Lokmat Sakhi >Health > उंची वाढत नाही म्हणून सर्रास ग्रोथ हार्मोन घेताय?- आणि ते धोक्याचं ठरलं तर..

उंची वाढत नाही म्हणून सर्रास ग्रोथ हार्मोन घेताय?- आणि ते धोक्याचं ठरलं तर..

उंची कमी म्हणून न्यूनगंड, आपण करिअरमध्ये मागे पडतो असं अनेकांना वाटतं, पण औषधं घेऊन उंची वाढवताना डॉक्टरांचा सल्ला घेतला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 PM2021-06-05T16:07:19+5:302021-06-05T16:11:04+5:30

उंची कमी म्हणून न्यूनगंड, आपण करिअरमध्ये मागे पडतो असं अनेकांना वाटतं, पण औषधं घेऊन उंची वाढवताना डॉक्टरांचा सल्ला घेतला का?

Do you take growth hormone for height increase, growth? - it is dangerous .. | उंची वाढत नाही म्हणून सर्रास ग्रोथ हार्मोन घेताय?- आणि ते धोक्याचं ठरलं तर..

उंची वाढत नाही म्हणून सर्रास ग्रोथ हार्मोन घेताय?- आणि ते धोक्याचं ठरलं तर..

Highlightsग्रोथ हार्मोनची कमतरता असलेल्या व्यक्तींना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार म्हणून हे ग्रोथ हार्मोन गरजेचे असते.

डॉ.यशपाल गोगटे

उंची कमी असलेल्या अनेकांमध्ये न्यूनगंड असतोच. त्यात हल्ली उंच मुली सौंदर्य स्पर्धा, मॉडेल यासारख्या करिअरमध्ये यशस्वी होतात असे बिंबवले जाते. उंची उत्तम असणं हा प्लस पॉइण्ट मानला जातो. अनेकजण उंची वाढवण्यासाठी वाट्टेल तेवढे प्रयत्नही करतात. पण खरंच उंची वाढवणं आपल्या हातात असतं का?
ते सगळं ठरवतात आपले हार्मोन्स.
माणसाच्या उंची करता मुख्यतः जवाबदार असणारे हार्मोन म्हणजे ग्रोथ हॉर्मोन. मेंदूच्या तळाशी
वाटाण्याच्या आकाराची असलेली पिट्युटरी ग्रंथी हे हार्मोन तयार करत असते. हे हार्मोन काही प्रमाणात आपल्या
इतर अवयवांच्या वाढी करता गरजेचे असते. 

हे हार्मोन शरीरात जास्त झाले तर त्याचे होणारे दुष्परिणाम

पिट्युटरी ग्रंथीतुन तयार होणारे हे हार्मोन पेशींची वाढ करते म्हणूनच त्याचे नाव ग्रोथ हार्मोन असे पडले
आहे. हे ग्रोथ हार्मोन लिव्हरला IGF१ नावाचे दुसरे हार्मोन तयार करण्यासाठी प्रवृत्त करते. IGF१ हा स्नायू हृदय,
हाडे यांच्या वाढीला मदत करतो. त्यामुळे आपली उंची तर वाढतेच पण बांधा देखील मजबूत होतो. अश्या रीतीने
वयाप्रमाणे हे दोन्ही हार्मोन्स वाढत जातात व त्यामुळे एक विशिष्ट उंची आणि बांधा तयार होतो. कुपोषण व
मानसिक ताण असल्यास त्याचा परिणाम लिव्हरच्या क्षमतेवर होतो व ग्रोथ हार्मोन जरी मुबलक असले तरी IGF१
ची कमतरता निर्माण होते. त्यामुळे लहान मुलांना त्यांच्या वाढीच्या काळात योग्य पोषक आहाराबरोबर मानसिक
संतुलन सांभाळणे देखील गरजेचे ठरते. या दोन्हीही गोष्टी मिळाल्यास मुलांची वाढ योग्य प्रकारे होते.
योग्य प्रमाणातील ग्रोथ हार्मोन- IGF१ वाढीसाठी उपयुक्त आहे हे आपण पहिले. परंतु त्याचे प्रमाण वाढले
तर त्याचे देखील दुष्परिणाम होतात. पिट्युटरी ग्रंथी मधील ट्युमर झाल्यास हे हार्मोन अधिक प्रमाणात वाढते व या आजाराला अक्रोमेगाली असे म्हटले जाते. जगभरात प्रसिद्ध असलेला WWF चा खेळाडू खली यास हा आजार आहे. या आजारात उंची बरोबर, हात, पाय, स्नायू हाडे व जबडा या सगळ्यांची असामान्य वाढ होते.
ग्रोथ हार्मोनचा शरीरात वाढी साठी उपयोग होतो. त्यामुळे ग्रोथ हार्मोनच्या इंजेक्शनांचा जिम व
खेळाडूंमध्ये गैर वापर वाढू लागला आहे. साधारणतः पिट्युटरी ट्युमर मुळे होणाऱ्या अक्रोमेगाली या आजारा सारखी लक्षणे या गैर वापरामुळे देखील दिसायला लागली आहेत. त्यामुळे खेळाडूस फायदा तर होत नाहीच उलट नुकसानच होते.

अक्रोमेगाली या आजारात काही विशेष लक्षणे दिसतात. या शब्दाचा जणू अर्थच म्हणजेच अक्रो म्हणजे बोटे व
मेगाली म्हणजे मोठी! लहानमुलांमध्ये त्यांच्या असामान्य उंची वरून हा आजार ओळखला जाऊ शकतो. या
आजारातील व्यक्तींचे पंजे मोठे असतात व बुटाचा नंबर २० व्या वर्षांनंतर देखील वाढतो. 
काही लोकांच्या खालच्या जबड्यामध्ये असामान्य वाढ दिसते. खास करून स्त्रियांमध्ये पाळीचे आजार व गर्भधारणा न होणे हे देखील या आजाराचे लक्षण आहे. प्रचंड सततचे डोके दुखी, घामाचा अतिरेक, गुडघे व सांधे दुखी ही देखील या आजाराची लक्षणे असू शकतात. ग्रोथ हार्मोन- IGF१ अधिक मात्रेत असल्याय ते कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.
सर्वसाधारणपणे हा आजार आढळून येत नाही त्यामुळे अनेक वेळा याचे निदान होण्यास उशीर होतो. वेळेत
निदान झाल्यास योग्य उपचाराने हा नियंत्रणात ठेवता येतो. अधिक ग्रोथ हार्मोनने उंची नक्कीच वाढते पण याचे
शरीरावर इतर जीवघेणे दुष्परिणाम होऊ शकतात.
हा आजार अधिक सामान्य नसला तरीही उंचीच्या व शरीर वाढीच्या हव्यासापोटी या ग्रोथ हार्मोनचा गैर
वापर वाढला आहे. अवैध परंतु सहज उपलब्ध असलेल्या या ग्रोथ हार्मोनचा गैरवापर जिम व क्रीडा क्षेत्रात वाढलेला आढळतो. या गैर वापरामुळे आजार नव्हे पण आजारासदृश दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. हे लक्षात घेऊन खास करून तरुणांनी स्वतः तर दूर रहावेच व जवळपासच्या व्यक्तींना या पासून परावृत्त करावे. 
मात्र ग्रोथ हार्मोनची कमतरता असलेल्या व्यक्तींना तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार म्हणून हे ग्रोथ हार्मोन गरजेचे असते.

(लेखक एंडोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोन तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Do you take growth hormone for height increase, growth? - it is dangerous ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य