नखंच तर आहेत, काम केल्याने तुटणारच.. असं म्हणून नखांचं वारंवार तुटणं अगदी सहज घेत असाल, तर थांबा.. कारण कोणतीही इजा न होता विनाकारण नखं तुटत असतील तर त्यामागे तुमच्या शरीरात होणारे बदल, एखाद्या आजाराची सुरुवात अशी कारणं असू शकतात. नखे ही गुलाबी रंगाची आणि स्पर्श करताच गुळगुळीत लागणारी हवीत. जर तुमच्या नखांवर उभ्या रेषा दिसत असतील आणि त्यावरून बोट फिरवताच त्यांचा स्पर्श खडबडीत लागत असेल, नखं पिवळसर काळपट दिसत असतील तर तो देखील एक प्रकारचा नखदोष आहे. बिघडलेल्या आरोग्याचं (illness) ते एक लक्षण आहे.
नख वारंवार तुटत असतील तर.. १. ॲनिमिया (anemia) बहुतांश स्त्रियांच्या अकारण नखं तुटण्याचं कारण म्हणजे ॲनिमिया. अनेकजणींना मासिक पाळीच्या (menstruation) काळात खूप ब्लिडिंग होतं आणि आहारातून योग्य पोषण मिळत नाही. या दोन्ही कारणांमुळे अनेक महिलांना रक्तामधील लोहाची कमतरता भासते. तुमची नखं वारंवार तुटतात, नीट वाढत नाहीत याच्यासाठी तुमचा अशक्तपणा हे एक कारण असू शकतं. त्यामुळे तर सगळ्यात आधी रक्तातील लोहाचे प्रमाण तपासून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तात्काळ त्यावरचे उपाय सुरू करा.
२. लिव्हरचा त्रास गुलाबी रंगाची स्वच्छ चमकदार नखं निरोगी आरोग्याचं लक्षण मानलं जातं. पण नखांचा रंग जर पिवळसर किंवा काळपट दिसत असेल तर त्याचं कारण तुमच्या लिव्हरशी संबंधित असू शकतं. ३. कॅल्शियमची कमतरता शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे नखं तुटण्याचं एक मुख्य कारण असू शकतं. नखं तुटण्यासोबतच केसही खूप गळत असतील, केसांची वाढ खुंटली असेल तर लगेचच डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंट सुरु करणं गरजेचं आहे.
हे देखील लक्षात घ्या - पिवळी नखं ही थायरॉईड, फुफ्फुसांचे आजार, मधुमेह किंवा सोरायसिस यासारख्या गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. तसेच पिवळी नखं असण्याचं कारण नखाच्या खाली बुरशीचा संसर्ग असणे हे देखील मानलं जातं. - निळसर नखं शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्याचे दर्शवतात. - सतत तुटणारी नखं असतील तर थायरॉईडची समस्या हे देखील त्यामागचं कारण असू शकतं.