वैद्य राजश्री कुलकर्णी (एम.डी. आयुर्वेद)
भारतीय स्त्रियांची मानसिकता आणि जगात इतर प्रगत देशांमधील स्त्रियांची मानसिकता यात फार मूलभूत फरक आहे. भारतीय स्त्री ही कायम स्वतःपेक्षा कुटुंब,त्यातील सदस्य यांचा विचार करणारी आहे मग ते अगदी छोट्या गोष्टीबाबत असो की मोठ्या! घरातील साधं उदाहरण बघितलं तरी ही गोष्ट सहज लक्षात येते. रात्रीच्या जेवणानंतर शिळं अन्न उरलं तर महागाईच्या दिवसांत अन्न टाकून द्यायचं नाही, हा विचार मनात असतोच, पण त्याच वेळी ते अन्न दुसऱ्या दिवशी खाणार कोण, हा प्रश्नदेखील तिच्या मनात येत नाही, कारण ते आपण स्वतःच खाणार आहोत असंच तिनं स्वतःला सांगितलेलं, शिकवलेलं असतं. हाच नियम मग प्रत्येक बाबतीत लागू होतो, नवीन कपडे घ्यायचे असोत, नवीन फोन घ्यायचा असो की वैयक्तिक वापराची एखादी गोष्ट असो, ती स्त्री स्वतःला नेहमी दुय्यम महत्त्व देते आणि घरातील इतर सदस्यांची मनं-मतं जपत राहते. या सगळ्यात जोपर्यंत स्वास्थ्य किंवा आरोग्याचा संबंध नसतो तोपर्यंत देखील हे ठीक आहे, पण कधीकधी तर त्याबाबतीत ही ती स्त्री इतकं दुर्लक्ष करते, स्वतःच्या विषयी कॉम्प्रमाईझ करते की तिची कीवही येते आणि क्वचित रागही........
(Image : Google)
आता ताजं उदाहरण घ्या! हळूहळू थंडी वाढू लागलीय, या दिवसांत पौष्टिक आहार घेतला पाहिजे म्हणजे स्वास्थ्य टिकून राहते, पचनशक्ती चांगली असल्याने खाल्लेलं पौष्टिक खाणं अंगी लागतं हा विचार करून प्रत्येक घरात बायका अगदी झटून, खर्च करून सुक्या मेव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, वड्या बनवतात. यात प्रामुख्याने डिंक, मेथ्या यांचा वापर केला जातो, त्याबरोबर ड्रायफ्रूट्स, गूळ, तूप, डाळी, कणिक, खोबरं वगैरे विविध पदार्थांचा वापर केला जातो. हेच पदार्थ किंवा त्यांचं बदलून बदलून वेगवेगळं कॉम्बिनेशन का तर वास्तविक पाहता यातील बहुतांश पदार्थ हे स्त्रियांच्या आरोग्य रक्षणासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे मासिक पाळीमुळे स्त्रियांच्या शरीरात दर महिन्याला निर्माण होणारी रक्ताची कमतरता, पुढे वयाच्या ठराविक टप्प्यावर होणाऱ्या प्रसूती किंवा बाळंतपणं यामुळे हाडांची होणारी झीज, कॅल्शियम लॉस, त्यायोगे पुढे प्रौढ वयात निर्माण होणाऱ्या कंबरदुखी, ऑस्टिओपोरोसिससारख्या गोष्टी या मुळात निर्माणच होऊ नयेत म्हणून या लाडूंची योजना व त्यातील पदार्थांची रचना आहे! पण खरी गंमत तर पुढेच आहे, दोन चार दिवस तयारी करून, मेहनत घेऊन खपून तयार केलेले हे लाडू बहुसंख्य घरांमधून त्या घरच्या स्त्रिया सोडून बाकीचे सगळे सदस्य खातात. याची दोन तीन महत्त्वाची कारणं आहेत.
(Image : Google)
१. पहिलं म्हणजे पौष्टिक खुराकाची गरज ही फक्त घरातील पुरुष, बच्चे कंपनी आणि ज्येष्ठ सदस्यांनाच आहे हा करुन घेतलेला समज! २. आपण रोजचं साधं जेवण घेतोय तरी आपलं वजन वाढतंय, मग इतकं गोडाचे, फॅट्स असणारे पदार्थ खाल्ले तर काय होईल ही आवाजवी भीती ! ज्यांची कदाचित परिस्थिती बेताची असते, पण नवऱ्याला व मुलांना मात्र चांगलंचुंगलं खायला मिळावं ही ऊर्मी असते त्या म्हणतात, मला मेलीला काय करायचंय इतकं पौष्टिक खाणं? म्हणून जे काही करतील ते घरातील इतरांनाच खाऊ घालतील ! आपणही घरातील एक महत्त्वाचे, घराचा सगळा डोलारा सांभाळणारे सदस्य आहोत,आपल्याही शरीराची झीज होत असते आणि ती भरुन काढण्यासाठी विशेष आहाराची गरज असते हे प्रत्येकीने लक्षात घ्यायला हवं.
(Image : Google)
नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालात मुलं आणि स्त्रिया यांच्यात वाढत चाललेल्या रक्तक्षय किंवा ॲनिमियाच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे, अगदी रक्तातील हिमोग्लोबिन २ आणि ३ इतकं कमी झालं तरी बायका कामच करतात. पांढऱ्याफटक पडलेल्या दिसतात, पण घरातील सगळी कामं ओढताना दिसतात आणि स्वत:कडे सतत दुर्लक्ष करतात. स्वतःला कमी किंवा दुय्यम लेखण्याची मानसिकता जोवर बदलत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार असं वाटतं. स्त्रीपुरुष समान अधिकार वगैरे अशा अगदी मूलभूत गोष्टींपासून राबवायची गरज आहे. बरेचदा तर घरात इतरांच्या ही गोष्ट लक्षात ही येत नाही की हे इतके लाडू घरात बनले आहेत, पण आपली बायको किंवा आपली आई हे कधी खाते की नाही? पण मुळात कोणी काही म्हणायची किंवा आग्रह करण्याची गरजच नाही, आपल्या स्वास्थ्याची जबाबदारी आपलीच आहे, हे प्रत्येकीने लक्षात ठेवलं तर आपोआपच समाजाचं स्वास्थ्य सुधारेल नाही का? त्यामुळे यंदा थंडीत डिंकाचे, मेथ्यांचे, सुक्यामेव्याचे, अळीवाचे लाडू कराल तेव्हा विचारा स्वत:ला की आपण हे लाडू का खात नाही? rajashree.abhay@gmail.com