-डॉ. माया सौंदाणकर आजकाल सर्वांमध्येच पण विशेषतः तरुण मुलांमध्ये आळस, कंटाळा, एकटेपणा, नैराश्य, लठ्ठपणा, निद्रानाश या काही समस्या वाढत आहेत. या समस्या नेमक्या ऐन तारुण्यात मुलांना का छळतात याची कारणं आधी पाहूया.१. तरुण मुलं उशिरा झोपतात, अनेकदा मध्यरात्री काहीतरी अनहेल्दी खातात, मग झोपतात. व्यायामाचा अभाव. मग दिवसा त्यांना आळस येतो. कष्ट नाही, त्यामुळे कुठलेही कष्टाचे कार्य करावेसे वाटत नाही, कमी कॅलरीज जळतात व त्याचे रूपांतर फॅट्समध्ये होतं. बिघडलेली दैनंदिन दिनचर्या हे एक महत्त्वाचं कारण आहे.
पालकांचे होणारे दुर्लक्ष. आई-बाबांना मुलांसाठी फार वेळ नसतो, ते नोकरी उद्योगात अडकलेले, आर्थिक गरजा मोठ्या. पालक आणि मुलांमध्ये सहवास आणि संवाद कमी. मुलांच्या आणि पालकांच्या वेळेचा मेळ बसत नाही. मुलांमध्ये एकटेपणाची भावना रुजू लागते. ३. मुलांकडे असलेला वेळेचा अभाव आणि शाळेच्या वेळा. पूर्वी मुले शाळेत जात तेव्हा शाळेच्या दोन सत्रांत मुले शाळेत जात असत व वेळेवर घरी आल्यामुळे क्लास, खेळणे, झोपणे इत्यादी सर्व क्रिया वेळेवर होत असत; परंतु आताचे शाळेचे वेळापत्रक मोठे. सकाळी शाळेसाठी निघालेली मुले सायंकाळीच चार वाजेला घरी येतात. प्रवासात वेळ जातो. मग अन्य क्लास, शिकवण्या मुलांकडे मोकळा वेळच नसतो. भरपूर मुलं खेळतात असं होतच नाही. जो वेळ उरतो तो स्क्रीन टाइम खाऊन टाकतो.
परिणाम काय? १. सध्या लठ्ठपणा ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. युनिसेफच्या वर्ल्ड ओबेसिटी ऍटलिस्टच्या म्हणण्यानुसार भारतामध्ये २०३० पर्यंत लठ्ठ लोकांची संख्या २.७ कोटी एवढी असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. (म्हणजेच दहापैकी एक मूल लठ्ठ असेल.) २. भारत १८३ देशांमध्ये लठ्ठपणाच्या यादीत ९९ व्या स्थानावर आहे. अतिखाण्यामुळेच लठ्ठपणा वाढतो आहे असे नाही, तर अयोग्य अन्न आणि जे खाल्ले ते न पचवणे, सतत बसून, अथवा पडून राहणे, चुकीचे समज यामुळे हे प्रमाण वाढत आहे.
३. या लठ्ठपणावर त्वरित उपाय करणे गरजेचे आहे. कारण लठ्ठपणा आपल्यासोबत इतर अनेक समस्या घेऊन येतो. ४. नैराश्य, निद्रानाश, तेरा प्रकारचे कर्करोग, हृदयरोग, फुप्फुसांचे विकार, टाइप टू डायबिटिस, फॅटी लिव्हर, गॉल स्टोन, महिलांमध्ये पॉलिसीस ओवरी, ब्रेन प्रॉब्लेम, हायपर टेन्शन, बीपी प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम आणि परिणामी कमी वयातील मृत्यू असे अनेक धोके आहेत. ५. त्यामुळेच संतुलित योग्य आहार काय असावा याचे प्राथमिक ज्ञान सर्वांना असणे गरजेचे आहे. त्यासोबतच शाळेतच बाकी शिक्षणासोबतच प्राथमिक दर्जाचे आरोग्य (फिटनेस) कसा राखायचा, हेही शिकवायला हवे.
६. लठ्ठपणावर उपाय शोधण्यासाठी शाळांची भूमिका फार महत्त्वाची असते. कारण शाळेत मुलांना खेळण्यासाठी मैदान असते. अर्थात कित्येक शाळांना मैदानेच नाहीत, तर थोडेफार मोकळे आवारही नाही. त्यांनी त्यावर उपाय शोधायला हवा. ७. अन्नातून माणसाला कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे, क्षार, मेद, तंतुमय या घटकांची पूर्तता होते; परंतु हे सर्व घटक प्रत्येकाच्या शरीरानुसार कोणते व किती प्रमाणात घ्यावेत याचा संतुलित मेळ बसवून घ्यावा लागतो. आहार योग्य वेळी घेऊन तो शारीरिक कष्ट अथवा हालचाली-व्यायाम करून पचवावा. झोपेच्या वेळाही पाळाव्या लागतात, म्हणून आपला बॉडी मास इंडेक्स कॅल्क्युलेट करून आहाराचे नियोजन करायला हवे.