आपण सकाळी झोपेतून उठलो की आपल्याला खरं तर फ्रेश वाटायला हवं. पण बरेचदा तसं होत नाही आणि आंघोळ, नाश्ता झाला की आपल्याला पुन्हा झोप येते, ऑफीस किंवा इतर कामात असल्याने तेव्हा झोपणं शक्य असतंच असं नाही. मग दुपारचं जेवण झाल्यावर तरी आपल्याला झोप येतेच येते. अनेकदा संध्याकाळपासूनच आपल्याला जांभया यायला लागतात. काही जणांना अगदी कमी झोप असेल तरी पुरते पण काही जणांना मात्र रात्री लवकर झोपूनही सकाळी त्यांचे डोळे काही केल्या उघडत नाहीत. सामान्यपणे ८ ते ९ तासांची झोप आपल्याला पुरेशी असते पण अनेकांना ती पुरत नाही आणि त्याहून जास्त झोप घ्यावीशी वाटते. आता अशाप्रकारे प्रमाणापेक्षा जास्त झोप येण्यामागे नेमकी काय कारणे असतात आणि हे कशाने होते हे समजून घेऊया (Do You Feel sleepy all the time know the reasons and remedies for the same)...
जास्त झोप येण्यामागची कारणं...
१. मेंदूशी निगडीत कोणती औषधे घेत असल्यास अशाप्रकारे प्रमाणापेक्षा जास्त झोप येण्याची शक्यता असते.
२. दारु किंवा अन्य कोणते व्यसन करत असलेल्यांनाही या नशेमुळे सामान्यांपेक्षा जास्त झोप येण्याची शक्यता असते.
३. ज्यांना स्लीप अॅप्निया म्हणजेच झोपेत श्वास थांबण्याचा त्रास आहे अशांचीही रात्रीची झोप पुरेशी झाली नाही की दुसऱ्या दिवशी त्यांना प्रमाणापेक्षा जास्त झोप येत राहते.
४. नैराश्य, भिती यांसारख्या काही समस्या असतील तर रात्री नीट झोप येत नाही आणि अशा लोकांना दिवसभर खूप झोप येत राहते.
५. ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे त्यांना रात्रीच्या झोपेनंतर एकप्रकारचा थकवा येतो आणि दिवसा ते प्रमाणापेक्षा जास्त झोपतात.
उपाय काय?
१. झोपताना टिव्ही, मोबाइल यांसारख्या इलोक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहायला हवे.
२. रोजच्या रोज ठरलेल्या वेळेवर झोपणे आणि ठरलेल्या वेळेवर उठल्यास झोप पूर्ण आणि चांगली होऊ शकते.
३. आहारात प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेटस अशा पोषण देणाऱ्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा.
४. शरीरातील पाण्याची पातळी चांगली राखण्यासाठी भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ आपल्या रुटीनमध्ये असायला हवेत.
५. व्यायाम आणि प्राणायाम या गोष्टींचा आपल्या दैनंदिन जीवनात अवश्य समावेश असायला हवा, यामुळे रक्तप्रवाह तर सुरळीत होतोच पण मन शांत होण्यास निश्चित मदत होते.