दुपारी जेवण झालं की अनेकदा आपल्यापैकी अनेकांना डुलकी यायला लागते. सकाळपासूनची धावपळ आणि त्यात दुपारचे भरपेट जेवण झाले की आपल्याला एक डुलकी काढायची इच्छा होते. डोळे खूप मिटायला लागतात आणि कधी एकदा झोपतो असे होते. मग आपण घरात असलो तर झोपतोच झोपतो. पण ऑफीसला असलो तरी १० मिनीटे डेस्कवर डोके ठेवून एक लहानशी डुलकी काढण्याची आपली इच्छा होते. अशी झोप येणे नैसर्गिक असले तरी दुपारच्या जेवणानंतर खरंच झोपावं का, याचा आरोग्यावर काही विपरीत परीणाम होतो का याविषयी समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे (Doctor Says stop taking afternoon naps because ).
याविषयी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा सांगतात, आपले पोट हे एखाद्या ब्लेंडरप्रमाणे काम करते. आपण हे पोट १०० टक्के भरतो तेव्हा या ब्लेंडरला काम करणे अवघड होते. पण हेच आपण ८० टक्केच पोट भरले तर अन्न घुसळण्याचे काम सोपे होते. खाल्ल्यानंतर लगेच आडवे पडल्याने पोटातील आम्ल अन्ननलिकेत जाते आणि त्यामुळे जळजळ, आम्लपित्त होण्याची शक्यता जास्त असते. पण जेवण झाल्यावर आपण सरळ बसलो तर अन्न पोटातून लहान आतड्यात, मोठ्या आतड्यात आणि मग कोलनमध्ये जाऊन अनावश्यक घटक शरीराबाहेर पडण्यासाठी तयार होतात. आपली पचनसंस्था ही सर्वाधिक अवयवांचा संच असलेली संस्था आहे, शरीरातील बरेच अवयव पचनक्रियेमध्ये सहभागी असतात. हे अवयव चांगले ठेवण्यासाठी जेवण झाल्यावर १०० पाऊले अवश्य चालायला हवे. यामुळे पोटाची हालचाल होते आणि अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होण्यास मदत होते.
पचनशक्तीवर ताण येऊ नये म्हणून काय कराल?
१. भूकेच्या ८० टक्केच खायला हवे.
२. प्रत्येक जेवणानंतर किमान १०० पाऊले चाला
३. जेवणानंतर लगेच अजिबात डुलकी घेऊ नका
४. पचनास मदत करणारे बडीशेप, वेलची, जीरे, धणे यांसारखे काहीतरी अवश्य चघळायला हवे. यामुळे पोटाला एकप्रकारचा उबदारपणा मिळण्यास मदत होते.