Join us   

चुकीच्या मापाची, तंग इनर वेअर्स घालता, रात्री तेच घालून झोपता? त्यामुळे अनेक आजार होतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 1:27 PM

वयात आल्यापासून प्रत्येक महिलेची ती गरज आहे. पण आजही 'ब्रा' म्हणजेच ब्रेसिअरबाबत  बोलताना अनेक महिला बिचकतात. ब्रा फिट्ट आणि टाईट असावी, असे वयात आलेल्या मुलींच्या मनावर नकळतपणे बिंबवले जाते. पण अशी ही टाईट ब्रा अगदी दिवस रात्र घालून ठेवली तर आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

ठळक मुद्दे ब्रा कशी असावी, आपल्या मापाची योग्य ब्रा कशी निवडावी, तिचे बेल्ट कसे असावेत याविषयी बऱ्याच महिलांना आणि मुलींना शास्त्रशुद्ध माहिती नसते. बरं ही ब्रा घालावी कधी आणि काढायची कधी, की चोविस तास घालूनच ठेवायची, हे देखील अनेकींना समजत नाही.

ब्रा हा विषयच असा आहे की, आजही चारचौघात जर ब्रेसिअरचा बेल्ट बाहेर आला तर तो बघणाऱ्या बायका आणि पुरूषही कासाविस, अस्वस्थ होऊन जातात. एवढे जबरदस्त मौन या विषयावर पाळले जाणार असेल तर बायकांच्या मनात त्याच्याविषयी असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे तरी कशी आणि कुठून मिळणार? यामुळेच तर अनेक चुकीच्या संकल्पना मनात ठेवून पिढ्यानपिढ्यांपासून ब्रा घातली जात आहे. रात्री झोपताना ब्रा काढून ठेवावी, हे काही वर्षांपुर्वी झालेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. याचा महिलांच्या तब्येतीवर विपरित परिणाम तर होतोच, पण ॲलर्जी, खाज असे आजारही उद्भवू शकतात. 

अनेक महिलांना दिवसरात्र, २४ तास ब्रा घालून ठेवण्याची सवय असते. थोड्यावेळ जरी ब्रा नसेल तरी त्यांना लगेच अगदी मोकळे मोकळे वाटून अस्वस्थ होऊ लागते. पण इतर अनेक आजार टाळायचे असतील, तर ही सवय लगेचच सोडून द्यावी, असे तज्ज्ञ सांगत आहेत. का घालू नये रात्री ब्रा १. गाठी होण्याची भीती  टाईट ब्रा जर २४ तास घालून ठेवली तर स्तन आवळल्यासारखे होतात. यामुळे त्या भागात रक्तपुरवठा सुरळीतपणे होण्यास अडथळा निर्माण होतो. रक्तपुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास आतल्या आत रक्त साकाळून गाठी होण्याची शक्यता असते. कालांतराने या गाठी कॅन्सरस ट्युमरमध्येही रूपांतरीत होऊ शकतात.

२. त्वचेचे विकार होऊ शकतात ब्रेसिअर हे अतिशय घट्ट असल्याने त्याचे इलॅस्टिक छातीवर, पाठीवर काचू शकते. वर्षानुवर्षे असेच चालू राहिले तर त्यातून त्या भागात त्वचा विकारही उद्भवू शकतात. 

 

३. खाज आणि पुरळ ब्रा चा कपडा, त्याचे इलॅस्टिक त्वचेवर वारंवार घासल्या जाते. यामुळे त्या भागात खाज येऊ शकते. वारंवार घाम येऊन पुरळी येऊ शकतात आणि त्या भागाला कधीच मोकळी हवा मिळत नसल्याने बुरशीप्रमाणे पांढरट आवरणही तयार होऊ शकते.

४. अपुरी झोप आणि अस्वस्थता रात्री झोप पुर्ण होत नाही, मनावर दडपण येते अशा समस्या जाणवत असतील, तर रात्री झोपताना अवश्य ब्रा काढून झोपा. कारण ब्रा चा घट्टपणा हे देखील या समस्येमागचे एक कारण असून शकते. ब्रा चे अतिटाईट असणे जाणवत नसले तरी शरीरावर आणि मनावर परिणाम करत असते.   

टॅग्स : आरोग्यमहिलाहेल्थ टिप्स