पोटाचं किंवा पचनाचं कार्य सुरळीत असेल तर आपल्या आरोग्याचे बहुतांश प्रश्न सुटतात. पण पचनक्रिया सुरळीत नसेल तर मात्र आरोग्यावर त्याचे बरेच परीणाम झालेले पाहायला मिळतात. झोपेच्या वेळा चुकल्या, खाण्याच्या वेळा चुकल्या, खाण्यात काही बदल झाले की ॲसिडीटी आणि पोट बिघडण्याची समस्या हमखास उद्भवते. एकदा ॲसिडीटी झाली की डोकं दुखणे, अस्वस्थ होणे, मळमळ किंवा छातीत जळजळ होणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात (Easy Home Remedy for hyperacidity with effective ayurvedic remedy) .
ॲसिडीटीमुळे येणारा अस्वस्थपणा इतका जास्त असतो की काहीच सुधरत नाही. मग आपण एकतर मेडीकलमध्ये जाऊन ॲसिडीटीची औषधं घेतो नाहीतर डॉक्टरांकडे जातो. पण अशा औषधांनी यावर तात्पुरता उपाय होतो. मात्र त्यामुळे ॲसिडीटीची मूळ समस्या दूर होत नाही. मग ही ॲसिडीटी कमी होण्यासाठी प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री १ सोपा उपाय सांगतात. घरच्या घरी हा उपाय करता येत असून नैसर्गिक असल्याने त्यापासून कोणताही त्रास उद्भवत नाही. हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया...
घरच्या घरी औषध बनवण्याची कृती
१. आयुर्वेदीक दुकानात मिळणारी हरडे पावडर ५० ग्रॅम घ्यायची.
२. ५० ग्रॅम काळे मनुके आणि ही पावडर एकत्र कुटायची मग त्याचे च्यवनप्राशसारखे मिश्रण तयार होते.
३. मग या ओलसर अशा मिश्रणात १०० ग्रॅम चौकोनी खडीसाखरेची पूड घालायची.
४. हे तिन्ही घटक एकत्र केले की ते चिकट होतील त्याच्या लहान आकाराच्या गोळ्या तयार करायच्या.
५. या गोळ्या हवाबंद डब्यात ठेवायच्या आणि रिकाम्या पोटी सकाळ संध्याकाळ २ -२ गोळ्या खायच्या.
६. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यास आम्लपित्ता किंवा ॲसिडीटीची समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होईल.