Lokmat Sakhi >Health > PCOD आहे? तातडीने लाइफस्टाइल सुधारा, त्यासाठी हा उत्तम आहार घ्या!

PCOD आहे? तातडीने लाइफस्टाइल सुधारा, त्यासाठी हा उत्तम आहार घ्या!

पीसीओडीत अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सुरुवात होऊ शकते. जसे की अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा होण्यास अडचणी येणं, अचानक वजन वाढणं, चेहरा आणि अंगावरची चरबी वाढणं, अंगदुखी आणि पुरुषांप्रमाणे टक्कल पडणं. वेळच्या वेळी निदान आणि उपचार झाले नाहीत तर पुढे जाऊन दृदय विकार, मधुमेह आणि लठ्ठपणा या समस्यांना तर तोंड द्यावंच लागतं पण एकूण प्रतिकारशक्तीवरही याचा परिणाम होतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 05:31 PM2021-04-20T17:31:01+5:302021-04-21T15:00:20+5:30

पीसीओडीत अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सुरुवात होऊ शकते. जसे की अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा होण्यास अडचणी येणं, अचानक वजन वाढणं, चेहरा आणि अंगावरची चरबी वाढणं, अंगदुखी आणि पुरुषांप्रमाणे टक्कल पडणं. वेळच्या वेळी निदान आणि उपचार झाले नाहीत तर पुढे जाऊन दृदय विकार, मधुमेह आणि लठ्ठपणा या समस्यांना तर तोंड द्यावंच लागतं पण एकूण प्रतिकारशक्तीवरही याचा परिणाम होतो.

Can the risk of physical problems in PCOD be avoided by following a diet and lifestyle narikaa | PCOD आहे? तातडीने लाइफस्टाइल सुधारा, त्यासाठी हा उत्तम आहार घ्या!

PCOD आहे? तातडीने लाइफस्टाइल सुधारा, त्यासाठी हा उत्तम आहार घ्या!

Highlightsपीसीओएसवर कंट्रोल ठेवण्यासाठी बॉडी मास इंडेक्सचा वापरत करता येतो. बीएमआयमध्ये माणसांच्या उंचीनुसार वजनाचं मोजमाप केलं जातं. किती उंचीसाठी किती वजन अपेक्षित आहे याचा तक्ता यात असतो.लो फॅट आणि लो कार्बोहायड्रेट्सचा आहार गरजेचा असतो जेणेकरून शरीरात साखर निर्माण होण्यावर मर्यादा राहू शकते.पीसीओएस असला तरीही आपण बारीक आहोत त्यामुळे आपल्याला काही त्रास होणार नाही या भ्रमात कुणीही राहू नये. हायपरग्लेसिमिया नाही ना याची तपासणी वजन कमी असलेल्या किंवा बारीक शरीरयष्टी असलेल्या मुलींनी/स्त्रियांनी करायला हवी. 

पॉलिसिस्टिक ओव्हरीन सिंड्रोम ज्याला पीसीओएस किंवा पीसीओडी म्हटलं जातं. प्रजननक्षम असलेल्या १५ ते २० टक्के महिलांना भारतात हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारातून अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांना सुरुवात होऊ शकते. जसे की अनियमित मासिक पाळी, गर्भधारणा होण्यास अडचणी येणं, अचानक वजन वाढणं, चेहरा आणि अंगावरची चरबी वाढणं, अंगदुखी आणि पुरुषांप्रमाणे टक्कल पडणं. वेळच्या वेळी निदान आणि उपचार झाले नाहीत तर पुढे जाऊन दृदय विकार, मधुमेह आणि लठ्ठपणा या समस्यांना तर तोंड द्यावंच लागतं पण एकूण प्रतिकारशक्तीवरही याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे दुर्लक्ष केल्यास लहान वयात एन्डोमेट्रिअल (गर्भाशयाला असलेलं श्लेष्मल) कर्करोग होण्याची शक्यता असते.

पीसीओडी आणि बॉडी मास इंडेक्स
पीसीओएसवर कंट्रोल ठेवण्यासाठी बॉडी मास इंडेक्सचा वापरत करता येतो. बीएमआयमध्ये माणसांच्या उंचीनुसार वजनाचं मोजमाप केलं  जातं. किती उंचीसाठी किती वजन अपेक्षित आहे याचा तक्ता यात असतो.
उदा. एखाद्या स्त्रीचं वजन ७५ किलो आहे आणि उंची १.६ मीटर असेल तर तिचा बीएमआय २९. ३ आहे. या केस मध्ये आशियाइ लोकसंख्यात बीएमआय जर २३च्या वर असेल तर ओव्हर वेट समजायला हवं आणि २५च्या वर असेल तर लठ्ठपणा किंवा ओबेसिटी आहे असं मानायला हवं.
त्याचप्रमाणे जर त्या मुलीच्या कुटुंबातील एक जरी सदस्य किंवा जवळची व्यक्ती मधुमेह झालेली असेल तर अशा मुलींमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीन डिसीज होण्याची शक्यता अधिक असते.

पीसीओएसची लक्षणं काय आहेत हे बघून मग त्यानुसार डॉक्टर्स उपचार सांगतात. औषधं देतात. त्याचप्रमाणे उत्तम आणि समतोल आहार, खाण्यापिण्याच्या योग्य सवयी आणि चांगली जीवनशैली असेल तर या आजारातून निर्माण होऊ शकणाऱ्या इतर शारीरिक समस्यांना आळा घालता येतो.

आहार आणि जीवनशैली कशी हवी?
लो कॅलरी डाएट आणि व्यायाम हे पीसीओएस झालेल्या मुली/ स्त्रियांसाठी सगळ्यात चांगलं कॉम्बिनेशन मानलं जातं. कारण हा आजार झालेल्या बहुतेक मुली/ स्त्रिया लठ्ठ असतात. त्यामुळे वजनात थोडा जरी फरक पडला तरीही त्याचे चांगले परिणाम बघायला मिळू शकतात.

वजन आटोक्यात राहिल्याने काय होतं?
१) साखर आणि अँड्रोजेन हे पुरुषी हार्मोनचं प्रमाण कमी होतं.
२) ओव्यूलेशन होऊ शकतं आणि मासिक पाळी पूर्ववत होते.
३) डॉक्टरांनी जी औषधं दिलेली असतात त्यांचा चांगला परिणाम व्हायला लागतो.
४) वंध्यत्व जाऊन दिवस जाण्याच्या शक्यता वाढतात.
अर्थात हे सगळं खरं असलं तरी २० टक्के महिला ज्यांना पीसीओएस झालेला आहे त्या बारीक असतात हेही लक्षात घेतलंच पाहिजे. आणि तरीही दिवस जायला त्यांना अडचणी येत असतात. किंवा अँड्रोजेन ह्या पुरुषी हार्मोनचं प्रमाण वाढलेलं असतं.

समतोल आहार
लो फॅट आणि लो कार्बोहायड्रेट्सचा आहार गरजेचा असतो जेणेकरून शरीरात साखर निर्माण होण्यावर मर्यादा राहू शकते. 
१) हाय फायबर आणि नॉन स्टार्ची भाज्या. उदा. ब्रोकोली, फ्लॉवर, पालक, लाल आणि पिवळी बेल पेपर, भिजवलेली कडधान्यं
२) प्रथिनांमध्ये टोफू, चिकन, फिश यांचा समावेश हवा.
३) याशिवाय मसाल्यांमध्ये हळदीचा वापर झाला पाहिजे.
४) भाज्यांमध्ये टोमॅटो, श्रावण घेवडा, डाळी.
५) फळामध्ये ताजी फळं खावीत. त्यांचा रस काढून त्यात साखर घालून पिऊ नये.
६) भाज्यांच्या स्मूदीही चालू शकतात.
७) गव्हाचा ब्रेड, हातसडीचा तांदूळ आणि ओट्सचा आहारात समावेश करा. गव्हाचा ब्रेड नक्की गव्हाचाच आहे ना हे विकत घेताना बघून घ्या, काहीवेळा मैद्याच्याच ब्रेडमध्ये रंग घालून तो गव्हाचा म्हणून विकला जातो.

आजार बळावणारे खाद्य पदार्थ
१) ज्या अन्न पदार्थांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो असे पदार्थ
२) पांढरा ब्रेड, पॉलिश्ड पांढरा तांदूळ, पास्ता किंवा मैद्यापासून बनवलेले तत्सम पदार्थ
३) सर्व प्रकारचे गोड पदार्थ. कुकीज, कॅंडीज, डेझर्ट्स, सोडा ड्रिंक्स (कोल्ड ड्रिंक्स) आणि साखर असलेले ज्यूस.
४) मटण, तळलेले पदार्थ आणि चिप्स
५) बटाटा, मका आणि मटार
या आजारात आहारात पालेभाज्या असल्याचं पाहिजेत. नॉन व्हेज खाणाऱ्यांसाठी असा आहार आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच हवा. पदार्थ बनवताना अगदी कमी तेलात शिजवले पाहिजेत. शक्यतो वाफवून खाणं उत्तम.

 

जीवनशैलीत काय बदल हवा?
समतोल आहाराबरोबर सकारत्मक जीवनशैली आवश्यक आहे. 
१) व्यायामामुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण काबूत ठेवता येतं. शिवाय वजन आटोक्यात राहतं, ज्यामुळे ओव्यूलेशन व्यवस्थित होऊन मासिक पाळीची समस्या कमी होऊ शकते.
२) पीसीओएसमध्ये ताण येतो. अस्वस्थता निर्माण होते अशावेळी योग आणि प्राणायाम केला पाहिजे. जेणेकरून मन शांत राहील.
३) गरज वाटली तर समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे.
४) आहारतज्ज्ञांशी नियमित चर्चा केली पाहिजे आणि समतोल आहार राखला पाहिजे.
५) जेवणाच्या वेळा निश्चित करून त्या बदलणार नाहीत हे बघायला हवं.
६) वेळेवर आणि पुरेशी झोप मिळायला हवी. रात्री झोपणं आणि दिवसा ताजेतवानं असणं अपेक्षित आहे. जागरणं झाली की रात्री झोप नाही आणि दिवस आळसटलेला जाऊ शकतो. जे योग्य नाही.
७) कमीत कमी आठ तासांची झोप व्हायला हवी. झोप शांत झाली नाही तरीही संप्रेरकात असंतुलन निर्माण होऊ शकतं.
८) वेट लॉसच्या मागे न लागता योग्य जीवनशैली स्वीकारणं गरजेचं आहे.

बारीकपणा आणि पीसीओएस
पीसीओएस असला तरीही आपण बारीक आहोत त्यामुळे आपल्याला काही त्रास होणार नाही या भ्रमात कुणीही राहू नये. हायपरग्लेसिमिया नाही ना याची तपासणी वजन कमी असलेल्या किंवा बारीक शरीरयष्टी असलेल्या मुलींनी/स्त्रियांनी  करायला हवी. कारण दुर्लक्ष केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
१) रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर हवं.
२) व्यायाम केलाच पाहिजे.
३) समतोल आहार गरजेचाच आहे.
४) ताण घालवण्यासाठी योग, प्राणायाम आणि पुरेशी झोप आवश्यक आहे.
पीसीओएस आणि पीसीओडी या दोन्ही गोष्टींमुळे मनावर ताण येऊ शकतो. निराशा येऊ शकते. अशावेळी सकारात्मक विचार, योग्य आहार आणि जीवनशैली सांभाळून लक्षणं कशी कमी करता येतील हे बघायला हवं.

विशेष आभार: डॉ. सतीश एन. टिम्बरवाला
(M.D, OBGyn)

Web Title: Can the risk of physical problems in PCOD be avoided by following a diet and lifestyle narikaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.