लोह हे शरीरातलं महत्त्वाचं खनिज आहे. लोहामुळेच शरीराला ताकद मिळते. लोह जर कमी असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे रोग संभावतात. यासोबतच शरीरातील लाल पेशी कमी होतात. हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी लोहाची अत्यंत आववश्यकत असते. हीमोग्लोबीन एक प्रकारे प्रथिनांचं काम करतं. जे आपल्या पूर्ण शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतं.
आपल्या शरीरात लोहाची कमतरता आहे हे जर आपल्याला वेळीच ओळखा आलं तर त्यावर उपचार घेऊन पुढील धोके टाळता येतात. लोह कमी आहे हे ओळखण्याची पाच महत्त्वाची लक्षणं आहेत. त्याकडे जागरुकपणे पाहायला हवं .
शरीरात लोहाची कमतरता कशी ओळखाल?
खूप थकवा आणि चिडचिड
खूप थकवा येणं, जाणवणं हा रक्तातील लोह कमी असल्याचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. तसेच सतत थकवाही जाणवत राहातो. आपली विचार करण्याची शक्ती कमी होते. शिवाय चिडचिडेपणाही वाढतो. जर सतत थकल्यासारखं वाटत असेल आणि पूरेसा आराम करुनही थकवा जात नसेल तर मग आपल्याला रक्त तपासून घेण्याची गरज आहे हे जाणून घ्यावं.
शरीर पांढरं पडतं. निस्तेज दिसतं
शरीराची त्वचा निस्तेज किंवा पांढरी पिवळी पडते तेव्हा शरीरात लोहाची कमतरता असते. जेव्हा शरीरातील लोह कमी कमी होत जातं तसा त्वचेचा मूळ गुलाबी रंग जातो आणि त्वचा फिकट आणि निस्तेज दिसायला लागते. डोळ्यांच्या कडा, हिरड्या आणि नखं , ओठ हे गूलाबी किंवा लालसर न दिसता ते जर पांढरे किंवा पिवळे पडले असतील तर शरीरात लोहाची कमतरता आहे हे समजावं.
श्वास घेण्यास त्रास होणं
श्वास घेण्यास त्रास होणं हे लक्षण पटकन लक्षात येतं. जर जिने चढताना किंवा काही हालचाल करताना, काम करताना जर धाप लागत असेल तर शरीरात लोहाची कमतरता असते.
जीव घाबरणं
हदयाच्या ठोक्यांची गती वाढलेली असणं हे लोहाच्या कमतरतेचं लक्षण आहे. शरीरात लोह कमी असेल तर हिमोग्लोबीन कमी असतं. आणि त्यामुळे हदयाला एरवीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात. त्याचाच परिणाम म्हणजे जीव घाबरल्यासारखा होतो. हे लक्षण खूप वेळ जाणवत असतं. पण त्याकडे सहसा दुर्लक्ष झाल्यानं जीव घाबरण्याचं प्रमाण वाढतं.
केस गळणं
शरीरात कोणत्याही पोषक मूल्याची कमतरता निर्माण झाल्यास तर शरीर आपले प्राधान्यक्रम स्वत: ठरवतं. कुठे रक्त पुरवठा होणं आवश्यक आहे हे शरीर ठरवतं. परिणामी मेंदू आणि ह्दयाच्या तुलनेत नखं आणि केस त्याला इतके महत्त्वाचे वाटत नाही. मग शरीराचं नखं आणि केसाकडे दुर्लक्ष होतं आणि केस गळायला लागतात. केस जर नेहेमीपेक्षा जास्त आणि सतत गळत असतील तर शरीरात लोहाची कमतरता आहे हे ओळखून लगेच डॉक्टरांना गाठावं.