Lokmat Sakhi >Health >Anemia > हिमोग्लोबीन कमी, ॲनिमिक असण्याची लक्षणं कोणती? महिलांना का होतो हा आजार?

हिमोग्लोबीन कमी, ॲनिमिक असण्याची लक्षणं कोणती? महिलांना का होतो हा आजार?

ॲनिमिया होण्याचे प्रमाण भारतीय महिलांमध्ये खूप जास्त आहे. रक्तात लोहाचे प्रमाण कमी कशाने होते? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 05:14 PM2022-08-10T17:14:12+5:302022-08-10T17:21:26+5:30

ॲनिमिया होण्याचे प्रमाण भारतीय महिलांमध्ये खूप जास्त आहे. रक्तात लोहाचे प्रमाण कमी कशाने होते? 

What causes a woman's hemoglobin to be low? What are the 3 main causes of anemia? | हिमोग्लोबीन कमी, ॲनिमिक असण्याची लक्षणं कोणती? महिलांना का होतो हा आजार?

हिमोग्लोबीन कमी, ॲनिमिक असण्याची लक्षणं कोणती? महिलांना का होतो हा आजार?

Highlightsअवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. त्याचबरोबर सर्वसाधारण प्रतिकारशक्ती कमी होते.

- डाॅ. गीता वडनप

ॲनिमिया हा आजार काही भारतीय स्त्रियांमध्ये नवा नाही. ग्रामीण असो की शहरी अनेक स्त्रियांचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीच असते. आणीबाणी येत नाही, डॉक्टर सांगत नाही तोवर त्यासाठीची ना औषधं घेतली जातात ना आहार बदल केला जातो. त्यामुळे महिलांमध्ये ॲनिमिया ही समस्या गंभीर होते. त्यातून प्रतिकारशक्ती कमी झाल्यानं अन्य आजारही मागे लागतात. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’ची निरीक्षणं सांगतात की (anemia) स्त्रियांमधील ‘ॲनिमिया’चं प्रमाण वाढलं आहे. खरंतर ॲनिमिया हा भारतीय महिला आणि मुलांमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या आजारांपैकी एक आजार आहे. आज देशात ५० टक्क्यांपेक्षा जास्त स्त्रिया आणि मुले या आजाराने त्रस्त आहेत.  ही आकडेवारी  गंभीर आहे. ॲनिमिया म्हणजे रक्तातल्या लाल पेशी किंवा हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे रक्ताची ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होणे. यामुळे पेशींना मिळणारा ऑक्सिजन कमी होतो आणि अवयवांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो. त्याचबरोबर सर्वसाधारण प्रतिकारशक्ती कमी होते.

(Image : Google)

ॲनिमियाचे नक्की प्रकार कोणते असतात?

1. पौष्टिक तत्त्वांच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया (nutritional anemia)
(अ) लोहतत्त्व कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया (iron deficiency anemia)
(ब) जीवनसत्त्व ब व फोलिक ॲसिड कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया (megaloblastic anemia)
2. हाडामधील मूळ रक्तपेशींच्या अभावामुळे होणारा ॲनिमिया (aplastic anemia)
3. रक्तपेशींच्या विघटनामुळे होणारा ॲनिमिया (hemolytic anemia)
4. जुनाट आजारांमुळे होणारा ॲनिमिया

रक्तात लोह का कमी असते?

१. आहारामध्ये लोहयुक्त खाद्यपदार्थांची कमतरता, समाजातील सधन वर्गामध्ये बदलती जीवनशैली, जंकफूड खाण्याचे वाढते प्रमाण, पौष्टिक आहाराचा अभाव, जेवणाच्या अनियमित वेळा इत्यादी कारणांमुळे याचे प्रमाण अधिक दिसून येते. गरीब वर्गामध्ये पौष्टिक आहाराची कमतरता, निरक्षरता इत्यादी कारणे आहेत.
२. चहा, कॉफी, शीतपेयांसारख्या उत्तेजक पेयांचे अधिक सेवन केल्यामुळे शरिरात लोह शोषण (iron absorption) कमी होते.
३. पोटामध्ये होणारे जंत (hookworn intestation giardiasis)
४. शरिरात कळत-नकळत होणारा रक्तस्त्राव उदा. मूळव्याध, जठरामध्ये व्रण, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव इत्यादी.


(Image : Google)

ॲनिमिक असण्याची लक्षणं कोणती?

लवकर थकवा येणे, धाप लागणे, काहीवेळा शरीर व डोके दुखणे, धडधड होणे, चक्कर येणे, चेहरा फिकट दिसणे, एकाग्रता साधण्यास त्रास होणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे, वारंवार आजारी पडणे, शारीरिक व बौद्धिक वाढ नीट न होणे ही लक्षणे दिसून येतात. ॲनिमिया दीर्घकाळ राहिल्यास नखे ठिसूळ होतात. तीव्र स्वरूपाच्या ॲनिमियामध्ये पायाला किंवा सर्वांगाला सूज येऊ शकते.

(Image : Google)

करायचं काय?

लक्षणांवरून व रक्त तपासणीवरून ॲनिमियाचे निदान करता येते. 
सर्वसाधारणत: पौढ पुरुषांमध्ये लोहतत्त्वाचे प्रमाण १३-१७ gmldl तर स्त्रियांमध्ये १२-१५ gmldl असणे जरुरी असते. गर्भवती स्त्रियांमध्ये हे प्रमाण ११-१४ gmldl, शाळकरी मुलांमध्ये हे प्रमाण ११.५-१५.५ gmldl इतके प्रमाण असणे गरजेचे असते. जर हे प्रमाण यापेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तीला ॲनिमिया आहे, असे निदान केले जाते.
लोहाच्या आणि आवश्यक तेव्हा जीवनसत्त्वाच्या गोळ्या दिल्या जातात. तीव्र ॲनिमिया असल्यास लोहाचे इंजेक्शन आणि गरज पडल्यास रक्तही द्यावे लागते.

(लेखिका स्त्रीरोग चिकित्सक आहेत.)
geetawadnap@gmail.com

 

Web Title: What causes a woman's hemoglobin to be low? What are the 3 main causes of anemia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.