Lokmat Sakhi >Health >Adolescence > पाळीच्या दिवसात पोट का दुखतं ?

पाळीच्या दिवसात पोट का दुखतं ?

सर्वसाधारणपणे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदनांचा कुठल्याही स्त्री रोगाशी संबंध नसतो. पाळी वेदना जवळपास ५० टक्के स्त्रिया अनुभवतात. आणि फक्त १० टक्के महिलांमध्ये या वेदना तीव्र स्वरूपाच्या असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 PM2021-03-13T16:17:22+5:302021-03-13T16:38:27+5:30

सर्वसाधारणपणे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदनांचा कुठल्याही स्त्री रोगाशी संबंध नसतो. पाळी वेदना जवळपास ५० टक्के स्त्रिया अनुभवतात. आणि फक्त १० टक्के महिलांमध्ये या वेदना तीव्र स्वरूपाच्या असतात.

Why does the stomach ache during menstruation narikaa ? | पाळीच्या दिवसात पोट का दुखतं ?

पाळीच्या दिवसात पोट का दुखतं ?

Highlightsकाही मुलींच्या बाबतीत तर पाळीतल्या वेदना नियमित स्वरुपाच्या असतात.या वेदना त्रासदायक असल्या तरीपण जसजसं वय वाढत जातं तशा या वेदना कमी होतात आणि काहींच्या बाबतीत तर बाळंतपणानंतर त्या पूर्णच बंद होतात.सर्वसाधारणपणे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदनेचा कुठल्याही स्त्री रोगाशी संबंध नसतो.फक्त १० टक्के महिलांमध्ये या वेदना तीव्र स्वरूपाच्या असतात.


मासिक पाळीच्या दिवसात किंवा पाळी चालू होण्याआधी अनेक मुलींच्या ओटीपोटात प्रचंड वेदना होतात. हा अनुभव अनेकांचा असला तरी काही मुलींमध्ये या वेदना तीव्र असतात. ज्याचा त्यांच्या रुटीनवर आणि रोजच्या कामकाजावर परिणाम होतो. काही मुलींच्या बाबतीत  तर पाळीतल्या वेदना नियमित स्वरुपाच्या असतात. या वेदना त्रासदायक असल्या तरीपण जसजसं वय वाढत जातं तशा या वेदना कमी होतात आणि काहींच्या बाबतीत तर बाळंतपणानंतर त्या पूर्णच बंद होतात.

पाळीतल्या वेदनांचं स्वरुप कसं असतं? 
१) ओटीपोटात कळा येणं. दुखायला लागणं आणि हे दुखणं वाढत जाणं.
२) बेंबीपाशी दाब जाणवणं.
३) खालची पाठ, मांड्या आणि पायांमध्येही वेदना सुरु होणं.
पाळीतल्या तीव्र वेदनांचं स्वरुप
१) पोट बिघडणे
२) मळमळणे, उलटी होणे
३) गरगरणे
या वेदना पाळीच्या एक ते तीन दिवस आधी सुरु होतात. पाळीच्या २४ तास आधी  त्या तीव्र होतात आणि मग पुढच्या दोन ते तीन  दिवसात कमी होतात.

पाळीत वेदना का होतात? 

पाळी येते तेव्हा गर्भशाय आकुंचन पावतं . त्यामुळे गर्भाशयाच्या भिंतींना असणारं अस्तर सुटून येतं. हे प्रोस्टाग्लान्डिन्ससारख्या हार्मोन्समुळे घडतं. हे अस्तर सुटलं की मासिक पाळी सुरु होते. जर गर्भाशय खूप जोरात आकुंचन पावलं तर त्याचा ताण रक्तवाहिन्यांवर येतो आणि गर्भाशयाकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि वेदनांना सुरुवात होते. पाळीतील वेदनांमुळे अती रक्तस्रावाचा त्रासही होऊ शकतो.

पाळीतील  वेदनेचे प्रकार कोणते?

- प्राथमिक वेदना
सर्वसाधारणपणे पाळीच्या दिवसात होणाऱ्या वेदनेचा कुठल्याही स्त्री रोगाशी संबंध नसतो. पाळी वेदना जवळपास ५० टक्के स्त्रिया अनुभवतात. आणि फक्त १० टक्के महिलांमध्ये या वेदना तीव्र स्वरूपाच्या असतात. तसंच वयाची वीस वर्ष ओलांडलेल्या महिलांमध्येही हा प्रकार सर्वसाधारणपणे दिसतो. बऱ्याच जणींच्या बाबतीत वयानुसार हे कमी होत जातं किंवा बाळंतपणानंतर अनेकदा बंदही होतं. काहीवेळा वेदना तीव्र स्वरूपाच्या असू शकतात पण त्यापासून कुठलाही धोका नसतो.

दुसऱ्या स्तराच्या वेदना
 
या वेदना काहीवेळा कुठल्यातरी स्त्री रोगाशी निगडित असू शकतात. जसं की, एन्डोमेट्रिओसिस, गर्भाशयावर येणाऱ्या गाठी, अडेनोमयोसिस, पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज. प्रौढ स्त्रियांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसतो.


 

उपचार काय?
वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपचारांचा नक्कीच फायदा होतो. 
१) गरम फडक्यानं किंवा गरम पाण्याच्या पिशवीनं पाठ आणि ओटीपोट शेकणं.
२) पाठ आणि ओटीपोटाला हलका मसाज करणं.
३) गरम पाण्यानं अंघोळ करणं.
४) आवश्यकता वाटल्यास आडवं पडणं, झोप घेणं.
५) खारट आणि कॅफेन असलेले पदार्थ टाळणं.
६) त्या काळात मद्यपान, धूम्रपान न करणं.
७) नियमित व्यायाम करणं. 
८) हलका आणि पोषक आहार घेणं.
९) जर वेदना तीव्र स्वरूपाच्या असतील तर वेदना शामक औषधं घ्यायला हरकत नाही.

जर पाळीत वेदना नियमित आणि तीव्र्स्व रूपाच्या असतील आणि त्यामुळे शाळा, खेळ आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर मात्र ताबडतोब् स्त्रीरोगतज्ज्ञांना दाखवलं पाहिजे. डॉक्टर तुम्हाला कधीपासून त्रास होतोय या सगळ्याची माहिती घेऊन योग्य ते उपचार सांगू शकतात. तीव्र पाळी वेदनांमध्ये अनेकदा डॉक्टर्स वेदना शामक औषधं देतात, ज्यात तोंडावाटे घेण्याच्या गर्भनिरोधक गोळ्यांचाही समावेश असतो. ज्यामुळे पाळी वेदना कमी होण्यास मदत मिळू शकते.

पाळीत वेदना अनेक मुलींना होतात. शरीरात बदल होतात तसेच या काळात भावनांमध्येही बदल होतात. कमी स्वरूपाच्या वेदना असतील तर त्याचा काहीही धोका असत नाही. पण जर वेदना तीव्र स्वरूपाच्या असतील तर मात्र त्याचा परिणाम रोजच्या आयुष्यावर आणि कामकाजावर होऊ शकतो. अशावेळी स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. जेणेकरून त्रास वाढणार नाही.

विशेष आभार: डॉ. डी. किरणमयी

(MD, FICOG, SENIOR CONSULTANT OBG, ASSOCIATE PROFESSOR OSMANIA MEDICAL COLLEGE HYDERABAD)

Web Title: Why does the stomach ache during menstruation narikaa ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.