डॉ. पौर्णिमा काळे
आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ
सणावाराला सगळे एकत्र जमले की नकळतच ४ घास जास्त खाल्ले जातात. त्यातही तळकट, तुपकट असेल की तोंडावर ताबा राहत नाही. सध्याचे हवामानही अन्न पचनासाठी चांगले नसल्याने खाल्लेले अन्न शरीरात तसेच राहते आणि मग पचनाच्या तक्रारी उद्भवतात. गॅसेस, अपचन आणि अॅसिडिटी या त्रासांनी दररोज लाखो लोकांचे जीवन अस्वस्थ असल्याचे आपण पाहतो. या समस्या मुख्यतः चुकीच्या आहाराच्या सवयी, नियमित व्यायामाचा अभाव, तणाव, अनियमित झोप आणि जड अन्नाचे अधिक सेवन यामुळे उद्भवतात. याशिवाय गरम, तिखट, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवनही अॅसिडिटी आणि गॅसेसचे मुख्य कारण ठरते (Easy ayurvedic home remedies for indigestion problem).
अतिवेगाने किंवा अतिमात्रेने खाणे, तासन्तास बसून काम करणे आणि पाण्याचे कमी प्रमाण हे देखील अपचनाचे कारण ठरू शकते.या समस्यांच्या मूळ कारणांचा आणि त्यावरच्या उपायांचा आढावा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार, पचनाच्या तक्रारी त्रिदोषांमधील असंतुलनामुळे होतात.वात, पित्त, आणि कफ या दोषांमध्ये विशेषतः पित्त दोषाच्या असंतुलनामुळे अॅसिडिटी आणि अपचनाच्या समस्या अधिक प्रमाणात निर्माण होतात. आयुर्वेदात पचन सुधारण्यासाठी काही खास औषधी वनस्पती आणि साधने सांगितली आहेत.
१. ओवा - अपचन, गॅसेस आणि अॅसिडिटीच्या समस्यांवर उपयुक्त आहे. अर्धा चमचा ओवा चावून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.जेवणानंतर एक तुकडा सुकं खोबर आणि ओवा असं खाल्लं तर ॲसिडिटी, गॅसेस कमी होतात.
२. जीरे - जेवणानंतर एक चमचा जीरे चावून खाल्ल्याने गॅसेसची समस्या कमी होते.
३. आलं - आलं पचनक्रियेला चालना देण्याचे काम करते.आल्याचा रस आणि सैंधव मीठ जेवणापूर्वी एकत्र घेतल्याने अपचन कमी होते.
४. काळया मनुका - रोज १५ ते २० काळ्या मनुका सेवन कराव्यात. याने पित्त कमी होणे, पोट साफ होणे आणि हिमोग्लोबिन वाढणे हे तीन कार्य होतात.
५. त्रिफळा चूर्ण - रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घेतल्याने अपचन आणि बद्धकोष्ठता कमी होते.
आहाराबाबत हे पाळाच
१. जेवण हलकं आणि सुपाच्य असावं. शक्यतो ताजे आणि सेंद्रिय अन्न वापरावे.
२. तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थांचे प्रमाण कमी करावे.
३. पाण्याचे नियमित सेवन करावे; जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये.
४. फळं आणि भाज्या यांचे अधिक सेवन करावे, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहील.
५. संध्याकाळी सूर्यास्तानंतर पचनशक्ती मंदावते. त्यामुळे संध्याकाळचे जेवण लवकर घेणे आवश्यक आहे. उशिरा जेवल्याने अन्न पचण्यास अडथळा येतो आणि अॅसिडिटी व अपचनाच्या समस्या वाढतात.
६.नियमित वेळेत आणि मोजकं खाणं आवश्यक आहे. अति खाणं किंवा उपाशी राहणं हे दोन्ही त्रासदायक ठरू शकतात.
योग आणि व्यायामाचे महत्त्व
पचन सुधारण्यासाठी आणि पोटातील गॅसेस कमी करण्यासाठी काही विशेष योगासने आणि व्यायाम उपयुक्त ठरतात. बरेचदा बैठ्या कामाने अन्नपचन क्रिया सुरळीत होत नाही. पण काही योगासने नियमित केल्यास पचन सुधारण्यास मदत होते. ही आसने तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य पद्धतीने करायला हवीत. आसनांचा कालावधी हळूहळू वाढवला तर त्याचा निश्चितच फायदा होतो.
१. पवनमुक्तासन:
पोटातील वायू दूर करण्यासाठी पवनमुक्तासन अत्यंत उपयुक्त आहे. हे आसन जेवणापूर्वी 20 मिनिटे नियमित केल्याने गॅसेसची समस्या कमी होते आणि पचनक्रिया सुधारते.
२. वज्रासन:
जेवणानंतर 3-5 मिनिटे वज्रासनात बसल्याने पचन सुधारते. हे एकमेव आसन आहे जे जेवणानंतर लगेच करायला हरकत नाही.
३. भुजंगासन आणि धनुरासन:
या आसनांमुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रिया चांगली राहते.
४. प्राणायाम:
दीर्घ श्वास घेणारे प्राणायाम की अनुलोम-विलोम , उदरिय श्वसन हे पचनसंस्था सुधारण्यासाठी आणि पोटातील गॅसेस दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तणाव कमी करण्यासाठीही ध्यानाचे प्रकार फायदेशीर ठरतात.