Join us   

सकाळ- संध्याकाळ भरपूर दूध प्यायल्यानेही मुलं होत आहेत ॲनिमिक.. वाचा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2022 4:39 PM

Reasons for anemia in children: शक्ती यावी म्हणून मुलांना सकाळ- संध्याकाळ ग्लास- ग्लास दूध (glass of milk) प्यायला देत असाल तर सावधान... वाचा याविषयी तज्ज्ञ काय सांगत आहेत..

ठळक मुद्दे ग्लास ग्लास दूध दररोज देऊनही मुलं अशक्तच असतील तर हेच दूध कदाचित त्यांच्या ॲनिमियाचं कारण असू शकतं...

मुले दूधच पित नाहीत, अशी अनेक आईंची तक्रार असते. अशा दूध न पिणाऱ्या मुलांच्या मागे त्यांच्या आई दुधाचा ग्लास घेऊन अक्षरश: धावत असतात. मुलाने त्याच्या तब्येतीसाठी दरराेज एखादा ग्लास दूध तरी आवर्जून प्यायलंच पाहिजे, असं तिला वाटत असतं. कसंबसं करून मुलांच्या पोटात दुधाचा ग्लास ढकलला, की मग त्या माऊलीला जणू जग जिंकल्याचा आनंद होतो.. एवढं ग्लास ग्लास दूध दररोज देऊनही मुलं अशक्तच असतील तर हेच दूध कदाचित त्यांच्या ॲनिमियाचं कारण असू शकतं... (anaemia in children)

 

National Family Health Survey यांच्या नुकत्याच झालेल्या सर्व्हेक्षणानुसार असं दिसून आलं आहे की ६ ते ५९ महिने या वयोगटातील लहान बालकांना होणाऱ्या ॲनिमियाच्या प्रमाणात जवळपास २० टक्क्यांनी घट झाली आहे. ही समाधानकारक बाब निश्चितच आहे. मात्र या सर्व्हेक्षणांतर्गत चंदीगढ येथे झालेल्या ‘Child Feeding Practices and Nutritional Status of Children’ या अभ्यासानुसार असं लक्षात आलं आहे की चंदीगढ येथील ६ ते ५९ महिने या वयोगटातील ५४. ६ टक्के मुलं ॲनिमिक आहेत. तसेच १५ ते ४९ या वयोगटातील जवळपास ६० टक्के महिला ॲनिमिक असून याच वयोगटातील पुरुषांचे प्रमाण ८ टक्के आहे. 

 

लहान बालके आणि महिलांमधील ॲनिमियाचं प्रमाण खरोखरंच चिंताजनक आहे. भारतात एकुणच महिला आणि बालकांमधलं ॲनिमियाचं प्रमाण खूप जास्त आहे. शरीरात रक्त तयार होण्याची प्रक्रिया कमी प्रमाणात होऊ लागली की हिमोग्लोबिन, शरीरातलं लोह कमी होतं. यालाच ॲनिमिक असणं किंवा रक्ताशय होणं असं म्हणतात. शरीराला योग्य प्रमाणात पौष्टिक पदार्थ मिळाले नाहीत, तर ॲनिमियाचा त्रास सुरू होतो. लवकर थकवा येणे, अशक्तपणा, कोणत्याच कामात उत्साह नसणे, त्वचा निस्तेज दिसणे, केस गळणे ही सगळी ॲनिमियाची लक्षणे आहेत. 

 

लहान मुलांमधले ॲनिमियाचे प्रमाण, याविषयी सांगताना PGI चे डॉ. दिपक बन्सल म्हणाले की, लहान मुलांना गरजेपेक्षा जास्त दूध देणे हे त्यांच्यातल्या ॲनिमियाचे एक कारण असू शकते. १ ते ५ वर्षाच्या मुलांना दिवसभरातून ५०० ते ६०० मिली दूध पुरेसे आहे. औरंगाबाद येथील आहारतज्ज्ञ मंजिरी कुलकर्णी म्हणाल्या की, खरेतर मुलांना दूध देऊच नये. लहान मुलांना वरचे दूध देण्याची गरज नाही. खूप जास्त दूध दिल्यामुळे शरीरातील लोहनिर्मिती कमी होते आणि त्यामुळे मग लहान मुलांना ॲनिमियाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे मुले दूध प्यायला नकार देत असतील, तर त्यासाठी खूप चिंता करण्याची गरज नाही. दुधाव्यतिरिक्त इतर अनेक पौष्टिक पदार्थ खाऊ घालून तुम्ही त्यांचे उत्तम संगोपन करू शकता.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सदूधअ‍ॅनिमियालहान मुलं