- डाॅ. गीता वडनप
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणाने एक आनंदाची बातमी सांगितली, पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या वाढली आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पुरूषांच्या तुलनेतील महिलांच्या संख्येतील ही वाढ कुटुंब स्वास्थ्याच्या दिशेने एक चांगला संकेत देते आहे. याशिवाय असेही दिसते की, गेल्या काही महिन्यात महिलांचे सर्वसामान्य आरोग्य निर्देशांक थोडेफार उंचावलेले आहेत. मात्र, या साऱ्यात काळजीची गोष्ट म्हणजे स्त्रियांमधील ‘ॲनिमिया’चं प्रमाण लक्षणीय वाढलं आहे, असं ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’ची निरीक्षणं सांगतात. (anemia)ॲनिमिया हा भारतीय महिला आणि मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आजार आहे. आज देशात ५० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया आणि मुले या आजाराने त्रस्त आहेत आणि ही आकडेवारी समाज आणि स्त्रियांचे आरोग्य म्हणूनही गंभीर आहे.
ॲनिमिया (anemia) म्हणजे काय?
ॲनिमिया म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होणे. यामुळे पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. त्याचबरोबर सर्वसाधारण प्रतिकारशक्ती कमी होते.
(Image : Google)
ॲनिमिया प्रकार कोणते?
1. पौष्टिक तत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया (nutritional anemia)
(अ) लोहतत्त्व कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया (iron deficiency anemia)
(ब) जीवनसत्त्व ब व फोलिक ॲसिड कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया (megaloblastic anemia)
2. हाडामधील मूळ रक्तपेशींच्या अभावामुळे होणारा ॲनिमिया (aplastic anemia)
3. रक्तपेशींच्या विघटनामुळे होणारा ॲनिमिया (hemolytic anemia)
4. जुनाट आजारांमुळे होणारा ॲनिमिया
(Image : Google)
रक्तात लोहतत्त्व कमतरता असते, त्याची कारणं कोणती?
१. आहारामध्ये लोहयुक्त खाद्यपदार्थांची कमतरता, समाजातील सधन वर्गामध्ये बदलती जीवनशैली, जंकफूड खाण्याचे वाढते प्रमाण, पौष्टिक आहाराचा अभाव, जेवणाच्या अनियमित वेळा इत्यादी कारणांमुळे याचे प्रमाण अधिक दिसून येते. गरीब वर्गामध्ये पौष्टिक आहाराची कमतरता, निरक्षरता इत्यादी कारणे आहेत.
२. चहा, कॉफी, शीतपेयांसारख्या उत्तेजक पेयांचे अधिक सेवन केल्यामुळे शरिरात लोह शोषण (iron absorption) कमी होते.
३. पोटामध्ये होणारे जंत (hookworn intestation giardiasis)
४. शरिरात कळत-नकळत होणारा रक्तस्त्राव उदा. मूळव्याध, जठरामध्ये व्रण, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव इत्यादी.
५. यकृत/मूत्रपिंड या अवयवांच्या दीर्घ आजाराने पीडित व्यक्तींमध्ये दिसणारा ॲनिमिया.
(Image : Google)
ॲनिमियाची लक्षणे
लवकर थकवा येणे, धाप लागणे, काहीवेळा शरीर व डोके दुखणे, धडधड होणे, चक्कर येणे, चेहरा फिकट दिसणे, एकाग्रता साधण्यास त्रास होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, वारंवार आजारी पडणे, शारीरिक व बौद्धिक वाढ नीट न होणे ही लक्षणे दिसून येतात. ॲनिमिया दीर्घकाळ राहिल्यास नखे ठिसूळ होतात. तीव्र स्वरूपाच्या ॲनिमियामध्ये पायाला किंवा सर्वांगाला सूज येऊ शकते.
ॲनिमियाचे परिणाम कोणते?
वेळेत निदान होऊन उपचार न मिळाल्यास ॲनेमियामुळे शरिरावर बरेच दुष्परिणाम होतात.
हृदयावर व फुप्फुसांवर अतिरिक्त ताण पडून ते निकामी होण्याचा धोका असतो.
थकव्यामुळे व्यक्तीची कार्यक्षमता अगदी कमी होते.
प्रतिकारशक्ती कमी होते.
गर्भवती स्त्रियांमधील ॲनेमियामुळे बाळाची वाढ अपूर्ण राहते, अपुऱ्या दिवसांचे गर्भारपण, कमी वजनाचे बाळ जन्माला येतं व बाळंतपणात गुंतागुंत होऊन आईच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो.
लहान मुलांच्या मानसिक आणि शारीरिक वाढीवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात.
(Image : Google)
ॲनिमिया आहे, हे कसं ओळखणार?
लक्षणांवरून व रक्त तपासणीवरून ॲनिमियाचे निदान करता येते. हिमोग्राम करून रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण तपासून ॲनिमिया आहे की नाही, त्याचा प्रकार आणि त्याची तीव्रता, या गोष्टी समजतात.
सर्वसाधारणत: पौढ पुरुषांमध्ये लोहतत्त्वाचे प्रमाण १३-१७ gmldl तर स्त्रियांमध्ये १२-१५ gmldl असणे जरुरी असते. गर्भवती स्त्रियांमध्ये हे प्रमाण ११-१४ gmldl, शाळकरी मुलांमध्ये हे प्रमाण ११.५-१५.५ gmldl इतके प्रमाण असणे गरजेचे असते. जर हे प्रमाण यापेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तीला ॲनिमिया आहे, असे निदान केले जाते.
ॲनिमियावर उपचार काय?
लोहाच्या आणि आवश्यक तेव्हा जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या जातात. तीव्र ॲनिमिया असल्यास लोहाचे इंजेक्शन आणि गरज पडल्यास रक्तही द्यावे लागते.
(लेखिका स्त्रीरोग चिकित्सक आहेत.)
geetawadnap@gmail.com