(Image Credit- She knows)
इंग्लँड आणि वेल्समध्ये लवकरच कौमार्य चाचणी (Virginity test) करणं हा गुन्हा घोषित केला जाऊ शकतो. वर्जिनिटी टेस्टला बेकायदेशीर ठरवण्याच्या दिशेनं पाऊलं उचलली जात आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कौमार्य चाचणीमुळे महिलांमध्ये ऑनर किलिंगचा धोका वाढत आहे. या चाचणीदरम्यान महिलांच्या प्रायव्हेट पार्ट्समधील हायमेन व्यवस्थित आहे की नाही याची तपासणी केली जाते.
काही समाजामध्ये असा चुकीचा समज आहे की, पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवताना हायमेन ब्रेक होते. पण डॉक्टरांच्या मते या गोष्टीत काही तथ्य नाही. ब्रिटनचे कंजर्वेटिव खासदार रिचर्ड होल्डन यांनी कौमार्य चाचणीला बेकायदेशिर ठरवण्याची मागणी केली आहे. या प्रस्तावाला आरोग्य आणि सामाजिक विभागाकडून समर्थन मिळाल्यानंतर ब्रिटनच्या संसदेत प्रस्तृत करण्यात आले. या प्रस्तावात हायमेनोप्लास्टीवर प्रतिबंध लावण्याचाही समावेश आहे.
ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे हायमेनचे अस्थायी रुपात पुन्हा निर्माण करता येऊ शकते. या कायद्याअंतर्गत जर ही क्रिया कोणीही करताना दिसले तर शिक्षा दिली जाणार आहे. कायद्याबाबत होल्डन यांनी सांगितले की, अनेक ठिकाणी डॉक्टरांकडून लग्नाआधी मुलींची कौमार्य चाचणीआणि हायमन रिपेअर सर्जरी केली जात आहे.
याचा विज्ञानाशी काहीही संबंध नाही. अपमानकारक आणि धोकादायक अफवांच्या आधारावर लोकांमध्ये चुकीची माहिती पोहोचवली जाते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार टेम्पॉनचा वापर, व्यायाम आणि अन्य कारणांमुळे हायमेन तुटू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार कौमार्य चाचणी मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचं मानलं जात आहे.
WHO च्या म्हणण्यानुसार महिलांच्या शारीरिक, मनोवैज्ञानिक आणि सामाजिक कल्याणासाठी हे खूप हानीकारक आहे. होल्डन यांनी सांगितले की, ''मुलींना आपली व्हर्जिनिटी गमावण्याबाबत निश्चिंत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. याबाबतचे गैरसमज, चुकीचे व्यवहार नष्ट करायला हवेत. '' या प्रस्तावात अजूनही काही बदल केले जाणार आहेत.