तूप ही अनेकांच्या अतिशय आवडीची गोष्ट असते. फक्त भात, पुरणपोळी, पराठा यांवरच नाही तर हे लोक प्रत्येक पदार्थावर तूप घालून खातात. तुपामध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच फॅटस असतात त्यामुळे दिवसभरात किमान २ ते ३ चमचे तूप आवर्जून खायला हवं असं सांगितलं जातं. हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्वचेसाठी, पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी तूप अतिशय आवश्यक असतं. मूळात तूप हे फॅटसचे बनलेले असते. त्यामध्ये कमी प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिंडंटसही असतात, ज्यामुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते (cow ghee or buffalo ghee which is better for you) .
तूपात २५ टक्के ट्रायग्लिसराईडस असतात आणि इतर ७५ टक्के सॅच्युरेटेड फॅटस असतात. हे सगळे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हे घटक शरीरात शोषले गेल्याने आपली ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. हे सगळे खरे असले तरी तूप कोणत्या प्रकारचे, किती प्रमाणात याबाबत आपण फारसा विचार करत नाही. हल्ली रोजच्या धावपळीत अनेकांना घरी तूप करायला वेळ नसतो. त्यामुळे विकतचे तूप आणले जाते किंवा विकतचे लोणी, क्रिम आणून त्याचे तूप केले जाते. पण प्रत्येकाला आपण किती आणि कोणतं तूप खाणं आरोग्यासाठी चांगलं हे आपल्याला माहित असायला हवं.
पाहा कोणासाठी गायीचं तूप चांगलं आणि कोणासाठी म्हशीचं...
१. आयुर्वेदानुसार गायीच्या तुपात म्हशीच्या तुपापेक्षा भरपूर औषधी गुणधर्म असतात. गायीचे तूप सात्विक म्हणून ओळखले जाते. गायीच्या तुपामुळे आपली सकारात्मकता, शारीरिक-मानसिक वाढ चांगली होण्यास मदत होते.
२. पण म्हशीच्या तुपात फॅटसचे प्रमाण जास्त असल्याने ते दिर्घकाळ टिकते. पण गाईचे तूप मात्र सामान्य तापमानाला तितके टिकत नाही.
३. ज्यांना वजन कमी करायचे आहे ते आवर्जून गायीचे तूप खातात कारण म्हशीच्या तुपातील फॅटसमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
४. महिलांना किंवा वयस्कर व्यक्तींना हाडांच्या समस्या असतात. त्यांना हाडांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर म्हशीचे तूप जास्त चांगले. तसेच हवबदलामुळे होणारा सर्दी-खोकला आणि कफ कमी होण्यासाठीही म्हशीचे तूप खाणे चांगले.
५. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी आवर्जून गायीचे तूप खायला हवे. गायीच्या तुपाचा पचण्याचा दर ९६ टक्के असतो तर म्हशीचे तूप फॅटस जास्त असल्याने पचायला जड असते. तुम्हाला गॅसेस, अॅसिडीटी, कोठा जड असणे यांसारखे त्रास असतील तर तुम्ही आवर्जून गायीच्या तुपाचा आहारात समावेश करायला हवा.
६. कोलेस्टेरॉल ही आता अतिशय सामान्य समस्या आहे. आपल्याला या समस्येचा सामना करावा लागू नये असे वाटत असेल तर मात्र गायीचे तूप खाणे केव्हाही जास्त चांगले. ज्यांना आधीपासून कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांनीही गायीचेच तूप खायला हवे.