अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) जेव्हापासून प्रेग्नंट आहे, तेव्हापासून तिच्या गरोदरपणाविषयीचे वेगवेगळे किस्से नेहमीच ऐकायला येतात. कारण बिपाशा सोशल मिडियावर खूप जास्त ॲक्टीव्ह असते. त्यात आता प्रेग्नन्सीमुळे (Pregnancy) तिच्याकडे वेळच वेळ असल्याने ती गरोदरपणातला तिचा अगदी लहानसा अनुभवही आनंदाने सोशल मिडियाद्वारे तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मध्यंतरी बिपाशाने बाळाचे छोटे- छोटे कपडे आणि ती त्या कपड्यांच्या घड्या घालत असतानाचे काही फोटो शेअर केले होते. आता पुन्हा एकदा तिने अशीच एक इस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे, जी तिला सध्या असणाऱ्या बेडरेस्टविषयी आहे (Bipasha is not happy with the bedrest during pregnancy).
गरोदरपणातला अनुभव प्रत्येकीसाठी वेगवेगळा असतो. कुणाला या काळात खूपच कमी त्रास होतो तर कुणाला अगदी ९ महिने दररोजच वेगवेगळ्या त्रासांना सामोरे जावे लागते. पण जसाजसा सातवा महिना सुरू हाेतो, तसं तसं प्रत्येक गरोदर स्त्रीलाच अवघडून गेल्यासारखं होतं. तिच्या सगळ्याच हालचाली अगदी हळूवार होऊन जातात. बसणं- उठणं- चालणं- फिरणं अवघड होऊन जातं. ज्यांना तब्येतीच्या वेगवेगळ्या समस्या असतात, त्यांना तर या काळात आराम करण्याचा म्हणजेच बेडरेस्टचा सल्ला दिला जातो. तसंच काहीसं बिपाशाच्या बाबतीत झालं आहे.
तिला बाळंतपणापुर्वीचा हा आराम अगदी नकोसा झाला आहे. यामागचं कारण सांगताना ती म्हणते की बाळंतपणाची तारीख जशीजशी जवळ येऊ लागते, तशीतशी होणाऱ्या आईला बाळासाठी अनेक गोष्टींची तयारी करून ठेवावी लागते. बाळाचे कपडे, स्वत:चे कपडे, बॅग पॅकिंग, इतर आवश्यक सामानाची तयारी, अशा बऱ्याच गोष्टी असतात. यावेळी नेमकी बेडरेस्ट असेल, तर ही सगळी कामं करणं कठीण होऊन बसतं. बिपाशा सांगते, ते तर एक कारण आहेच. पण बाळ झाल्यानंतर अनेक बंधनं येणारच असतात. त्यामुळे बाळ होण्याच्या आधी मुक्तपणे फिरावं, काय आवडतं ते करून घ्यावं, असे अनेक जणींना वाटतं. त्यामुळेही बाळंतपणाच्या आधीची बेडरेस्ट अनेकींना नकोशी वाटते. याविषयी तुम्हाला काय वाटतं?