अंगावरुन पांढरे जाणे किंवा व्हाईट डिस्चार्ज ही तरुणींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सगळ्यांना जाणवणारी एक महत्त्वाची समस्या असते. याबाबत आपल्याकडे मोकळेपणाने फारसे बोलले जात नसल्याने अनेकदा ही गोष्ट लपवून ठेवण्याकडेच जास्त कल असतो. पण असे करणे योग्य नाही. कारण हा डिस्चार्ज प्रमाणापेक्षा जास्त असेल किंवा त्याला वेगळा रंग, वास असेल तर त्याबाबत वेळीच योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात. व्हाईट डिस्चार्ज होणे नॉर्मल असले तरी हा डिस्चार्ज जास्त प्रमाणात झाला, किंवा त्याचा रंग वेगळा असेल, वास येत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवं. मासिक पाळीच्या काही दिवस आधी हा डिस्चार्ज थोड्या जास्त प्रमाणात होतो, मात्र एरवीही होत असेल तर त्याबाबत वेळीच उपाययोजना करायला हव्यात (Easy and simple home remedies for white discharge or Leucorrhea).
व्हाईट डिस्चार्जला शास्त्रीय भाषेत ल्युकोरिया ( Leucorrhea) असे म्हणतात. आता व्हाईट डिस्चार्ज होण्यामागे नेमकी काय कारणं असतात? तर मासिक पाळी सुरु होण्याच्या आधीचा काळ, शरीर संबंधांच्या वेळी उत्तेजना सर्वात जास्त असताना, ताणतणाव असतील तर, यौवन काळात आणि गरोदर असताना अशाप्रकारे अंगावरून पांढरे जाते. हा डिस्चार्ज झालेला बऱ्याचदा आपल्याला कळतो तर काही वेळा कळतही नाही. मात्र यामुळे आतले कपडे ओले होणे, वास येणे, अस्वच्छ वाटणे अशा समस्या निर्माण होतात. व्हाईट डिस्चार्जमुळे पाठदुखी, मूड स्विंग्ज, कॅल्शियमची कमतरता अशा तक्रारी निर्माण होतात.आता हा डिस्चार्ज नियंत्रणात येण्यासाठी आयुर्वेदामध्ये घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय सांगितले आहेत. ते केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री हे उपाय सांगतात ते कोणते आणि कसे करायचे पाहूया..
१. अर्धा चमचा आवळा पावडर आणि अर्धा चमचा मध एकत्र करावा आणि हे मिश्रण चाटावे. २ ते ४ आठवडे हा उपाय केल्यास याचा नक्कीच चांगला उपयोग होतो. यानंतर पिकलेले १ केळं खायचं. हा उपाय करायला सोपा असल्याने आपण नक्कीच घरच्या घरी करु शकतो.
२. भाताचे पाणी पिणे हा व्हाईट डिस्चार्ज कमी होण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे. शिजलेल्या भाताचे १ ते २ ग्लास पाणी रोज प्यायल्यास त्यामुळे गर्भाशय सक्षम होण्यास मदत होते. आयुर्वेदात या पाण्याला गर्भाशयाचे टॉनिक म्हटले आहे.
३. खालच्या बाजूला खाज येत असेल, इन्फेक्शन झाल्यासारखे वाटत असेल तर त्रिफळाचा काढा करुन त्याने खालची जागा स्वच्छ धुवायची. याचा नक्कीच चांगला फायदा होतो.
४. आहारात खारट, मसालेदार, टोमॅटो, दही असे पदार्थ घेणे टाळावे. यामुळे व्हाईट डिस्चार्जचा त्रास निश्चितच कमी होण्यास मदत होईल.