डोळे लाल होणे हा त्रास अनेकांना होतो. त्यातही जे सदैव स्क्रीन डोळ्यासमोर घेऊन बसतात त्यांच्या डोळ्यात लाली दिसतेच. डोळ्यांची योग्य स्वच्छता ठेवली तर हा त्रास कमी होतो. परंतु, डोळ्यातील पांढरा भाग जास्त लाल झाला असेल व हा लालसरपणा दिवसेंदिवस वाढतच असेल, तर अशावेळी योग्य काळजी घेणे गरजेचं आहे. डोळ्यांच्या डॉ. निसा अस्लम सांगतात, लाल डोळे पडणे किंवा डोळ्यांचा संसर्ग खूप सामान्य झाले आहे. आज दहापैकी एक रुग्ण डोळ्यांच्या समस्येने त्रस्त आहे. डोळे लाल होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा ही समस्या सामान्य असू शकते, जर वारंवार डोळे लाल होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. आरोग्याच्या निगडित समस्या देखील, आपले डोळे लालसर पडण्याचे कारण बनू शकते.
डोळ्यांचे संसर्ग
आपल्या शरीरातील नाजूक अवयव म्हणजे डोळे. डोळ्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला की डोळे लाल होतात. विषाणू संसर्गामुळे डोळ्यांना इजा पोहोचते. यासह खाज देखील उठते. तर बॅक्टेरियामुळे डोळे लाल तर होतातच यासह पिवळे पाणी देखील येऊ लागते.
ब्लेफेराइटिस
ब्लेफेराइटिस हा डोळ्यांचा आजार आहे. हा आजार बॅक्टेरियामुळे होतो. डोळ्यांना केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्याने डोळे लाल होतात. ज्याने डोळ्यांना सूज देखील येते.
ॲलर्जी
डोळ्यांना कोणत्याही प्रकारची ऍलर्जी झाली की डोळे लाल होतात. काही लोकांना दरवर्षी एकाच वेळी अशा प्रकारची डोळ्यांची समस्या येते, ती हंगामी अँलर्जीमुळे होते. डोळे येतात.
प्रदूषण
काही लोकांचे डोळे प्रदूषणासाठी संवेदनशील असतात. हवेतील धूर आणि विषारी कणांमुळे डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे आणि डोळ्यांना खाज येणे हे सामान्य आहे. अशा स्थितीत आय ड्रॉप्स वापरूनही आराम मिळू शकतो.
डोळे कोरडे पडले तर
डोळ्यांमध्ये पुरेशी आर्द्रता राखणे आवश्यक आहे. अश्रू तुमचे डोळे ओलसर आणि ताजे ठेवण्यास मदत करतात. वृद्ध लोकांना याचा अधिक त्रास होतो.
गंभीर काय?
जर डोळ्यातील लालसरपणा हा एक आठवडा किंवा त्यापेक्षा अधिक दिवस राहिला, तर लवकरच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
डोळ्यांवर अतिरिक्त प्रकाश पडल्यास वेदना जाणवणे.
एक किंवा दोन्ही डोळ्यांना स्पष्ट दिसत नसेल.
डोळ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वेदना जाणवणे. यासारख्या समस्या उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा.