शरीराचे कार्य सुरळीत होण्यासाठी शरीराला विविध घटकांची आवश्यकता असते. लोह हे एक महत्त्वाचं खनिज असून लोहामुळे शरीराला ताकद मिळते. लोहाचे शरीरातील प्रमाण कमी झाले तर शरीरातील लाल पेशी कमी होतात. याबरोबरच आरोग्याच्या इतरही अनेक समस्या निर्माण होतात. हिमोग्लोबीन हा शरीरातील महत्त्वाचा घटक लोहापासूनच तयार होतो. शरीरात लोहाची कमतरता आहे हे जर आपल्याला वेळीच ओळखा आलं तर त्यावर उपचार घेऊन पुढील धोके टाळता येतात. हिमोग्लोबीन आपल्या पूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करते. हिमोग्लोबीन हे फुप्फुसातून ऑक्सिजन घेतं आणि रक्ताद्वारे शरीरभर पोहोचवतं. हेच लोह कमी पडलं तर शरीराला ऑक्सिजन पुरवणं, शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर काढणं यावर परिणाम होतो. लोह कमी पडलं तर अॅनिमिया होतो. अॅनिमियाचा धोका टाळण्यासाठी लोह आणि हिमोग्लोबिन यांचे आहारातील प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. आता हिमोग्लोबिन वाढवायचे तर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा याविषयी आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा (Nutritionist lovneet batra) काही महत्त्वाच्या टिप्स देतात (Diet tips to boost hemoglobin and prevent anemia).
लोहाच्या कमतरतेची लक्षणे
खूप थकवा जाणवणं हे रक्तातील लोह कमी असल्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. लोह कमी असेल तर आपली विचार करण्याची शक्ती कमी होते. शिवाय चिडचिडेपणाही वाढतो. शरीराची त्वचा निस्तेज किंवा पांढरी पिवळी पडते तेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते. श्वास घेण्यास त्रास होणं हे लक्षण पटकन लक्षात येतं. जर जिने चढताना किंवा काही हालचाल करताना, काम करताना जर धाप लागत असेल तर शरीरात लोहाची कमतरता असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. केस गळणे हे लोहाची कमतरता असण्याचे आणखी एक महत्त्वाचे लक्षण आहे.
१. खजूर
खजूरामध्ये लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, फोलिक अॅसिड असे आरोग्यासाठी उपयुक्त असणारे सर्व घटक असतात. खजूरामुळे लाल रक्तपेशी वाढतात आणि अॅनिमिया होण्यापासून आपली होण्यास मदत होते.
२. तीळ
तीळही आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात हे आपल्याला माहित आहे. तीळामध्ये लोह, फोलेट, फ्लेवोनाइडस, तांबे हे घटक भरपूर प्रमाणात असतात. अॅनिमिया कमी होण्यासाठी आणि हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आहारात तीळाचा वापर जरुर करावा. तिळाचा कूट, तीळाचे लाडू, तीळाची चटणी किंवा काही पदार्थांमध्ये आपण तीळाचा वापर करु शकतो.
३. राजगिरा
ही एकप्रकारची पालेभाजी असून ती चवीलाही खूप छान लागते. आपण साधारणपणे मेथी, पालक यांसारख्या भाज्या खातो. मात्र त्याशिवायही बऱ्याच पालेभाज्या महाराष्ट्राच्या विविध भागांत मिळतात. या पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असे गुणधर्म असतात. त्यामुळे त्या भाज्या आवर्जून खायला हव्यात. राजगिऱ्याची परतून केलेली भाजी खूप छान लागते. या भाजीमुळे लाल रक्तपेशी तर वाढतातच पण हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
४. मनुके
आपण सुकामेवा म्हटलं की साधारणपणे काजू आणि बदाम खातो. पण किशमिश किंवा मनुकांना आपण फारसे महत्त्व देत नाही. नैसर्गिकरित्या गोड असलेल्या मनुकांमध्ये लोह आणि तांबे चांगल्या प्रमाणात असल्याने लाल पेशी तयार करण्यासाठी तसेच आरोग्याच्या इतरही अनेक तक्रारींवर मनुके फायदेशीर असतात.
५. बाजरी
आपण रोजच्या आहारात साधारणपणे गहू, तांदूळ फारतर ज्वारी ही धान्ये खातो. मात्र त्याशिवायही बाजरी, नाचणी, मका, राजगिरा ही धान्ये असतात. ही धान्ये शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून त्यांचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असल्याने शरीराला बाजरीतून उष्णता तर मिळतेच पण हिमोग्लोबिनसाठी बाजरी उपयुक्त ठरते. ज्वारीमध्ये बाजरी मिक्स करुनही त्याची भाकरी करता येते. बाजरीची भाजणी, बाजरीची खिचडी अशा पदार्थांच्या माध्यमातून बाजरी खाता येते.