डॉ. शिल्पा चिटणीस जोशी
"डॉक्टर 'माझी चार महिन्याची मुलगी आहे,तिच्या शूच्या जागेवर पांढरा स्त्राव दिसतो बऱ्याच वेळा..इतक्या लहान वयात असं का?"
"डॉक्टर 'ही माझी चौदा वर्षाची मुलगी..पांढरं जातंय म्हणते सारखं..घाबरलेच मी ..लगेच घेऊन आले तुमच्याकडे"
"डॉक्टर चार महिन्यांपूर्वीच लग्न झालंय माझं..चार दिवसांपासून खाज सुटून पांढरं जातंय "
"डॉक्टर गेल्या वर्षीपासून पाळी थांबलीये माझी पण पांढरं जातंय आणि आग होते योनीमार्गाची.."
वेगवेगळ्या वयातल्या बालिका, मुली, तरुणी आणि वयस्क महिला या ही एकच समस्या घेऊन खूप वेळा स्त्रीरोगतज्ञांच्या क्लिनिक मध्ये येतात. किंबहुना कोणत्याही स्त्रीरोगतज्ञांच्या क्लिनीकमध्ये हे पेशंट सर्वात जास्त असतात.या पेशंटमध्ये मुख्य दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात पेशंट या पांढरं जाण्यामुळे पूर्णपणे धास्तावून गेलेली असते. कितीही वेळा तपासून औषधे दिली,काही प्रॉब्लेम नाहीये असं सांगितलं तरी त्यांचं समाधान होतच नाही. दुसरा प्रकार मात्र जरा धोकादायक आहे. या स्त्रियांना योग्य उपचार आणि गरजेच्या तपासण्या करून घ्या असं कितीही सांगितलं तरी त्या सोयीस्कररित्या गायब होतात आणि खूप त्रास झाल्याशिवाय शक्यतो उगवत नाहीत.
(छायाचित्र : गुगल)
अंगावर पांढरे जाणे हे नक्की काय आहे आणि वयानुसार कसे बदलत जाते हे आपण आता बघूया.
सर्वप्रथम हे लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की आपल्या तोंडाच्या आतल्या भागाप्रमाणेच योनीमार्ग हा ओलसर राहणेच अपेक्षित आहे, किंबहुना हा भाग पुरेसा ओलसर नसेल तर वेगवेगळ्या आरोग्यसमस्यांना आमंत्रण देतो. नैसर्गिकरित्या त्यासाठीच योनीमार्गातल्या ग्रंथी हा पांढरा स्त्राव निर्माण करत असतात. या स्त्रावामुळे योनीमार्गाची प्रतिकारशक्ती चांगली राहते व वेगवेगळ्या जंतुसंसर्गापासून योनीमार्गाचे संरक्षण होत असते. कोरडा पडलेल्या योनीमार्गात लघवीचा जंतुसंसर्ग ही फार पटकन होऊ शकतो.
अगदी लहान बालिकांमध्ये जन्मतः आईच्या शरीरातील हॉर्मोन्सचा प्रभाव असतो .त्यामुळे त्यांच्या योनीमार्गात थोडा जास्त पांढरा स्त्राव, क्वचित कधीतरी रक्तस्त्राव सुद्धा दिसू शकतो. यात घाबरून जाण्यासारखे अजिबात काहीही नाही. पुढच्या थोड्याच दिवसात हा स्त्राव कमी होतो, रक्तस्राव पूर्णपणे बंद होतो. छोट्या बालिकांमध्ये योनीमार्गात थोडा पांढरा स्त्राव हा नॉर्मल असतो. तो खूप साठल्यास आठ दिवसातून एकदा कापूस ओला करून अगदी हलक्या हाताने पुसून घ्यायला हरकत नाही. काही आया किंवा या बालिकांना अंघोळ घालणाऱ्या स्त्रिया रोज हा योनीमार्ग स्वच्छ करायला जातात, हे चुकीचे आणि धोकादायक आहे. यात या बाळांना खूप वेदना होतात, शु ला त्रास होऊ शकतो आणि योनीमार्ग अतिकोरडा झाल्यास वरच्या बाजूचा पाकळ्यांसारखा नाजूक भाग चिकटला जाऊन कधीतरी शूची जागा बंद होणे असेही दुष्परिणाम दिसू शकतात.
पौगंडावस्थेतील मुलींमध्ये जननसंस्था परिपक्व होऊ लागते तसतसा योनीमार्गात पांढरा स्त्राव थोडा वाढू लागतो. पाळी सुरू होण्याच्या वेळेपर्यंत हे बदल चालू राहतात. पाळी सुरू झाल्यावर हा पांढरा स्त्राव बहुतांशी हॉर्मोन्सच्या चक्राप्रमाणे बदलत असतो. दरवेळी पाळी सुरू होण्याआधी, नंतर आणि दोन पाळ्यांच्या मध्ये जेव्हा स्त्रीबीज तयार होते तेव्हा हा स्त्राव थोडा जास्त प्रमाणात असतो.
आता स्त्रियांना प्रश्न असा पडतो की मग हा स्त्राव नॉर्मल आहे की नाही हे कसं ओळखायचं? तर या स्त्रावामुळे खाज, जळजळ अथवा वाईट वास असे त्रास होत असतील तर हे पांढरं जाणं बरोबर नाही आणि स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला लगेच घ्यावा हे उत्तम!
योनीमार्गाचा PH (म्हणजे आम्लतेचा निर्देशांक) हा ऍसिडीक असतो . या ऍसिडीक PH मुळे वेगवेगळ्या जंतुसंसर्गापासून योनीमार्गाचे रक्षण होत असते . पाळी जेव्हा सुरू होते तेव्हा रक्ताचा PH अल्कलाईन असल्यामुळे योनीमार्गाचाही PH बदलतो आणि त्या काळापूरती योनीमार्गाची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे बहुतांशी योनीमार्गाचे जंतुसंसर्ग पाळीच्या नंतर दिसून येतात.
योनीमार्गाच्या जंतुसंसर्गाबद्दल स्त्रियांमध्ये अनेक गैरसमज दिसतात. सर्वात त्रासदायक गैरसमज म्हणजे हे संसर्ग बाहेरचं अथवा सार्वजनिक स्वच्छतागृह वापरल्यामुळे होतात हा आहे. योनीमार्गाचे कोणतेही संसर्ग हवेतून होत नाहीत. कोणत्याही स्वच्छतागृहामध्ये आजूबाजूला स्पर्श न करता स्त्रिया आपला कार्यभाग आटोपु शकतात, मग जंतुसंसर्ग कसा होऊ शकेल? आणि अगदी कमोडचा स्पर्श झाला तरी लगेच जंतुसंसर्ग होईल असे अजिबात नाही. याबाबतीत सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये भारतीय संडास उत्तम असे नमूद करावेसे वाटते कारण ते स्वच्छ ठेवणे सोपं आहे. काहीही झालं तरी बाहेरचं टॉयलेट वापरायचं नाही या भयगंडामुळे स्त्रिया वेळेवर लघवीला जात नाहीत, लघवी दाबून ठेवतात आणि त्यामुळे लघवीचा जंतुसंसर्ग निश्चित होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांनी ही भीती मनातून काढून टाकावी तसेच स्त्रियांना कुठेही स्वच्छतागृह उपलब्ध असणे ही महत्त्वाची सामाजिक गरज आहे.
अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे योनीमार्गाचा संसर्ग आणि लघवीचा संसर्ग यात स्त्रिया नेहेमी गल्लत करतात. बऱ्याच वेळा या दोन्ही प्रकारच्या जंतुसंसर्गाच्या लक्षणांमध्ये थोडेफार साम्य असते. काही स्त्रिया औषधांच्या दुकानातून किंवा स्वतःच्या मनाने वाट्टेल ती औषधं घेतात. याचा परिणाम असा होतो की जंतुसंसर्ग बरा तर होत नाहीच पण चुकीची अँटिबायोटिक्स आणि क्रिम्स वापरल्यामुळे औषधांना न जुमानणारे जंतुसंसर्ग होऊन बसतात. आजकाल असे खूप प्रकारचे जंतुसंसर्ग आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ बघत आहोत. असे जंतुसंसर्ग बरे करायला मग अक्षरश: काही आठवडे,कधीतरी महिने लागू शकतात. तेव्हा योग्य वेळी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
तर मैत्रिणींनो ह्या समस्येबद्दल तुमच्या थोड्या तरी शंकांचं समाधान झालं असेल अशी आशा करते.
(लेखिका पुणेस्थित स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)