सोशल मिडियाचा उपयोग अनेक अभिनेत्री त्यांचा फिटनेस मंत्र शेअर करण्यासाठी करत असतात. मलायका अरोरा (Malaika Arora), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) या अभिनेत्री तर फिटनेसविषयीची एक पोस्ट आठवड्यातून एकदा तरी हमखास पोस्ट करतातच. सारा अली खान, माधुरी दिक्षित, आलिया भट यादेखील सतत इन्स्टाग्रामवर ॲक्टीव्ह असतात. आता याच रांगेत आली आहे आणखी एक अभिनेत्री. मैने प्यार किया फेम अभिनेत्री भाग्यश्री दर मंगळवारी तिच्या चाहत्यांना फिटनेस (fitness tips) विषयीचा एक कानमंत्र देत असते. भाग्यश्रीने या आठवड्यात तिच्या चाहत्यांना आहारातील झिंकचे महत्त्व समजावून सांगितले आहे.
भाग्यश्रीने एक व्हिडियो नुकताच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केला आहे. यामध्ये ती सांगते की झिंक हा आपल्या आहारातील एक मायक्रो न्युट्रियंट (zinc is a micro nutrient) आहे. पण तो आपल्या आरोग्यावर मॅक्रो म्हणजेच मोठा परिणाम करत असतो. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात झिंक असणे अतिशय गरजेचे आहे. आपले शरीर झिंक आपोआप तयार करू शकत नाही. त्यामुळे शरीराला बाहेरून म्हणजेच आहारातून झिंकचा पुरवठा होणं गरजेचं असतं. यातही मांसाहारी लोकांना अनेक मांसाहारी पदार्थातून झिंकचा पुरवठा होतो. तसा तो शाकाहारी लोकांना होत नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांनी झिंकचा पुरवठा करणारे पदार्थ आवर्जून आहारात घ्यायला हवेत.
झिंक हे मुळातच मायक्रो न्युट्रियंट असल्यामुळे शरीराला खूप जास्त प्रमाणात झिंकची गरज नसते. तज्ज्ञांच्या मते ६ महिने ते १३ वर्षे या वयोगटातील मुलांना दररोज २ ते ८ मिलिग्रॅम झिंकची गरज आहे. १४ ते १८ वर्षे या वयोगटातील किशोरवयीन मुलांना दररोज ९ ते ११ मिलीग्रॅम, १८ वर्षांवरील प्रौढांना ८ ते ११ मिलीग्रॅम तर स्तनपान करणाऱ्या मातांना ११ ते १२ मिलीग्रॅम झिंकची गरज असते. स्त्रियांपेक्षा पुरूषांना दररोज २ ते ३ मिली ग्रॅम अधिक झिंकची गरज असते.
झिंकच्या कमतरतेमुळे आरोग्यावर होणारे परिणाम
Deficiency of zinc may causes....
- झिंकची कमतरता असेल तर खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे भुक मंदावण्याचा त्रास अशा व्यक्तींना होऊ शकतो.
- केस गळणे, डोक्यात नेहमीच खूप कोंडा असणे हे देखील झिंकची कमतरता असण्याचे लक्षण आहे.
- त्वचेवर वारंवार पुरळ उठणे, जखम लवकर भरून न येणे, लालसर चट्टे येणे, अंगावर वारंवार फोडं येणे यातून झिंकची कमतरता दिसून येते.
- झिंकची कमतरता असणाऱ्यांना वारंवार अतिसाराच्या त्रासाला सामोरे जावे लागते.
- झिंकच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती दिवसेंदिवस कमी होत जाते.
- धुळीची ॲलर्जी नसेल, थंडीत जाणे नसेल, तरीही वारंवार सर्दी होत असेल, तर ते झिंकची कमतरता असण्याचे लक्षण असू शकते.
- स्त्रियांमध्ये झिंकची कमतरता मासिक पाळीतली अनियमितता, पाळीत खूप जास्त वेदना यावरून दिसून येते.
- डोळ्यांवर फोड येण्याचा त्रासही झिंकच्या कमतरतेमुळे दिसून येतो.
झिंकची मात्रा अधिक झाली तर..
over dose of zinc is also harmful
झिंक हे मायक्रो न्युट्रियंट आहे. त्यामुळे त्याची शरीराला खूप कमी प्रमाणात गरज असते. ज्याप्रमाणे योग्य प्रमाणात झिंक मिळाले नाही, तर वेगवेगळे आजार होतात, त्याचप्रमाणे शरीरात खूप जास्त प्रमाणात झिंक असल्यानेही अनेक त्रास होऊ शकतात. कोलेस्टरॉलची पातळी कमी होणे, ओटीपोटात दुखणे, सतत डाेकेदुखी, मळमळ, ॲसिडीटी असा त्रास झिंकचे शरीरातील प्रमाण वाढले तर होऊ शकतो.
कोणत्या शाकाहारी पदार्थांमधून मिळते झिंक
Zinc rich diet
काजू, बदाम, शेंगदाणे, भाेपळ्याच्या बिया, तीळ, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी, हरबरा, ओट्स, गहू, बटाटा, वाटाणे, डार्क चॉकलेट, मसूर, सोयाबीन.