नम्रता फडणीस
घटना एक (१९ मार्च) : पुण्यात अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आजोबा, वडील, सख्खा भाऊ अशा तीन पिढ्यांसह सख्ख्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. विशेष म्हणजे मुलींना शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ याविषयी समाजावून सांगत असताना हे प्रकरण समोर आले. घटना २ (२४ मार्च) : शिवाजीनगर परिसरातल्या एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सुरक्षा रक्षकानेच अत्याचार केल्याची घटना समोर आली. शाळेतील बाथरूममध्ये आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला. आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांच्या ओळखीचा होता. घटना ३ (१० एप्रिल) : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात १२ वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. मुलगी साफसफाईचे काम करते. या घटनेतही आरोपी पीडित कुटुंबीयांच्या ओळखीतला होता.
(Image : Google)
पुण्यात या तीन घटना एकापाठोपाठ एक समोर आल्या. ‘गुड टच बॅड टच’ ची माहिती देणाऱ्या समुपदेशनाच्या माध्यमातून समोर आलेल्या या केवळ काहीच घटना ! म्हणजे उघडकीला न येणाऱ्या अशा किती घटनांमध्ये मुली आणि मुलेही शारीरिक अत्याचार आणि घुसमटीचे शिकार होत असतील याची कल्पना करणं अजिबातच अशक्य नाही. कितीतरी निरागस, कोवळे जीव चार भिंतीत हुंदके देऊन आक्रोश करतात, पण त्यांचं ऐकणारं दुर्दैवाने कुणी नाही. ... घरातलं कुणी ऐकून घेत नाही म्हणून आता मुलं हेल्पलाईन किंवा समुपदेशकांकडे घाबरत घाबरत का होईना बोलण्यासाठी पुढं येऊ लागल्याने किमान या घटना उघडकीस तरी येऊ लागल्या आहेत. पुण्यातील ज्ञानदेवी संस्थेच्या हेल्पलाईनवर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ अखेर मुलांवरील शारीरिक शोषणासंबंधीचे २४२ कॉल्स तर, लैंंगिक शोषणाच्या २०५ कॉल्सची धक्कादायक नोंद झाली आहे. घर आणि शाळा ही दोनच ठिकाणे मुलींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. तिथंच त्यांना आपण सुरक्षितता देऊ शकत नाही, हे अत्यंत अस्वस्थ करणारं वास्तव आहे. मुलींबरोबरच मुलेही ‘नकोशा स्पर्शाची’ आणि अनेकदा शारीरिक अत्याचारांचे शिकार होऊ लागले आहेत. हे सारं टाळायचं तर आपल्या मुला-मुलींशी मोकळेपणाने बोलण्याची सवय निदान आपल्याला, आपल्या घराला तरी लावली पाहिजे.... ही सुरुवात करणं प्रत्येकाच्याच हाती आहे !
(Image : Google)
पुण्यातील ज्ञानदेवी हेल्पलाईनच्या प्रमुख डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे सांगतात..
कुटुंबांमध्ये अनेक लहान आणि अल्पवयीन मुलं दररोज नको त्या स्पर्शांना सामोरी जात आहेत. ६० टक्के अत्याचार हे वडिलांनीच केल्याचं दिसतं, हे अजून एक धक्कादायक वास्तव. बऱ्याच वेळेला आईचंच समुपदेशन करून तिला पोलीस स्टेशनपर्यंत न्यावं लागतं , पण ती येतेच असं नाही. मग तिच्या वतीने आम्हीच तक्रार दाखल करतो.
(लेखिका लोकमतच्या पुणे आवृत्तीत वार्ताहर आहेत.)