सध्या प्रत्येकाकडून मोबाईल फोन, टिव्ही आणि लॅपटॉपचा अतिवापर होत आहे. लॅपटॉप आणि मोबाईलशिवाय दिवसाची सुरुवात होतंच नाही. या कारणामुळे डोळ्यांचे मोठे नुकसान होते. प्रत्येकाचे स्क्रीन टायमिंग वाढले आहे. स्क्रीन निळ्या किरणांना जन्म देते जे त्वचा आणि डोळे या दोघांसाठी हानिकारक ठरतात. यामुळे डोळे थकल्यासारखे दिसू लागतात, डोळे लाल होतात, जळजळ होते, यासह दृष्टी देखील कमी होत जाते. जर आपल्याला देखील अशा समस्या जाणवू लागल्या, तर काही घरगुती उपायांचा वापर करून ही समस्या सोडवू शकता.
थंड पाणी/बर्फ
एका सुती कपड्यात बर्फ घ्या. हे बर्फ डोळ्यांवर ठेवून चांगला शेक द्या. ५ ते १० मिनिटे डोळ्यांना शेक दिल्यानंतर डोळे थोड्यावेळ बंद ठेवा. अशाने डोळ्यांवरील सूज आणि थकवा नाहीसा होईल.
काकडी
डोळ्यांसाठी काकडी खूप किफायतशीर आहे. काकडीचा उपयोग आपण डोळ्यांच्या नसांमधील रक्त पुरवठा सुरळीत करण्यासाठी वापरू शकतो. यासाठी मध्यम आकाराचे काकडीचे काप करा. त्या काकडीच्या कापांना २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर डोळ्यांवर ठेवा. अशाने डोळे चांगले टवटवीत होतील आणि आराम देखील मिळेल.
गुलाबजल
दिवसभर लॅपटॉपवर काम केल्यानंतर डोळ्यात जळजळ किंवा खाज येऊ शकते. यासाठी आपण गुलाबजल वापरू शकता. कॉटन बॉल घेऊन त्यावर गुलाबपाणी टाकून काही वेळ डोळ्यांवर ठेवा. अशाने डोळ्यांना आराम मिळेल.
या गोष्टी लक्षात ठेवाः
- डोळ्यांसोबतच शरीर निरोगी ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे, असे केल्याने डोळे कोरडे आणि खाज सुटण्यापासून आराम मिळेल.
- डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात सर्व व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश करा. आपण जे अन्न खात आहात ते पोषक तत्वांनी परिपूर्ण असल्याची खात्री करा.
- शरीराला पुरेशी झोप देखील महत्त्वाची आहे. झोप पूर्ण झाली तर डोळ्यांना आराम मिळतो.