Join us   

गर्भनिरोधकांचे अनेक प्रकार असतात, मात्र आपल्या वयाप्रमाणे गर्भनिरोधक साधनांची निवड कशी कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 2:37 PM

आज गर्भनिरोधकांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जोडप्याला जे सोयीचं वाटतं ते निवडता येऊ शकतं. स्त्रियांना कदाचित वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर, त्या त्या वयाच्या गरजांनुसार निरनिराळी गर्भनिरोधक वापरावी लागू शकतात.

ठळक मुद्दे गर्भ धारणा होऊ नये यासाठी इंट्रायूट्रिन डिव्हाइस आणि हार्मोनल उपचारांचा समावेश असतो.गर्भनिरोधक गोळ्या हा गर्भधारणा रोखण्याचा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे.जर भविष्यात मूल नको असेल तर ते जोडपं शस्त्रक्रिया करुन गर्भधारणा होऊ नये यासाठीची कायमची तरतूद केली जाते.

जोडप्यांच्या गरजांनुसार अनेक प्रकारचे गर्भनिरोधक आज उपलब्ध आहेत. काही गर्भनिरोधक तात्पुरते काम करणारे असतात तर काही कायमस्वरूपी. रिव्हर्सिबल किंवा अशी उपचार पद्धती जी उलट करता येते ती मुळात गर्भ धारणा होऊ नये यासाठी अडथळा म्हणून काम करते. यात इंट्रायूट्रिन डिव्हाइस आणि हार्मोनल उपचारांचा समावेश असतो. गर्भधारणेत अडथळा निर्माण करणाऱ्या पद्धती कोणत्या? गर्भधारणेत अडथळा निर्माण करणं म्हणजे शुक्राणू (स्पर्म) बीजांडापर्यंत पोचू न देणं. कंडोम हे गर्भनिरोधकाचं उत्तम उदाहरण आहे. या गर्भनिरोधकामुळे गर्भधारणा तर रोखली जातेच पण लैंगिक आजारांच्या संसर्गापासूनही सुरक्षा मिळते.तरुण जोडप्यांमधे ही गर्भनिरोधकं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.

इंट्रायूट्रिन डिव्हाइस  हे अगदी छोटं उपकरण गर्भाशयापाशी आत प्रशिक्षित वैद्यकीय व्यक्तीद्वारे घातलं जातं. या उपकरणामुळे गर्भाशयात बीजांड फलित होण्याची प्रक्रियाच होत नाही. तिथे अडथळा निर्माण होतो. ज्या महिलांना दोन बाळंतपणात काही वर्षांचं अंतर हवंय अशांसाठी हे उपकरण अतिशय उपयुक्त आहे. यालाच कॉपर टी असंही म्हटलं जातं. किंवा हार्मोन्स समाविष्ट केलेलं डिव्हाइसही वापरता येतं. एकदा आतमधे हे उपकरण बसवल्यावर कितीतरी वर्ष वापरता येतं. मूल हवं, चान्स घेऊया हे एकदा जोडप्यात निश्चित झालं की हे उपकरण काढून टाकता येतं जेणेकरून गर्भधारणेचा मार्ग मोकळा होतो.

हार्मोन्स असलेली गर्भनिरोधकं बीज फलित होऊन शुक्राणूंच्या मीलनासाठी बाहेर पडण्याची प्रक्रियाच या गर्भनिरोधक प्रकारानं रोखली जाते. गर्भनिरोधक गोळ्या हे सगळ्यात प्रसिद्ध साधन आहे. अर्थात या गोळ्यांभोवती अनेक समज गैरसमज आहेत. पण खरंतर हा गर्भधारणा रोखण्याचा सगळ्यात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. या गोळ्यांचे इतरही अनेक फायदे आहेत. उदा. मासिक पाळी नियमित येणं, मासिक पाळीच्या वेळी होणारी वेदनांपासून मुक्तता, पीसीओएसमध्येही उपयोगी पडतात. हार्मोनल पद्धती तोंडावाटे न घेण्याचेही इनेजक्शन्स आणि उपकरण हे त्यांचे इतर काही प्रकार आहेत.

उलट होऊ शकणारी दीघकालीन गर्भनिरोधकं या पद्धती परिणामकारक तर आहेतच पण गोळीप्रमाणे रोजच्या रोज लक्षात ठेवून घेण्याचा ताण यात नाही. यात कॉपर टी आणि हार्मोनल इंट्रायूट्रिन डिवाइस दर तीन महिन्यांनी घ्यायचं इंजेक्शन, त्वचेच्या खाली इम्प्लांट करायच्या गोष्टी यांचा समावेश होतो. गर्भधारणेचा निर्णय झाला की डिव्हाइस, इंप्लांट काढून टाकता येतं.

इमर्जन्सी गर्भनिरोधक कुठलीही काळजी न घेता शारीरिक संबंध आल्यावर आणि गर्भधारणा नको असेल तर घेतल्या जाणारी गोळीला इमर्जन्सी कॉंट्रासेप्शन म्हटलं जातं. पण बऱ्याचदा या गोळीचा दुरुपयोग केला जातो. कुठल्याही सुरक्षेशिवाय झालेल्या संभोगानंतर ७२ तासांच्या आत ही गोळी घेणं गरजेचं असतं. म्हणजे मग गर्भधारणेची शक्यता नाहीशी होते. त्यामुळे अनेकदा सुरक्षित शरीर संबंधांना महत्व न देता इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी घेण्याकडे कल असतो. पण या गोळ्या जर दीर्घकाळ घेतल्या गेल्या तर त्यांचे अनेक दुष्परिणाम शरीरावर होतात. त्याचप्रमाणे ७२ तासांनंतर ही गोळी घेतली तर त्याचा काहीही उपयोग होत नाही.

कायमस्वरूपी पद्धती स्टर्लायझेशन 

जर भविष्यात मूल नको असेल तर ते जोडपं ही पद्धत अवलंबू शकतं. शस्त्रक्रिया करुन गर्भधारणा होऊ नये यासाठीची कायमची तरतूद केली जाते. त्यामुळे एकदा ही पद्धत अवलंबली की पुन्हा गर्भधारणा होऊ शकत नाही. स्त्री आणि पुरुष दोघांचीही शस्त्रक्रिया होऊ शकते. स्त्रियांच्या अंडनलिकेची होते तर पुरुषांमध्ये व्हॅसेक्टमी केली जाते. आज गर्भनिरोधकांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जोडप्याला जे सोयीचं वाटतं ते निवडता येऊ शकतं. स्त्रियांना कदाचित वयाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर, त्या त्या वयाच्या गरजांनुसार निरनिराळी गर्भनिरोधक वापरावी लागू शकतात. त्याचप्रमाणे जे पद्धत तरुण वयातल्या स्त्रीसाठी उपयुक्त असते ती रजोनिवृत्तीला आलेल्या स्त्रीसाठी उपयुक्त असतेच असं नाही. प्रत्येक व्यक्तीचं शरीर निराळं आहे. त्यामुळे जे एकाच्या शरीरासाठी चालेल ते दुसऱ्याच्या शरीरासाठी चालेलच असं नाही. त्यामुळे कुठलंही गर्भनिरोधक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय परस्पर वापरू नये. कारण डॉक्टरांशी बोलल्यामुळे प्रत्येक पद्धतीचे फायदे तोटे समजू शकतात. प्रजनन अवयवांचे आणि लैंगिक अवयवांचे आरोग्य हे कुठल्याही स्त्रीचे मूलभूत अधिकार आहेत. त्यामुळे याविषयी महिलांना पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे.

विशेष आभार: डॉ. अनाहिता चौहान

(MD DGO DFP FICOG)