Join us   

ॲनिमियासह अनेक आजारांना पळवून लावायचेय ? दररोज खा मेथ्या.... कधी आणि कशा ??

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 3:35 PM

मेथ्या कडवट असतात, म्हणून खूपच कमी खाता का ? पण असं करू नका. कारण ॲनिमिया किंवा रक्तशय, मासिक पाळीचे त्रास यासोबतच अनेक आजारांना दूर पळवून लावण्याची क्षमता मेथ्यांमध्ये असते. म्हणूनच दररोज मेथ्या जरूर खाव्यात.

ठळक मुद्दे सौंदर्य वाढविण्यासाठीही मेथ्या खाणे फायदेशीर ठरते. मेथ्यांमुळे मुरूमांचा त्रास कमी होतो आणि त्वचा तजेलदार होते. मेनोपॉजनंतर महिलांना जाणवणारे त्रासही मेथ्या खाल्ल्याने कमी होतात. 

मेथ्या संपूर्ण भारतात खाल्ल्या जातात. परंतू त्यांच्य कडवटपणामुळे मात्र आपण ज्या प्रमाणात मेथ्या खाल्ल्या पाहिजेत, तेवढ्या खात नाही. त्यामुळे त्याचा आरोग्याला म्हणावा तसा फायदा होत नाही. पण जर तुम्हाला ॲनिमिया, रक्तक्षय, मधुमेह यासोबतच अपचन आणि हाडांसंबंधी काही आजार असतील, तर मात्र तुम्ही दररोज मेथ्या खाल्ल्याच पाहिजेत. मेथ्या कशा आणि केव्हा खाव्यात याचेही एक पथ्य असते. 

 

कशा खाव्यात मेथ्या ? मेथ्यांचे दाणे कधीही कच्चे खाऊ नयेत. भिजवून किंवा मोड आणूनच मेथ्या खाव्यात. एका व्यक्तीने १ चमचा या प्रमाणात दररोज मेथ्या खाण्यास हरकत नाही. १ चमचा मेथ्या रात्री पाण्यात भिजत टाकाव्यात आणि सकाळी खाव्या. 

 

मेथ्या खाण्याचे फायदे १. ॲनिमिया कमी करण्यासाठी मेथ्या अत्यंत उपयुक्त ठरतात. २. मेथ्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते.  त्यामुळे ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता, ॲसिडिटी  असे त्रास  असतील, त्यांना मेथ्यांच्या सेवनामुळे खूप फायदा होतो.  ३. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मेथ्या अत्यंत उपयुक्त ठरतात.   ४. नियमितपणे मेथ्या खाल्ल्यास चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मेथ्या उपयुक्त ठरतात. 

५. सौंदर्य वाढविण्यासाठीही मेथ्या खाणे फायदेशीर ठरते. मेथ्यांमुळे मुरूमांचा त्रास कमी होतो आणि त्वचा तजेलदार होते.  ६. महिलांसाठीही मेथ्या खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. यामुळे हार्मोनल इम्बॅलेन्स होत नाही. ७. उच्च रक्तदाबाचा त्रास असेल, तर अशा व्यक्तींनीही दररोज मेथ्या खायला पाहिजेत. ८. आर्थरायटीस आणि साईटिका या आजारांवरही मेथी दाण्यांचे सेवन हा एक चांगला उपाय आहे.

 

महिलांसाठीही मेथ्या अतिशय पौष्टिक मासिक पाळीमध्ये पोट दुखणे, कंबर दुखणे, पायात गोळे येणे असे त्रास अनेक जणींना जाणवतात. हे त्रास कमी करण्यासाठी महिलांनी नियमितपणे मेथ्या खाव्यात. स्तनपान करणाऱ्या मातांसाठीही मेथ्या खाणे फायदेशीर असते. मेनोपॉजनंतर महिलांना जाणवणारे त्रासही मेथ्या खाल्ल्याने कमी होतात. 

 

केसांच्या समस्यांवरही मेथ्यांचा इलाज केस गळणे, केसात कोंडा होऊन दुर्गंधी येणे या समस्यांसाठीही मेथ्यांचा लेप उपयुक्त ठरतो. मेथ्यांचा लेप बनविण्यासाठी मेथ्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी त्या वाटून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळाशी हळूवार हाताने लावा. साधारण एका तासाने केस धुवून टाका.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स