मनाली बागुल
जागतिक एड्स दिन (World Aids Day), आज सुरक्षित शरीर संबंध, कंडोमचा वापर, सेक्स करताना घ्यायची काळजी यासंदर्भात बरीच चर्चा होते. जनजागृतीसाठी ते सारे आवश्यकच आहे. विशेषत: वयात येणाऱ्या तरुण- तरूणींनी STD, HIV-AIDS यासंदर्भात माहिती असणं, त्या आजाराचं गांभिर्य, जगण्यावर होणारा परिणाम, वेळीच घ्यायची काळजी यासंदर्भात माहिती देण्यात येते. शास्त्रीय आणि योग्य माहिती असणं, गैरसमज नसणं आणि चुकीची माहिती तरुण मुलामुलींपर्यंत न जाता त्यांना योग्य लैंगिक शिक्षण मिळणं हे सारं आवश्यक आहे.
मात्र आपण गर्भनिरोधक किंवा कंडोम वापरतो म्हणजे आपण मुक्त शरीर संबंध ठेवू शकतो, आपल्याला काही भीती नाही किंवा कोणतेच सेक्शुअली ट्रान्समिटेड (STD) आजार होणार नाहीत असं नाही, तो गैरसमज वेळीच दूर करुन तरुण मुलामुलींसह जोडप्यांनी अधिक सावध राहायला हवे, असं लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात.
कंडोम वापरा, सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी असं सरसकट सांगितलं जात असलं तरी बेजबाबदार लैंगिक वर्तन गोत्यात आणू शकतं असं स्पष्ट करत डॉ. भोसले म्हणतात, ''बेजबाबदार लैंगिक संबंधांमध्ये न पडणं (Irriresposible sexual relationship) म्हणजेच नात्यात पती- पत्नीची कमिटमेंट नसल्यास लैगिंक संबंध ठेवू नयेत. कारण कॅज्युअल रिलेशनशिप्समध्ये HIV पसरण्याचा धोका जास्त असतो. कंडोमच्या वापरामुळे अनेकजण मल्टीपल पार्टनरशी संबंध ठेवण्यात रस दाखवतात. खरंतर कंडोमच्या वापरामुळे पुर्ण सुरक्षा मिळते असा गैरसमज आधी दूर व्हायला हवा.
उदा. कंडोम वापरणं म्हणजे हेल्मेट वापरण्यासारखं. हेल्मेट घालण्याचा सल्ला मोटारसायकल चालवत असलेल्या व्यक्तीला दिला जातो. पण सर्व प्रकारच्या अपघातात हेल्मेटमुळे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे फार फार तर तुमचं डोकं सुरक्षित राहू शकतं. पण शरीराची दुखापत व्हायची ती होणारच. त्यामुळे शरीर संबंध ठेवताना कंडोम वापरावा जरूर पण त्यामुळे HIV-AIDS पासून पूर्ण सुरक्षा मिळेलच, असा समज करून घेऊ नये. बेजबाबदार वर्तन टाळावे.''
कंडोम पूर्णपणे सुरक्षित आहे का?
कंडोम पूर्णपणे सुरक्षित कसा नाही याचं उदाहरण देताना डॉ. भोसले सांगतात, ''जर एखादी स्त्री एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर तिच्या योनीमार्गातून निघणारा स्त्राव इन्फेक्शन पसरण्याचं कारण ठरू शकतो. अशावेळी HIV- AIDS संसर्गाचा धोका असू शकतो. उदा. कोरोनापासून बचावासाठी मास्क लावलाय पण नाक मात्र उघडं आहे. मास्क वापरूनही डोळ्यांमार्फत संसर्ग होऊ शकतो. त्याचप्रमाणे कंडोम वापरल्यानंतरही संक्रमित व्यक्तीकडून इतरांना HIV होऊ शकतो. म्हणून कंडोम वापरून आपण कोणाशीही संबंध ठेवल्यास आजारांचा धोका नसेल असा गैरसमज असू नये''
कॅज्यूअल सेक्सचे धोके
डॉ. भोसले यांच्या म्हणण्यानुसार ''कॅज्यूअल सेक्समध्ये तिनं किंवा त्यानं इतर अनेक मित्र मैत्रिणींशी शरीर संबंध ठेवल्याची शक्यता असू शकते. या चेनमध्ये कोणाला HIV झाला होता किंवा कोणामुळे आपल्यापर्यंत इन्फेक्शन पोहोचलं हे कळायला मार्गच नसतो. कारण HIV संक्रमित व्यक्ती सुरूवातीची ८ ते १० वर्ष अगदी सशक्त, सुदृढ दिसते. पण त्या माध्यमातून इतरांपर्यंत संक्रमण पोहोचत असतं. अनेकांना वाटतं फक्त सेक्शुअल इंटरकोर्समुळे HIV पसरतो ओरल सेक्समुळे पसरत नाही. हा एक मोठा गैरसमज आहे.
जीवघेण्या HIV चं कारण ठरतात सामान्य वाटणारी आठ लक्षणं; घाबरून न जाता अशी घ्या काळजी
बॉडी फ्यूईड्स (3S) लाळ (Saliva), वीर्य (Simen), रक्तातील द्रव भाग (Sirum) ज्या क्रियांमध्ये या थ्री एसची देवाण घेवाण होते. तिथे एचआयव्हीचा धोका असतो. फक्त संक्रमित व्यक्तीच्या (3S) मधूनच हा आजार पसरू शकतो. पण अनेकांना स्वत:ला हा गंभीर आजार असल्याची कल्पना नसते. जोपर्यंत चाचणी केली जात नाही तोपर्यंत याबाबत माहिती मिळत नाही. HIV-AIDS पासून सुरक्षित राहण्याचा सोपा उपाय म्हणजे बेजबाबदार, मल्टीपल, असुरक्षित सेक्स टाळावा. नात्यातही एकनिष्ठता जपावी.''