रक्तदान केल्यानं फक्त एखाद्या व्यक्तीचा जीव वाचत नाही तर आपल्या शरीरासाठीही रक्तदान फायद्याचं ठरतं. तरीसुद्धा अनेकजण रक्तदान करायला घाबरतात. करावं की नाही असा संभ्रम यांच्या मनात असतो. एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार रक्तदान केल्यानं हृदयाच्या आरोग्यात सुधारणा होते. याशिवाय वजनही नियंत्रणात राहातं. इतकंच नाही तर रक्तदात्याच्या मनावर आणि शरीरावरही चांगला प्रभाव पडतो. म्हणून लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याासाठी आज १४ जूनला जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो.
18 ते 60 वर्ष या वयोमर्यादेतील कोणतीही व्यक्ती रक्तदान करू शकते. फक्त यासाठी केवळ काही महत्त्वपूर्ण बाबींसहीत निरोगी आयुष्य असणे आवश्यक आहे. शरीरात हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असल्यास महिलादेखील रक्तदान करू शकतात. मात्र, मासिक पाळी, गर्भवती महिला, बाळंतपणादरम्यान महिलांनी रक्तदान करू नये.
१) हृदयासाठी फायदेशीर- रक्तदान करणं शरीरासाठी खूप फायद्याचं असतं. त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो. असं मानलं जातं की रक्तात आयरनचे जास्त प्रमाण हृदयरोगाचा धोका वाढण्यास कारणीभूत ठरते. म्हणून नियमित रक्तदान केल्यानं आयरनचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.
२) लाल रक्त पेशींचे उत्पादन- रक्तदानानंतर शरीरात नवीन रक्त तयार होत जातं. त्यामुळे शरीरातील पेशी लाल रक्ताच्या पेशी निर्माण करण्यासाठी प्रेरित होतात. परिणाम आरोग्य चांगलं राहून शरीराला अनेक फायदे मिळतात.
३) वजन नियंत्रणात राहतं - रक्तदान कॅलरीज कमी करण्यासाठी तसंच वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. लाल रक्तपेशींचा स्तर पुढील काही महिन्यात नियंत्रणात येतो. या दरम्यान वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते फक्त योग्य डाएट आणि व्यायाम असायला हवा.
४) कॅन्सरचा धोका कमी- नियमित रक्तदान केल्यानं शरीराला आयरनचं अधिक प्रमाण होण्यापासून रोखता येऊ शकतं. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय रक्तदानामुळे तुम्ही तब्येतीबाबत जास्त एक्टिव्ह राहता.
५) तब्येतीची तपासणी- आरोग्यदायी फायद्यांव्यतिरिक्त रक्तदान प्रक्रियेमध्ये रक्तदानापूर्वी तुमचे रक्त आणि आरोग्याची वैद्यकीय तपासणी केली जाते. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी तपासली जाते, संसर्ग, आजारांची तपासणी केली जाते. रक्तचाचणीद्वारे एखादी व्यक्ती रक्तदान करण्यास सक्षम आहे की नाही, याची माहिती मिळते. यामुळे नियमित स्वरुपात रक्तदानामुळे तुम्ही स्वतःच्या आरोग्याची योग्यरितीने देखभालही करू शकता.
त्यामुळे घाबरण्याचं काहीहीही कारण नाही तुम्ही आधी डॉक्टरांचा सल्ला घेऊन निश्चिंतपणे रक्तदान करू शकता. आजही खूप लोकांचा गैरसमज आहे की, रक्तदान केल्यामुळे हीमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खरं पाहता असे काही नसते. रक्तदान केल्यानंतर 21 दिवसांनंतर शरीरात नवीन रक्त तयार होतं.