Join us  

डोळ्यांची आग होतेय, जळजळ वाढली? ५ उपाय देतील डोळ्यांना थंडावा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 3:07 PM

Eyes itching Red Eyes डोळे हा नाजूक अवयव आहे, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच उपाय करायला हवे. मात्र गार पाण्यानं डोळे धुणे, स्क्रीन टाइम कमी करणे हे तर आपल्या हातात आहेतच..

दिवाळी सुरु झाली तर थंडी जाणवायला सुरुवात होते. मात्र, ऋतूबदलाचा अनेकांना त्रास होतो. त्वचा रुक्ष आणि कोरडी पडते. ओठांसह टाचादेखील फुटतात. या काळात काही जणांच्या डोळ्यांची आग होते. काहींचे डोळे येतात. जळजळ वाढते.  फटाक्यांच्या धुरामुळे डोळ्यांची आग होते. डोळ्यांचे हे त्रास कमी करायचे तर काही उपाय करुन पहा. मात्र डोळे हा नाजूक अवयव आहे, डॉक्टरांचा सल्ला घेणेच उत्तम. प्रयोग करणं टाळाच.

डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवा

सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात किंवा मग मध्ये पाणी भरून घ्या. त्यानंतर तोंडात पाणी घ्या. पाणी गिळायचे नसून ते तोंडातच ठेवायचे आहे. नंतर भांड्याच्या पाण्यात बुडवून तुमचा डावा डोळा उघडा आणि बंद करा. या दरम्यान तुम्हाला तुमचा श्वास रोखून धरावा लागेल. ५ ते ७ वेळा पाण्याखाली पापण्या उघडल्यानंतर आणि बंद केल्यानंतर, तोंडातून पाणी सोडा आणि श्वास घ्या. आता पुन्हा तोंडात पाणी भरा आणि यावेळी उजव्या बाजूच्या डोळ्याने ही प्रक्रिया करा. या प्रक्रियेचे एका वेळी दोन ते तीन सेट करा. तुम्हाला हे दररोज करावे लागेल. यामुळे डोळ्यातील घाण निघून जाते. कूलिंग इफेक्टमुळे डोळे हायड्रेटेड होतात आणि जळजळ शांत होते. हे डोळ्यांसाठी वॉटर थेरपीसारखे कार्य करते आणि दृष्टी स्वच्छ ठेवण्यास मदत करते.

डोळ्यावर ओल्या कपड्याच्या घड्या

डोळे स्वच्छ आणि थंड करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे टॉवेल किंवा रुमाल थंडगार पाण्यात भिजवणे आणि ते पिळून घेणे. आता या रुमालाने डोळे स्वच्छ करावे आणि पापण्यांवर ठेवावे हा रुमाल साधारणतः ५ ते १० मिनिटे डोळे बंद करून ठेवावे. ही प्रक्रिया दिवसातून दोनदा करा. आवश्यक असल्यास आपण ते अधिक वेळा देखील करू शकता. याने तुमच्या डोळ्यांना थंडावा मिळेल.

तळव्यांना तेल मालिश

रोज रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर तेलाची मालिश करा. मालिश करताना फक्त मोहरीचे तेल वापरा. झोपण्यापूर्वी नाभीमध्ये मोहरीचे तेल लावा. मोहरीच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. मालिश केल्याने डोळ्यांना देखील आराम मिळेल.

आवळा खा

रोज एक कच्चा आवळा खा किंवा आवळ्याचा मुरंबा रोज सकाळी जरूर खा. आवळ्यात अनेक गुणधर्म आहेत. जे तुमचे डोळे टवटवीत ठेवण्यास मदत करेल.

स्क्रीन ब्रेक

टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपची स्क्रीन बराच वेळ पाहत असताना, मध्येच ब्रेक घ्या आणि डोळे मिचकावत रहा. जेणेकरून डोळ्यांची हालचाल होईल, ताण कमी होईल.

टॅग्स :डोळ्यांची निगाथंडीत त्वचेची काळजीदिवाळी 2022