला सांगायला हवे. बरोबर ना काकू ? आणि हो तुम्ही रियाला रत्नागिरीला पाठवा बरं का? तिला तुम्ही आता समजावून सांगितल आहेच आणि तसं तर मीही असणारं आहेच, आंब्याचा आस्वाद घ्यायला!’’

( लेखिका स्त्री रोग आणि प्रसूतीतज्ज्ञ आहेत.)

Web Title: Talking to your daughter about first period? speak up, share right information Narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य