Join us   

लैंगिक छळाच्या अनुभवांनंतर बसणाऱ्या मानसिक अन् भावनिक धक्क्यातून कसं बाहेर पडायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 6:16 PM

Women Safety Tips : लैंगिक छळाचे  गंभीर परिणाम होतात, वयात येतानाच जीवघेण्या आघाताचे संकट.

(Image Credit- Clinical Advisor)

लैंगिक छळाच्या घटना आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर घडतात हे  सत्य आहे. सर्व जेंडर्स आणि वयोगटात ही समस्या दिसून येते. टिनेजर्स नेहमीच सॉफ्ट टार्गेट्स असतात. लैंगिक छळाच्या घटनेत फक्त शारीरिक त्रास नसतो तर अशा नकोशा अनुभवांनंतर बसणारा मानसिक आणि भावनिक धक्का सगळ्यात मोठा असतो.  व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य बिघडू शकतं. पौगंडावस्था म्हणजे एडॉलसन्स हा अतिशय नाजूक काळ असतो. आजूबाजूच्या जगाविषयी अगणित प्रश्न मनात असतात, त्याचवेळेला ऍटिट्यूडही पॉसिटीव्ह असणं खूप आवश्यक आहे. तरच पॉझिटीव्ह पर्सनॅलिटी तयार होते.

पण वाढीच्या वयात कुठल्याही प्रकारचा छळ अनुभवावा लागला तर त्याचे ओरखडे मनावर उमटतातच. त्या आठवणी कायमच्या कोरल्या जातात. अनेकदा अशा नकोशा अनुभवांचा थेट परिणाम त्या वयात दिसत नाही, जाणवतही नाही पण जर या नकोशा अनुभवांतून बाहेर पडण्यासाठी टिनेजर्सना वेळीच मदत केली गेली नाही तर त्याचे गंभीर परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात.  

टिनेजर्स आणि लैंगिक छळ 

शरीर बदलत असतं, अनेक जाणिवा नव्याने तयार होत असतात, स्वतःच्या शरीराविषयी कुतूहल असतंच पण ज्या जेंडरविषयी आकर्षण वाटत असतं त्या जेण्डरच्या शरीराबद्दलही जबरदस्त आकर्षण असतं. भावना आणि हार्मोन्स सगळंच उसळत असतं. स्वतःत होणाऱ्या हार्मोनल बदलांची जाणीव असतेच असं नाही. त्यामुळे जे काही नव्याने मनात आणि शरीरात वाटत असतं त्याविषयी प्रचंड गोंधळ असतो आणि टिनेजर्सच्या याच अवस्थेचा फायदा घेतला जातो. जाळं टाकून शिकारी बसलेलेच असतात. चटकन त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा बळजबरीने लैंगिक संबंधांमध्ये त्यांना ओढलं जातं. टिनेजर्स लैंगिक संबंधांच्या बाबतीत अतिशय व्हल्नरेबल बनतात.

अनेकदा गोष्टी फार झपाट्याने घडतात. आपल्याबरोबर नेमकं काय होतंय हे लक्षात येऊन त्याला प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळत नाही. त्यात लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे जे काही घडतंय ते नेमकं काय आहे, त्यात त्यांची भूमिका काय आहे, त्यांची इच्छा काय आहे, त्याचे परिणाम काय होऊ शकतात या कशाबद्दलच टिनेजर्सना माहिती नसते 

लैंगिक छळाचे परिणाम 

१) शारीरिक इजा, लैंगिक अवयवांना होणाऱ्या जखमा 

२) नैराश्य 

३) तीव्र स्वरूपाचा निद्रानाश 

४) चार लोकांत जाण्याची भीती वाटणे. 

५) अस्वस्थता 

६) सतत मूड्स बदलणे किंवा मूड स्विन्ग्ज 

७) खाण्यावर परिणाम होणे 

८) स्व प्रतिमेला तडे जाणे 

९) लाज/ शरम शरम वाटणे 

१०) अग्रेसिव्ह होणे, सतत राग येणे 

११) अभ्यासावरचे लक्ष उडणे 

१२) सतत कसली तरी भीती वाटणे 

१३) निरनिराळ्या प्रकारचे शारीरिक त्रास सुरु होणे. 

१४) भावनिक सुन्नता येणे 

१५) दारू आणि ड्रग्ज  घ्यायला लागणे. 

१६) अति सतर्कता 

१७) आत्महत्येचे विचार येणे 

१८) मनोविकार 

पालक कशी मदत करू शकतात?

मुलांवर होणाऱ्या कुठल्याही आघातात पालकांची भूमिका खूप महत्वाची असते. पालकांचा सपोर्ट असेल तरच मुलं अशा धक्कादायक परिस्थितीतून चटकन बाहेर पडू शकतात. मुलांना पालकांचा आधार वाटला पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास परत मिळवून देण्यासाठी पालकांनी मदत केली पाहिजे.  मुलांना नकोशा अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलता येत नाही, त्यांना लाज वाटते अशावेळी पालकांनी जर मुलांमध्ये विश्वास निर्माण केला तर मुलं चटकन मोकळी होतात.

पालकांशी बोलतात आणि पालक आणि मुलांमधला जो एक डिसकंफर्ट असतो तो जायला मदत मिळते. मानसिक आधार मिळाला, पालक आपल्या पाठीशी आहेत हा विश्वास निर्माण झाला की मुलं धीराने त्यांच्याबरोबर घडलेल्या घटनेला तोंड देऊ शकतात आणि जगाला सामोरे जाऊ शकतात. 

त्यामुळे अशी घटना घडल्यानंतर पालकांनी मुलांची खंबीर सोबत करायला हवी. जिथे गरज असेल तिथे वैद्यकीय आणि मानसिक मदत/मार्गदर्शन घ्यायला हवं. आईबाबा बरोबर आहेत म्हटल्यावर मुलं कुठल्याही संकटाचा सामना करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, टिनेजर्स सॉफ्ट टार्गेट्स असतात. पण जागरूकता, नकोशा अनुभवांनंतर मानसिक, भावनिक आधार, योग्य उपचार जर मिळाले तर अशा धक्कादायक अनुभवातूनही बाहेर पडता येऊ शकतं. 

तज्ज्ञ मार्गदर्शक : डॉ. सुप्रिया अरवारी (एम.डी. डिजिओ)  

 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमहिला