Join us   

फार भीती वाटते कॉपर टी बसवू की नको? डॉक्टर सांगतात, खरेखुरे उत्तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2023 1:34 PM

Advantages and Disadvantages of Copper-T : मुदतीच्या आधी आपल्याला हवी तेव्हा कधीही काढता येते.

डॉ. शिल्पा चिटणीस-जोशी

"अग गेल्या वर्षभरात हा तिसरा गर्भपात करायला आली आहेस तू! मी गेल्यावेळी च तुला बजावलं होतं कॉपर टीसाठी पाळीच्या पाचव्या दिवशी ये म्हणून..का आली नाहीस?"

"मॅडम मला खूप भीती वाटते कॉपर टी ची.!"

"आणि वारंवार गर्भपाताची भीती वाटत नाही?"मी थक्क होऊन विचारले..

या पेशंटसारखी मानसिकता असलेल्या बऱ्याच स्त्रिया आपल्या आजुबाजूला असतात. लग्नानंतर एक मूल होईपर्यंत डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्या हा कुटुंबनियोजनाकरता उत्तम उपाय असतो. हल्ली बहुतेक जोडप्यांना एकच मूल हवे असते. मग गर्भनिरोधक गोळ्या अनिश्चित काळासाठी घेतल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे एका अपत्यानंतर कॉपर टी हाच पर्याय योग्य ठरतो (Advantages and Disadvantages of Copper-T).

कॉपर टी बद्दल बहुतांश महिलांच्या मनात खूप गैरसमज आणि त्यामुळे अनाठायी भीती बसलेली दिसते. मात्र पुरेशी माहिती न घेता त्याबाबत मत बनवणे योग्य नाही. त्यापेक्षा त्याची शास्त्रीय माहिती घेणे केव्हाही जास्त चांगले. कॉपर टी शक्यतो एक मूल असलेल्या महिलेच्या गर्भाशयात पाळीच्या पाचव्या दिवशी बसवली जाते. सध्या तीन, पाच किंवा दहा वर्षे मुदत असलेल्या कॉपर टी उपलब्ध आहेत. पण ती मुदतीच्या आधी आपल्याला हवी तेव्हा कधीही काढता येते.

(Image : Google)

कॉपर टी गर्भाशयात शुक्राणूसाठी प्रतिकूल वातावरण निर्माण करते तसेच गर्भ रुजण्याची प्रक्रिया थांबवते त्यामुळे गर्भधारणा होत नाही. त्याचा कोणत्याही हार्मोन्सशी काही संबंध नसतो. तसेच कॉपर टी मुळे वजन वाढणे किंवा कमी होणे अजिबात शक्य नसते. कॉपर टी मुळे माझं वजन वाढलं किंवा कमी झालं हा स्त्रियांमध्ये असलेला सर्वात मोठा गैरसमज आहे. मात्र तो चुकीचा असून वेळीच दूर करायला हवा. 

कॉपर टीचे फायदे 

१.एका अपत्यानंतर खात्रीशीर,सुरक्षित कुटुंब नियोजनाचा पर्याय.

२.जेव्हा परत प्रेगनन्सी हवी आहे असं वाटेल तेव्हा कॉपर टी लगेच काढून टाकता येते.पुढच्या महिन्यापासून कधीही गर्भधारणा होऊ शकते.

३.नको असलेल्या गर्भधारणेची भीती नसल्यामुळे जोडप्याचे लैंगिक जीवन निकोप राहते.

४.कॉपर टी मुळे कोणत्याही हार्मोन्सवर काही परिणाम नसल्यामुळे चाळिशी पर्यंत सुद्धा ती बसवता येऊ शकते.

कॉपर टीचे तोटे

१.कॉपर टी बसवल्यानंतर सुरवातीचे दोन तीन महिने जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो पण त्यासाठी औषधे देऊन तो नियमित करता येतो.

(Image : Google)

२.मधुमेह, काही प्रकारचे हृदयरोग, संसर्ग होण्याची शक्यता जास्त असलेल्या स्त्रियांमध्ये कॉपर टी बसवता येत नाही.

३.कॉपर टी ची नियमित तपासणी (दर सहा महिन्यांनी) आवश्यक असते.तसेच योनीमार्ग आणि गर्भाशयाच्या मुखावर संसर्ग किंवा जखम असल्यास त्याकडे लक्ष ठेवून वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक ठरते.

(लेखिका स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ज्ञ आहेत.)

shilpachitnisjoshi@gmail.com

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीपरिवार