कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी मास्कचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेपासून मोठमोठे डॉक्टरर्स गर्दीच्या ठिकाणी जाताना, कोणालाही भेटताना मास्कचा वापर करण्याबाबत लोकांना आवाहन करत आहेत. मास्क कसा असायला हवा? मास्कचा वापर किती वेळ करावा? मास्कचा वापर चुकीच्या पद्धतीनं केल्यावर कोणत्या आजारांचा धोका वाढतो? याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. फिजिशियन डॉ. राजन गांधी यांनी याबाबत अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे.
घाणेरडा मास्क ठरू शकतो जीवघेणा
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क घालणे फार महत्वाचे आहे, पण जर आपण बराच काळ घाणेरडा मास्क किंवा तोच तोच मास्क परिधान केला असेल. तर तो आपल्याला कोरोनापासून वाचवण्याऐवजी इतर बर्याच रोगांच्या जाळ्यात अडकवू शकतो. घाणेरडा आणि वारंवार तोचतोच मास्क वापरल्याने घसा खवखवणे, श्वसनविषयक समस्या आणि पोटाचे विकार उद्भवू शकतात.
स्वच्छ मास्क वापरल्यानं श्वास घेण्यास अडचण येत नाही. परंतु मास्क घाण झाल्यामुळे त्याचे छिद्र घाणीने भरले जातात त्यावेळी मास्कच्या वापरामुळे ऑक्सिजनच्या पातळीत कमतरता जाणवू शकते. ज्यामुळे गुदमरल्यासारखे किंवा श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता आहे.
मास्क कधी बदलायला हवा
कापडाचा मास्क जास्तीत जास्त ३ महिन्यांपर्यंत वापरायला हवा. त्यानंतर तो मास्क बदलून दुसरा घ्या. डिस्पोजेबल एन ९५ मास्क प्रत्येक २ महिन्यांनी बदलायला हवा. जवळजवळ तीन ते चार तासांच्या वापरानंतर सर्जिकल थ्री लेयर मास्क बदलणे हा एक चांगला पर्याय आहे. त्याच वेळी, रियुजेबल मास्क प्रत्येक दोन महिन्यांनी बदलायला हवा.
मास्क स्वच्छ करण्याची योग्य पद्धत
जर तुम्ही पुन्हा पुन्हा वापरात असणारा कापडाचा मास्क वापरत असाल तर फक्त पाण्यानं धुवून चालणार नाही. तुम्ही हा मास्क जवळपास १० मिनिटं गरम पाण्यात बुडवायला हवा. त्यानंतर साबणानं धुवून उन्हात सुकवायला ठेवा. व्यवस्थित कोरडा झाल्यानंतरच मास्कचा वापर करा. मास्क सुकल्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही वारंवार हात लावायला जात नाही अशा ठिकाणी ठेवा. मास्क वापरण्याआधी आपले हात सॅनिटाईज करा.
याशिवाय एकच मास्क वारंवार वापरला जात आहे. हे करणे विनामास्क फिरण्यापेक्षा जास्त धोकादायक असल्याचे अभ्यासात समोर आले आहे. वापरलेला मास्क पुन्हा वापरणे हे मास्क न घालण्यापेक्षा कमी सुरक्षित असू शकते असे मत संशोधकांनी मांडले आहे. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियाच्या बॅपटिस्ट विद्यापीठाच्या संशोधकाच्या टीमने मास्क प्रभावी आहेत की नाही यावर संशोधन केले आहे.
संशोधनात तीन लेअर असलेल्या सर्जिकल मास्कची तपासणी करण्यात आली. यावेळी हे मास्क नवीन असताना छोट्या आकाराच्या तीन चतुर्थांश कणांना रोखण्यात यशस्वी ठरतात. तर एकापेक्षा जास्त वेळा वापरले जाणारे मास्क हे एक चतुर्थांश कणांना रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. याचाच अर्थ वापरलेल्या मास्कनी कमी कोरोना व्हायरस रोखले आहेत. Physics of Fluids जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांचे म्हणणे आहे की, जेवढ्या अधिकवेळा ते मास्क वापरले जाते तेवढे ते खराब होत जाते.
मास्क लावल्यानंतर व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आसपासच्या हवेचे वाहणेही बदलते. मास्क घातल्यानंतर केवळ नाक आणि तोंडाकडेच नाही तर मास्कच्या संपूर्ण पृष्ठभागावर हवा वाहते. जगभरातील सामान्य लोकांना तीन लेअरच्या मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. काही एक्सपर्ट N95 मास्क घालण्याचा सल्ला देतात. मात्र, N95 हे मास्क महागडे असतात. तसेच ते सामान्यांना सहज उपलब्धही होत नाहीत.