प्रत्येक ऋतूची आपली अशी एक खासियत असते. त्या त्या ऋतुनुसार हवामानात होणारे बदल, शरीरात होणारे बदल लक्षात घेऊन आपल्या आहारविहारात बदल करणे गरजेचे असते. अशप्रकारे बदल करुन योग्य तो आहार घेतल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला की एकीकडे गरमही होत असते आणि दुसरीकडे पावसाळी हवेने हवेत गारठा असल्याने काहीवेळा थंडीही वाजते (Diet Tips For Monsoon Season by Rujuta Divekar).
या हवेत पचनशक्ती क्षीण झाल्याने कमी खाल्ले जाते. तर गार हवेमुळे सतत काहीतरी चमचमीत नाहीतर गरमागरम खाण्याची इच्छा होते. आता या दोन्हीचा मेळ कसा साधायचा, आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा, कोणते घटक टाळायचे याविषयी प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर काही महत्त्वाची माहिती देतात. आपल्या सोशल मीडीया अकाऊंटवरुन त्या कायमच काही ना काही उपयुक्त माहिती शेअर करत असतात. आताही पावसाळ्यातील आहाराविषयी अशीच महत्त्वाची माहिती त्यांनी आपल्या फॉलोअर्सना दिली आहे. यामध्ये त्या काय सांगतात पाहूया...
आठवड्यातून २ ते ३ वेळा खायलाच हव्यात अशा गोष्टी
१. उकडलेले दाणे
२. मक्याचे कणीस
३. कडधान्ये (मोड आलेली कडधान्ये जेवणात उसळ म्हणून खाणे)
४. दुधी भोपळा, काकडी, लाल भोपळा यांसारख्या वेलीवर येणाऱ्या भाज्या
५. सुरण, रताळी यांसारखी कंदमुळे
आठवड्यातून किमा एकदा खायला हवे असे
१. राजगिरा आणि कुट्टू यांसारखी तृणधान्ये
२. आंबाडी, आळू यांसारख्या स्थानिक रानभाज्या
महिन्यातून किमान एकदा खायला हवेत असे पदार्थ
१. मोदक, पातोळ्या, बाफला, सिद्दू यांसारखे पारंपरीक पदार्थ
२. ओवा, घोसाळं, मायाळू यांची भजी
३. मशरुम, बांबू यांसारख्या स्थानिक भाज्या. या भाज्यांचे २ ते ३ महिने टिकेल असे लोणचेही करुन ठेवता येते.