Join us   

वयात येणाऱ्या मुलांच्या सेक्शुअल आयडेंण्टीटीचे गंभीर प्रश्न, काय केलं तर मानसिक गोंधळ कमी होईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 2:02 PM

आपल्याला नक्की मुलगी आवडते, मुलगा आवडतो की दोघेही आवडतात हे न समजल्यामुळे मनाचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.

ठळक मुद्दे मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल आकर्षण आहे असं गृहीत धरलं जातं. पण आपलं मन आणि भावना मात्र वेगळ्याच हाका मारत असतात.आपल्याला भिन्न लिंगी, समलिंगी किंवा दोघांबद्दलही आकर्षण का वाटतंय हे पौंगडावस्थेत नीटसं समजत नाही.आपल्या लैंगिक ओळखीविषयी लाज बाळगू नका. आणि तुमच्या भावना, तुमची लैंगिक ओळख कुणीही बळजबरी बदलू शकत नाही.

सेक्शुअल ओरिएन्टेशन किंवा लैंगिक अभिमुखता म्हणजे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण. हे आकर्षण शारीरिक असू शकतं, भावनिक आणि लैंगिकही असू शकतं. या आकर्षणाचे काही पॅटर्न्स असतात.  १) भिन्न लिंगी (हेट्रो सेक्शुअल) : स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण २) समलिंगी (होमो सेक्शुअल) : स्त्री स्त्री आणि पुरुष पुरुष यांच्यातील आकर्षण ३) बायसेक्शुअल : एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी स्त्री आणि पुरुष दोघांबद्दल वाटणारे आकर्षण लैंगिक ओळख हा मनो भावनिक अनुभव आहे. तुमची लैंगिकता (जेंडर) आणि तुमचे सेक्शुअल ओरिएन्टेशन या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी असतात हे सगळ्यात आधी समजून घेऊया. एखाद्या व्यक्तीचा जेंडर म्हणजे स्त्री, पुरुष किंवा ट्रान्सजेंडर.

पौगंडावस्थेत तुमच्या मनात तुमच्या सेक्शुअल ओरिएंटेशनचे विचार यायला सुरुवात होते. आपण नक्की कोण आहोत? हा प्रश्न पडतो. बऱ्याचदा टिनेजर्स आपण हेट्रो सेक्शुअल आहोत? असं समजतात. म्हणजे मुलांना मुलींबद्दल आणि मुलींना मुलांबद्दल आकर्षण आहे असं गृहीत धरलं जातं. पण आपलं मन आणि भावना मात्र वेगळ्याच हाका मारत असतात.

लैंगिक ओळख समजून घेताना येणाऱ्या अडचणी आपल्याला नक्की मुलगी आवडते, मुलगा आवडतो की दोघेही आवडतात हे न समजल्यामुळे पौंगडावसस्थेमध्ये मनाचा गोंधळ उडण्याची शक्यता असते. आणि मोठ्या माणसांशी बोलताही येत नाही. संकोच वाटतो. आपल्याला भिन्न लिंगी, समलिंगी किंवा दोघांबद्दलही आकर्षण का वाटतंय हेही या वयात नीटसं समजत नाही. काहीवेळा असंही होऊ शकतं की शारीरिक आकर्षण एका लिंगा विषयी वाटतंय आणि त्याचवेळी भावनिक आकर्षण दुसऱ्या लिंगाविषयी. किंवा शारीरिक आणि भावनिक आकर्षण एकाच लिंगाविषयी वाटतंय असंही होऊ शकतं.किती हा गोंधळ! या सगळ्या गोंधळात टाकणाऱ्या विचारांमुळे शारीरिक आणि मानसिक परिमाण होऊ शकतात. पण एक गोष्ट नक्की की लैंगिक ओळख  आणि मनोभावनिक वर्तन कुणीही बळजबरीनं बदलू शकत नाही.

टिनेजर्सना मदत करा! स्वतःची लैंगिक ओळख शोधण्यासाठी मोठी माणसं कशी मदत करू शकतात? हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. स्वतःची लैंगिक ओळख शोधणं ही अतिशय नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे, जी वयात येणाऱ्या सगळ्यांच्या बाबतीत घडते. म्हणूनच पालकांनी याविषयी मोकळेपणाने मुलांशी बोललं पाहिजे. आपण नक्की कोण आहोत या प्रश्नामुळे स्वतःचं स्वतःशी होणारं भांडण, अनावश्यक नैराश्य, लाज आणि मनातला गोंधळ हे सगळं लैंगिक शिक्षणानं टाळता येऊ शकतो. प्रचंड वेळ, मनस्ताप, संघर्ष आणि ऊर्जा खर्च केल्यानंतर अनेकांना स्वतःची लैंगिक ओळख सापडते. पण पौगंडावस्थेतच जर त्यांना योग्य माहिती मिळाली, आधार मिळाला, त्यांच्या शरीराच्या हाका ऐकून त्या मान्य करण्याचा आणि स्वतःची लैंगिक ओळख ठरवायचा मोकळेपणा आणि स्वातंत्र्य मिळालं तर हा सगळा त्रास वाचू शकतो. लैंगिक ओळख म्हणजे वर दिलेल्या प्रकारात स्वतःची ओळख शोधणं आणि ती स्वीकारणं. त्यामुळे आपल्या लैंगिक ओळखीविषयी लाज बाळगू नका. आणि तुमच्या भावना, तुमची लैंगिक ओळख कुणीही बळजबरी बदलू शकत नाही हे लक्षात ठेवा. अनेकदा या शोधात अनिश्चिततेचे क्षण येतात. आपल्याला नक्की काय वाटतंय ते समजत नाही, पण ठीक आहे. असा गोंधळ झाला तरी भांबावून जाऊ नका. स्वतःला वेळ द्या, तुम्हाला तुमची लैंगिक ओळख नक्की सापडेल.

विशेष आभार: डॉ. सुप्रिया अरवारी

(एमडी, डिजिओ)