- डॉ. शंतून अभ्यंकर
थायरॉइडचा स्त्राव जास्त असेल तर काय करायचं हे आपण मागे पहिलं; बाकी विकारांबद्दल आता वाचूया. हायपो-थायरॉइडिझम याउलट जर स्त्राव कमी असेल तरीही त्रास होतो. नीट संतुलन साधलेलं असावं लागतं.
कमी स्त्राव हा हशीमोटोचा आजार. हाही प्रतिकारशक्ती कृपेकरूनच होतो. इथे थायरॉइड विरोधी प्रतिपिंडे थायरॉइडच्या पेशींचा नाश करतात आणि ग्रंथीचे कार्य मंदावते. ग्रंथीचे कार्य मंदावते आणि ती बाईही एकदम ‘मंदा’ होते! तिच्या चेहऱ्यावर सदैव खुदाई खिन्नता पसरलेली दिसते. तिचा जीवनरस जणू संपून जातो, हालचाली संथावतात, कशात मन लागत नाही, प्रचंड थकवा येतो, पायात गोळे येतात, बद्धकोष्ठता होते, डोंगराची हवा गार नसतानाही हिची ‘सोसना गारवा’ अशी तक्रार असते.
खूपच कमी थायरॉइड असेल तर रक्तक्षय (Anemia), गर्भपात, अशक्त मूल, बाळंतवात (पीआयएच) वगैरे प्रकार घडतात. इतरही काही अघटित घडू शकतं. तेंव्हा कमी थायरॉइडसाठी गोळ्या चालू असतील तर त्या दिवस राहिल्यावर बंद करू नयेत. उलट डॉक्टरी सल्ल्याने डोस ॲडजस्ट करून घ्यावा.
उपचार
गोळ्या अगदी स्वस्त, सुरक्षित आणि प्रभावी आहेत. आईसाठी आणि बाळासाठीही आवश्यक आहेत. थायरॉइड
हार्मोनच्या (Levothyroxine) गोळ्या मिळतात. त्या नियमित घ्याव्या लागतात. सकाळी, उठल्याउठल्या, उपाशीपोटी संपूर्ण डोस घ्यायचा आहे. अन्य औषधांसोबत (उदा: लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या) या गोळ्या घेऊ नयेत. यात टी ४ नावाचे संप्रेरक असतं. ह्याचा महिमा काय वर्णावा? हे बाळाच्या मेंदूपर्यंत अगदी सुरुवातीपासून पोहोचू शकतं. हे तर अतिशय महत्त्वाचं; पण बाजारात थेट प्राण्यांच्या थायरॉइड ग्रंथींपासून निर्मिलेले ‘थायरॉइडवरचे औषध’ उपलब्ध आहे. हयात टी ४ आणि टी ३ अशी सरमिसळ असते.
बाळाच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने यातले टी ३ अगदीच कुचकामी आणि टी ४ ची मात्रा अगदीच कमी. तेव्हा हे असले औषध घेऊ नये.
प्रसूतीपश्चात थायरॉइड विकार
बरेचदा प्रसूतिनंतर थायरॉइडचं काम आधी अधिक आणि नंतर कमी झालेलं आढळतं (Postpartum Thyroiditis). हाही आपल्या प्रतिकारशक्तीचा प्रताप. सर्व पेशंटमध्ये या दोन्ही अवस्था दिसतात, असं नाही. सुमारे तीन महिने अधिक थायरॉइड ही अवस्था टिकते. तक्रारी विशेष नसतात. विशेष असल्या तरच हृदय गती कमी होण्याची औषधी द्यावी लागते. काही केसेसमध्ये स्त्राव कमी होण्याची औषधी द्यावी लागते. पुढे स्त्राव कमी पडू लागतो. मग तो वाढायची औषधी सुरू करावी लागते. स्त्राव कमी पडला की वर उल्लेखल्याप्रमाणे पेशंटची ‘मंदा’ होते. बरेचदा पेशंटला नैराश्य आलेलं आहे, असाही समज होऊ शकतो. योग्य तपासण्यांनी योग्य निदान होते. वेगवेगळ्या अवस्थेनुसार तक्रारी बदलतात आणि उपचारही बदलतात. बहुतेक स्त्रियांत सुमारे वर्षभरात परिस्थिती पूर्ववत होते. काहींत मात्र औषधी कायम चालूच ठेवावी लागतात,
तर अशी ही कंठग्रंथी थायरॉइड. मलाही आहे, तुम्हालाही आहे. हिचे कार्य निर्वेध चालो हीच सदिच्छा.
(लेखक स्त्री आरोग्यतज्ज्ञ आहेत.)
faktbaykanbaddal@gmail.com