तोंडात एखादा फोड येणे किंवा अल्सर होणे, याला आपण बोली भाषेत तोंड येणे असं म्हणतो. वारंवार होणारा हा त्रास खूपच भयंकर असतो. काही खाल्लं किंवा अगदी पाणी प्यायलं तरी खूपच वेदना होतात. त्यामुळे मग हा त्रास टाळण्यासाठी तोंड आल्यावर अनेकजण स्वत:ची उपासमार सुरू करतात. उपाशी राहिल्याने ही समस्या सुटत नाही. उलट आणखीनच वाढत जाते. कारण पोटात अन्न कमी असल्याने ॲसिडीटी होते, कुणाची उष्णता वाढते. त्यामुळे मग अल्सरचा त्रास आपोआपच आणखी वाढत जातो.
तोंड का येते ?
- शरीरातील उष्णता वाढल्यामुळे तोंड येते.
- मसालेदार पदार्थ खाणे काही जणांच्या प्रकृतीला मानवत नाही. त्यामुळेही तोंड येऊ शकते.
- तोंड येणे या समस्येचे मुळ बऱ्याचदा तुमच्या पचन संस्थेमध्ये असते. पचनाचे त्रास असणाऱ्या व्यक्तींचे वारंवार तोंड येते.
- शरीरात व्हिटॅमिन बी ची कमतरता असल्यावरही तोंड येण्याचे प्रमाण वाढते.
- पालेभाज्या न खाणाऱ्या किंवा खूपच कमी प्रमाणात खाणाऱ्या व्यक्तींना असा त्रास होतो.
- सतत चहा- कॉफी घेणे, किंवा तंबाखू, धूम्रपान, दारू यासारखी व्यसने असणाऱ्या व्यक्तींचे तोंड येते.
- पोटात जंत असतील किंवा काही जुनाट आजार असतील तर तरीही तोंड येते.
हे काही घरगुती उपाय करून पहा
१. कोथिंबीरीचा रस काढा. एखादा चमचा रस तोंडात घ्या आणि एखादा मिनिटभर तोंडात ठेवा. चूळ भरल्यासारखे करा. दिवसातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास एक दोन दिवसातच आराम पडेल.
२. विलायची पावडर आणि मध एकत्र करून घ्या. हे मिश्रण तोंड आले असेल, तेथे लावा.
३. पेरूच्या झाडाची पाने पाण्यात उकळून घ्या. कोमट झाल्यावर या पाण्याने गुळण्या करा. पेरूची एकदम रापलेली आणि अतिशय कोवळी अशी दोन्ही प्रकारची पाने घेऊ नका. मध्यम स्वरूपाची पाने घ्या.
४. एक ग्लास काेमट पाणी घ्या. त्यामध्ये एक टी स्पून मीठ घाला. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून ३ ते ४ वेळेस हा प्रयोग केला तरी हरकत नाही. पटकन आराम वाटेल.
५. तुळशीची ४ ते ५ वेळेस तुळशीची ५- ५ पाने बारीक चावून खा.
६. खोबऱ्याचे तुकडे बारीक चावून खाल्ल्यानेही तोंडातील जखमा कमी होतात.