अनन्या भारद्वाज
नैसर्गिक आपत्ती, युद्धं, विस्थापन, गृहयुध्द यासाऱ्यात सर्वाधिक होरपळतात त्या महिला आणि लहान मुलं. सर्व प्रकारच्या आपत्तींचा थेट परिणाम त्यांच्या जगण्यावर आणि जगण्याच्या दर्जावरही होतो असं आजवरचा मानवी इतिहास सांगतोच. मग कोरोना महामारीचं हे जागतिक महामारीचं संकट तरी याला कसं अपवाद ठरावं. भारतीय उपखंडात एकीकडे बालविवाह, मुलींची शाळागळती, महिलांचे आरोग्य, घरगुती हिंसा आणि मारझोड यासह कामाचा अतिरिक्त बोजा हे सारं महिलांच्या वाट्याला कोरोनाकाळात आलं. दुसरीकडे प्रगत देशातही कोरोनाकाळात मूलं संगोपनाचा प्रश्न असल्यानं अमेरिका आणि कॅनडासह युरोपातल्या अनेक देशात महिलांना नोकरी सोडून घरी बसावं लागल्याची आकडेवारी अलीकडेच प्रसिध्द झाली आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडच्या अंदाजानुसार जगभरात ४ कोटी ७० लाखांहून अधिक महिलांना कोरोनाकाळात साधी गर्भनिरोधक साधनंही मिळू शकलेली नाही. बाकी त्यांच्या सर्वंगिण आरोग्याचे तर अनेक प्रश्न याकाळात दुर्लक्षित राहिले. ७० लाख महिलांना तर याकाळात प्रसूतीसमयी वैद्यकिय सेवा अथवा मदतही मिळू शकलेली नाही. त्याचंच एक भयंकर चित्र सध्या फिलिपिन्स या देशात पहायला मिळतं आहे. दवाखान्यात एकेका पलंगावर तीन-तीन गर्भार महिला सलाइन लावून आकसून झोपल्या आहेत अशी छायाचित्र नुकतीच प्रसिध्द झाली आहे.
गर्भारपणासह अपत्यप्राप्ती, बाळासह स्वत:च्या जीवाला असलेले धोके, गर्भनिरोधक साधनं न मिळणं ते गर्भपात करण्याची संधीच नसणं इतपर्यंतची चक्र कोरोना लॉकडाऊनच्या काळात सुरु झाली आहे. मार्चमध्ये फिलीपिन्सने कोरोनाला अटकाव म्हणून कठोर लॉकडाऊन जाहीर केला. घरातून किती व्यक्ती बाहेर पडतील, किती अंतर दूर जाऊ शकतील यावरही निर्बंध होते. आणि आता फिलिपिन्सनेच प्रसिध्द केलेले अभ्यास सांगतात की पुढच्या वर्षात फिलिपिन्समध्ये २,१४, ४०० अतिरिक्त मुलं जन्माला येण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊन काळात गरोदर राहिलेल्या मातांना पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत, गरोदर माता दवाखान्यात जाऊ शकत नाहीत आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था त्यांच्यापर्यंत पोहचणंही अशक्य झालेलं आहे. या मातांना, गर्भासह नवजात बालकाच्याही जीवाला त्यातून गंभीर धोका आहे. स्थानिक दवाखानेही याकाळातल्या गरोदरपणाची नोंद ‘कोरोनाव्हायरस बेबी बूम’ म्हणून करत आहेत.
१४ व्या वर्षी गरोदरपण..
कोरोना बेबी बूमच्या बळी ठरल्या आहेत, मुख्यत्वे किशोरवयीन मुली. वय वर्षे १४ ते १९ या वयातल्या अनेक मुली गरोदर आहेत. त्यांच्यापर्यंत गर्भनिरोधक साधनं पोहोचली नाहीतच पण आपण गरदोर आहोत हे कळल्यावर त्यांना गर्भपाताचाही पर्याय नव्हता. कुटुंबाला सांगणं आणि त्यातून गृहकलह हे सारं झालंच. मात्र आता आपली प्रसूती सुखरुप होईल का, आपल्याला दवाखान्यात प्रसूती करता येईल का, बाळ आणि आपण वाचू का याची धास्ती या मुलींना पोखरते आहे.