Join us  

जीवघेणा ब्रेन स्ट्रोक टाळता येतो का? कशामुळे होतो हा आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2022 5:31 PM

world stroke day 2022 मेंदूचे आजार गुंतागुतींचे, त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोक्याचं असतं.

दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी जागतिक स्ट्रोक दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जीवघेण्या स्ट्रोकबद्दल जनजागृती करणे हा आहे. ज्याप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाच्या कामात अडथळे निर्माण होतात त्याचप्रमाणे मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाल्याने मेंदूचा झटका येऊ शकतो. स्ट्रोक हा जागतिक पातळीवर वाढणारा गंभीर आजार आहे. दरवर्षी जगामध्ये ८ लाखापेक्षा अधिक लोकांना हा आजार उद्भवतो. त्याची लक्षणे तत्काळ ओळखणे तसेच त्वरित उपचार आवश्यक आहेत.

स्ट्रोकचे दोन प्रकार असतात

मायनर स्ट्रोक

जेव्हा मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही, तेव्हा आर्टिलरी फुटते, त्यामुळे मेंदूच्या भागात रक्ताची गुठळी निर्माण होते, याला मायनर स्ट्रोक म्हणतात.

मेजर स्ट्रोक

जेव्हा आर्टिलरी फुटते तेव्हा त्यातून जास्त रक्तस्राव होतो आणि मेंदूच्या काही भागात जमा होतो. त्यामुळे मेंदू काम करू शकत नाही आणि समस्या वाढू लागतात.

महिला आणि पुरुषांमध्ये स्ट्रोक येण्यापूर्वी कोणत्या प्रकारची लक्षणे दिसतात?

१. खूप अशक्तपणा

जर एखाद्याने अचानक अशक्तपणाची तक्रार केली तर त्याला दुर्लक्ष करु नये. लक्षणे दिसू लागल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

२. दृष्टी कमी होणे

अचानक दृष्टी कमी होणे स्ट्रोकशी जोडलेले आहे. अशक्तपणा, हात-डोळा समन्वय कमी होणे, स्पर्श केल्यावर जाणीव कमी होणे, बोलण्यात अडचण येणे ही सर्व स्ट्रोकची लक्षणे आहेत. ही लक्षणे कालांतराने आणखी वाईट होत जातात.

३. अचानक चक्कर येणे

जर एखादी व्यक्ती अचानक पडली किंवा तोल गेल्याने पडली तर याचा अर्थ असा होतो की काहीतरी बरोबर नाही. मळमळ, उलट्या, ताप यासह अचानक अस्पष्टपणे पडणे हे सर्व हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या दर्शवितात. काही रुग्णांना स्ट्रोकपूर्वी हिचकी येते किंवा गिळण्यास त्रास होतो.

४. तीव्र डोकेदुखी

अधूनमधून डोकेदुखी ही एक गोष्ट आहे, परंतु जर ती तुम्हाला वारंवार त्रास देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तीव्र डोकेदुखीची तक्रार केल्यानंतर बहुतेक रुग्ण लवकरच बेहोश होतात. थोडा वेळ मूर्च्छा येणे किंवा चक्कर येणे याकडे दुर्लक्ष करू नका.

स्ट्रोक कसा ओळखायचा ?

(फेस ड्रूपिंग)

जर एखादी व्यक्ती हसताना अस्वस्थ दिसली, चेहऱ्याच्या एका बाजूला मुंग्या आल्यासारखे वाटत असेल किंवा चेहऱ्याच्या काही भागात बधीरपणा जाणवत असेल तर ते स्ट्रोकच्या धोक्याचे लक्षण असू शकते. हसताना कधी कधी चेहरा वाकडा दिसतो.

हाताची कमजोरी (आर्म वीकनेस)

दोन्ही हात उचलल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला सुन्न किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्याला पक्षाघाताचा धोका असू शकतो. हातातले बळ जाणे याकडे दुर्लक्ष करू नका.

बोलण्यात अडचण (स्पीच डिफिकल्टी)

एखाद्या व्यक्तीला बोलण्यात त्रास होत असेल किंवा कोणताही शब्द नीट उच्चारता येत नसेल तर ही समस्या स्ट्रोकशी संबंधित असू शकते. अशा व्यक्तीला सोपे शब्द द्या आणि त्याला बोलण्यास सांगा. जर त्याला बोलता येत नसेल तर समजून घ्या की समस्या वाढत आहे.

(टाइम टू कॉल)

यापैकी इतर कोणतेही लक्षणे व्यक्तीमध्ये दिसल्यास आरोग्य विभागाला फोन करून त्याची माहिती त्वरित द्यावी. त्यामुळे त्या व्यक्तीला वेळेत वाचवता येते, आणि उपचार देखील मिळेल. याशिवाय स्ट्रोकची इतरही अनेक लक्षणे आहेत. 

या सवयी त्वरित बदला..

दारू पिऊ नका

तंबाखूचे सेवन टाळा

नियमित व्यायाम करा

आहार संतुलित ठेवा

सॅच्युरेटेड फॅट, मीठ, ट्रान्स फॅट आणि उच्च कोलेस्टेरॉल असलेले पदार्थ टाळा

भरपूर फळे आणि भाज्या खा.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्स