अनन्या भारद्वाज
नैसर्गिक आपत्ती, युद्धं, विस्थापन, गृहयुध्द यासाऱ्यात सर्वाधिक होरपळतात त्या महिला आणि लहान मुलं. सर्व प्रकारच्या आपत्तींचा थेट परिणाम त्यांच्या जगण्यावर आणि जगण्याच्या दर्जावरही होतो असं आजवरचा मानवी इतिहास सांगतोच. मग कोरोना महामारीचं हे जागतिक महामारीचं संकट तरी याला कसं अपवाद ठरावं. भारतीय उपखंडात एकीकडे बालविवाह, मुलींची शाळागळती, महिलांचे आरोग्य, घरगुती हिंसा आणि मारझोड यासह कामाचा अतिरिक्त बोजा हे सारं महिलांच्या वाट्याला कोरोनाकाळात आलं. दुसरीकडे प्रगत देशातही कोरोनाकाळात मूलं संगोपनाचा प्रश्न असल्यानं अमेरिका आणि कॅनडासह युरोपातल्या अनेक देशात महिलांना नोकरी सोडून घरी बसावं लागल्याची आकडेवारी अलीकडेच प्रसिध्द झाली आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडच्या अंदाजानुसार जगभरात ४ कोटी ७० लाखांहून अधिक महिलांना कोरोनाकाळात साधी गर्भनिरोधक साधनंही मिळू शकलेली नाही. बाकी त्यांच्या सर्वंगिण आरोग्याचे तर अनेक प्रश्न याकाळात दुर्लक्षित राहिले. ७० लाख महिलांना तर याकाळात प्रसूतीसमयी वैद्यकिय सेवा अथवा मदतही मिळू शकलेली नाही. त्याचंच एक भयंकर चित्र सध्या फिलिपिन्स या देशात पहायला मिळतं आहे. दवाखान्यात एकेका पलंगावर तीन-तीन गर्भार महिला सलाइन लावून आकसून झोपल्या आहेत अशी छायाचित्र नुकतीच प्रसिध्द झाली आहे.
गर्भारपणासह अपत्यप्राप्ती, बाळासह स्वत:च्या जीवाला असलेले धोके, गर्भनिरोधक साधनं न मिळणं ते गर्भपात करण्याची संधीच नसणं इतपर्यंतची चक्र कोरोना लॉकडाऊनच्या काळात सुरु झाली आहे. मार्चमध्ये फिलीपिन्सने कोरोनाला अटकाव म्हणून कठोर लॉकडाऊन जाहीर केला. घरातून किती व्यक्ती बाहेर पडतील, किती अंतर दूर जाऊ शकतील यावरही निर्बंध होते. आणि आता फिलिपिन्सनेच प्रसिध्द केलेले अभ्यास सांगतात की पुढच्या वर्षात फिलिपिन्समध्ये २,१४, ४०० अतिरिक्त मुलं जन्माला येण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊन काळात गरोदर राहिलेल्या मातांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, गरोदर माता दवाखान्यात जाऊ शकत नाहीत आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहचणंही अशक्य झालेलं आहे. या मातांना, गर्भासह नवजात बालकाच्याही जीवाला त्यातून गंभीर धोका आहे. स्थानिक दवाखानेही याकाळातल्या गरोदरपणाची नोंद ‘कोरोनाव्हायरस बेबी बूम’ म्हणून करत आहेत.
फिलिपिन्सच्या लोकसंख्येची घनता ही दक्षिण आशियाई देशात जास्त आहेत. कुटुंब नियोजन, जन्मदर रोखणं यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात १९६० सालापासूनच सुरु केली. मात्र अद्यापही त्यांना अपेक्षित नियंत्रण साधलेले नाही. १९६० मध्ये फिलिपिन्सची लोकसंख्या ३ कोटी ५० लाख इतकी होती. २०२० मध्ये ती १, १० लाखांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनाकाळातल्या लॉकडाऊनने मात्र देशानं केलेली कुटुंब नियोजन प्रगती मातीमोल ठरवली असून गेल्या २० वर्षांतला उच्चांकी जन्मदर २०२१ मध्ये पहायला मिळेल असा युनिव्हर्सिटी ऑफ द फिलिपिन्स पॉप्युलेशन इन्स्टिट्यूट यांचा अंदाज आहे.
स्टेला अलीपून नावाची एक फिलिपिनो नर्स अल जझिरा नावाच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगते. सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. सार्वजनिक वाहन व्यवस्था रातोरात बंद करण्यात आली. पोलीसांनी बॅरीकेड लावून शहरांच्या सीमा रोखल्या. कोरोनासाठी ते आवश्यक असेलही पण मग गरोदर मातांना औषधं गोळ्या, गर्भनिरोेधक साधनं महिलांना देणाऱ्या योजना, सकस आहार हे आम्ही कसं पुरवणार होतो, लोक दवाखान्यातही येऊ शकत नव्हते कारण साधनं नाहीत, आणि कोरोनाचा धोका. अनेक बायकांनी मला फेसबूकवर शोधून काढत मेसेज केले की, आम्हाला गर्भनिरोधक साधनं मिळतील अशी तरी काही सोय करा. पण सगळ्यांपर्यंत आम्ही ती ही पोहचवू शकलो नाहीत.’ अलीपून सारख्या अनेक नर्सेसनी मग हायवेवर उभं राहून गर्भनिरोधक गोळ्या, कंडोम दिले. काहींनी तर स्थानिक किराणा दुकानदारांना ही साधनं ठेवण्याची गळ घातली. मात्र फिलिपिनो अभ्यासच म्हणतात की लाॅकडाऊन काळात देशातल्या किमान ५० लाख महिलांरपर्यंत कोणतीही गर्भनिरोधक साधनं पोहोचवायला सरकार अक्षम ठरले. हे सगळं एकीकडे आणि या देशात चर्चचा गर्भपाताला विरोध आहे. अनेकजण चर्चचा प्रभाव म्हणूनही गर्भपात करत नाहीत. ८ ते १० मुलं असण्याचं प्रमाण फिलिपिन्सच्या ग्रामीण भागात आजही कायम आहे. बीबीसीला मुलाखत देणारी ४१ वर्षीय राेवेली झबाला या लॉकडाऊन काळात पुन्हा गर्भवती झाली आणि आता तिचं दहावं मुलं जन्माला येणार आहे. रोवेली म्हणजे की माझं सातवं मुलं जन्माला येईपर्यंत मी कुटुंब नियोजन हा शब्दही ऐकला नव्हता. केवळ कोरोना लॉकडाऊनच नाही तर गरीबी, माहितीचा अभाव यातूनही लोकसंख्येचा स्फोट या देशात होतो आहे.
१४ व्या वर्षी गरोदरपण..
कोरोना बेबी बूमच्या बळी ठरल्या आहेत, मुख्यत्वे किशोरवयीन मुली. वय वर्षे १४ ते १९ या वयातल्या अनेक मुली गरोदर आहेत. त्यांच्यापर्यंत गर्भनिरोधक साधनं पोहोचली नाहीतच पण आपण गरदोर आहोत हे कळल्यावर त्यांना गर्भपाताचाही पर्याय नव्हता. कुटुंबाला सांगणं आणि त्यातून गृहकलह हे सारं झालंच. मात्र आता आपली प्रसूती सुखरुप होईल का, आपल्याला दवाखान्यात प्रसूती करता येईल का, बाळ आणि आपण वाचू का याची धास्ती या मुलींना पोखरते आहे.