अनेक बायकांचा आठवड्यातून एकदातरी उपवास असतो. तर काहीजणी महत्वाच्या धार्मिक सणांना उपवास धरतात. या महिन्यापासून अंगारकी चतुर्थी, एकादशी असे अनेक महत्वाचे उपवास आहेत. अशात आठवड्याचा ठरलेल्या वाराचा उपवास आणि सणांच्या दिवशीचे उपवास करून नकळतपणे अशक्तपणा येतो. काही महिला बीपी, डायबिटीस असे आजार असूनही आवड म्हणून उपवास करतातच. अशावेळी आलेला थकवा आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. जेणेकरून शरीरात पोषक घटकांची कमतरता भासणार नाही.
१) अपूर्ण झोप हे थकवा येण्यामागचं कारण असतं. त्यामुळे भरपूर झोप घ्या. जरी तुम्ही सकाळपासून उपवास केला असेल तरी रात्री उपवास सोडताना पोटभर जेवून व्यवस्थित झोप घ्या. थंड पाण्याने अंघोळ केल्यासही फ्रेश वाटतं. त्यामुळे तुमचा थकवा दूर होतो.
२) जेवणातून तुमच्या शरीराला ताकद मिळते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवण खाणे आवश्यक आहे.
३) फळं आणि साधा आहार घेऊन उपवास केल्यास पचनकार्यालाही चालना मिळते. पचनसंस्थेवर आलेला दाब थोड्या प्रमाणात हलका करण्यास मदत होते. अशक्तपणा जाणवू नये म्हणून उपवासाला सिजनल फळं खाण्याचा प्रयत्न करा. तळलेले वेफर्स, चिवडा खाणं टाळा.
(छायाचित्र- गुगल)
४) जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले ठेवता येते. मात्र जर कोणी डायबिटीज आणि उच्च हाय ब्लडप्रेशरचे रुग्ण असेल तर उपवास ठेवताना त्याने थोडा विचार करायला हवा. अशा व्यक्तींना उपवास करण्याआधी आपल्या डॉक्टरांकडूनदेखील अवश्य सल्ला घ्यायला हवा. जर आपल्याला गोळ्या घ्याव्या लागत असतील तर त्या वेळेवर घ्याव्यात.
५) जास्तीत जास्त पाणी प्या. दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी प्यायला हवे. प्रोटिन्सयुक्त पदार्थांचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त करू नका. संत्र्यामध्ये व्हिटामीन सी, पोटॅशियम, फ्लेवोनॉइड्स, असते. त्यामुळे शरीरातील युरिक एसिड बाहेर निघण्यास मदत होते. शरीरातील युरिक एसिडची पातळी नियंत्रणात राहते. व्हिटामीन सी युक्त फळं खाण्याचा प्रयत्न करा.
६) शारीरिकदृष्या बळकट राहण्यासाठी रोज व्यायाम करा. उपवासामुळे थकल्यासारखं वाटत असेल तर कमी वेळ व्यायाम करा. पण व्यायाम चुकवू नका.