आपण दिवसभर दमून घरी येतो. थोडे फ्रेश होतो आणि भूक लागल्याने काहीतरी खातो नाहीतर चहा घेतो. मग थोडा वेळाने जेवण करतो आणि टीव्हीसमोर बसून राहतो. अशाप्रकारे जेवण झाल्या झाल्या लगेच बसून राहणे आरोग्यासाठी घातक असते. त्यापेक्षा जेवण झाल्यावर किमान १५ ते २० मिनीटे तरी चालायला हवे. डॉक्टर्स, तज्ज्ञ सुद्धा चालण्याचे महत्व सांगत किमान अर्धा तास चालण्याचा सल्ला देतात. शिवाय हल्लीची जीवनशैली अत्यंत व्यस्त आणि बैठी आहे. त्यामुळे अनेक शारीरिक, मानसिक व्याधी माणसांना जडलेल्या दिसून येतात (2 things you must do after having dinner for good health).
मधुमेह, बीपी, हार्मोनल प्रॉब्लेम, निद्रानाश, नैराश्य, उत्साहाची कमतरता अशा एक ना अनेक समस्यांनी लोक त्रस्त असल्याचे जवळपास प्रत्येक घरात बघायला मिळते. त्यातच भर पडते ती स्क्रीन टाइमची. एकीकडे कमी झालेली हालचाल, व्यायामाची कमतरता आणि दुसरीकडे सतत डोळ्यासमोर असणारी स्क्रीन. पण आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत व्यायामाला वेळच मिळत नाही. ही तक्रार बरेच जण करताना दिसतात. मात्र चालणे आरोग्य चांगले राहण्यासाठी अतिशय उपयुक्त असून कधी आणि कसे चालावे याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र काय सांगतात जाणून घेऊया.
१. जेवणानंतर शतपावली – आपण आपल्या आजीकडून ऐकलेले असते जेवल्या जेवल्या बसू नये. जरा चालावे, वज्रासनात बसावे म्हणजे अन्न नीट पचते. पण आपण या जुन्या गोष्टी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. याला सबब परत वेळेची असतेच आणि मग अनेक व्याधींना बळी पडतो. पण तुमच्या अशा अनेक तक्रारींवर आजीचा हा सल्ला खूप उपयुक्त आहे जो आता तज्ज्ञही देत आहेत.
रात्रीच्या जेवणानंतर किमान अर्धा तास चालणे आवश्यक आहे. हे चालणे म्हणजे वेगात किंवा हृदयाचे ठोके मोजत केलेला व्यायाम नसावा. शतपावली करावी, चालण्याचा मंद वेग एक सारखा ठेवत किमान शंभर पावले चालावी असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे जेवलेले अन्न नीट पचते. अन्नाचे नीट पचन झाल्याने शरीराला योग्य ते पोषण मिळते, यामुळे अनेक आजार टळतात. असे केल्याने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उत्साह वाढतो. गॅसेस, अपचन, अॅसिडिटी असे त्रास होत नाहीत. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.
२. मोबाइल टाळावा – आजकाल प्रत्येकच काम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आधारे होते. लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही यातच प्रत्येक जण दिवसभर गुंतलेला असल्याने याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही घातक परिणाम होत आहे. मेंदूला आणि डोळ्यांना डोळ्यांसमोर सतत स्क्रीनची सवय झाल्याने निद्रानाशाची समस्याही वाढलेली दिसते. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाइल, टीव्ही, फोन, टॅबलेट अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणे बंद करावे. त्यातून निघणार्या ब्लू लाईट झोपेवर वाईट परिणाम करत असल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते.