Lokmat Sakhi >Health >Family Planning > गर्भनिरोधक साधनांबद्दलची भीती, गैरसमज यामुळे स्त्रिया आजही नाकारतात निवड स्वातंत्र्य !

गर्भनिरोधक साधनांबद्दलची भीती, गैरसमज यामुळे स्त्रिया आजही नाकारतात निवड स्वातंत्र्य !

गर्भनिरोधन ही समस्या नसून, उलट  स्त्रीमुक्तीचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःच्या शरीरात गर्भ तयार होऊ द्यायचा की नाही याचे पूर्ण नियंत्रण याद्वारे स्त्रीच्या हातात येते, असा सकारात्मक दृष्टीकोन समाजात रुजवायला हवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 05:17 PM2021-05-24T17:17:30+5:302021-05-24T17:22:33+5:30

गर्भनिरोधन ही समस्या नसून, उलट  स्त्रीमुक्तीचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःच्या शरीरात गर्भ तयार होऊ द्यायचा की नाही याचे पूर्ण नियंत्रण याद्वारे स्त्रीच्या हातात येते, असा सकारात्मक दृष्टीकोन समाजात रुजवायला हवा.

Fear of contraceptives, misconceptions still deny women freedom of choice, unwanted pregnancy. | गर्भनिरोधक साधनांबद्दलची भीती, गैरसमज यामुळे स्त्रिया आजही नाकारतात निवड स्वातंत्र्य !

गर्भनिरोधक साधनांबद्दलची भीती, गैरसमज यामुळे स्त्रिया आजही नाकारतात निवड स्वातंत्र्य !

Highlightsज्यांना कायमचेच मूल नको आहे, त्यांच्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया हा पर्याय चांगला आहे. यातही आपल्याकडे पुरुष नसबंदीबद्दल खूप गैरसमज आढळतात, जे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहेत.

डॉ. ऐश्वर्या रेवडकर

नको असलेल्या गर्भधारणेमुळे काय परिस्थिती उद्भवते आणि स्त्री आरोग्यावर त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे आपण याच मालिकेतल्या पहिल्या लेखात पाहिले. ज्यावेळी स्त्रीला स्वतःला माहिती आहे की मला सध्या गर्भ नको आहे, तेव्हा गर्भ निरोधक साधने वापरणे हे तिच्या स्वतःच्याच हिताचे आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून जेव्हा आम्ही जोडप्यांना हे मार्गदर्शन करतो तेव्हा कित्येकांना ते आवडत नाही. ते याकडे नकारात्मक वृत्तीने पाहतात. फेसबुक वर सुद्धा मी काही पोस्ट पाहिल्या, ज्यामध्ये मुलींनी लिहिले होते की कोणी गर्भपातासाठी रुग्णालयात गेले, तर त्या व्यक्तीला गर्भनिरोधनाची सक्तीने माहिती दिली जाते. कुठेतरी समाजामध्ये याकडे पाहण्याची नकारात्मक मानसिकता आहे. ती बदलायला हवी. 
गर्भनिरोधन ही समस्या नसून, उलट हे स्त्रीमुक्तीचे उत्तम उदाहरण आहे. स्वतःच्या शरीरात गर्भ तयार होऊ द्यायचा की नाही याचे पूर्ण नियंत्रण याद्वारे स्त्रीच्या हातात येते, असा सकारात्मक दृष्टीकोन आपण समाजात रुजवायला हवा. प्रत्येक स्त्रीने सुद्धा हे समजून घ्यायला हवे की गर्भनिरोधन स्त्रीला निवडीचे स्वातंत्र्य देते. तसेच नको असलेल्या गर्भधारणेमुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही आपसूकच टाळले जातात.

शासनाने गर्भनिरोधक साधनांच्या प्रचार व प्रसारासाठी अनेक आरोग्य कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन जबाबदारी सोपवली आहे. विविध साधने शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहेत. परंतु अजूनही विविध साधनांबद्दलची भीती, गैरसमज यामुळे स्त्रिया सरळ ती नाकारतात. याबद्दल समजात जनजागृती व्हायला हवी. बऱ्याचदा ती स्त्री स्वतः साधन वापरायला तयार असते, तर तिची सासू किंवा नवरा तिच्यावर दबाव आणून तिला ते साधन वापरू देत नाही. सहज उपलब्ध असणारी साधने म्हणजे, कंडोम,
गर्भनिरोधक गोळ्या, तांबी, अंतरा इंजेक्शन, आणि कायमचेच मूल नको असेल तर नसबंदीची शस्त्रक्रिया, जी पुरुष आणि स्त्री दोघांची होते.
कंडोमबद्दल आपण मागच्या लेखात वाचले. तांबी ही स्त्रीच्या गर्भाशयात बसवली जाते. याचे बरेच प्रकार उपलब्ध आहेत, स्त्रीच्या गरजेनुसार तिला सोयीस्कर होईल अशी तांबी आपण सुलभरीत्या ५-१० मिनिटात, कोणत्याही त्रासाशिवाय बसवू शकतो. जेव्हा मूल हवे असेल, तेव्हा २ सेकंदात ही सहजरीत्या काढून घेता येते, त्यांनतर स्त्रीला मूल राहण्यात काही अडचण येत नाही. लग्नानंतर लगेच मूल नको असेल तर , किंवा एक मूल झाल्यांनतर, तसेच सोबत राहणाऱ्या जोडप्यांसाठी तांबी खूप उपयुक्त ठरते. गर्भनिरोधक गोळीसारखे रोज लक्षात ठेवून गोळी खायची गरज नाही किंवा उलटी, मळमळ असे शरीरावर दुष्परिणामही नाहीत. काहींना पोटात
दुखणे किंवा पाळीत रक्त जास्त जाणे असा त्रास होऊ शकतो जो औषधे घेऊन, किंवा ३-४ पाळीनंतर आपोआप ठीक होऊन जातो. डिलिव्हरीनंतरही तत्काळ बसवता येऊ शकणारी तांबी सध्या शासकीय रुग्णालयात बरीच लोकप्रिय झाली आहे. ज्या स्त्रियांना पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव होतो, त्यांसाठी प्रोजेस्टेरोन हॉर्मोनल तांबी उपलब्ध आहे, ज्याने त्यांची समस्या दूर होते.
अंतरा इंजेक्शन हे प्रोजेस्टेरोन या होर्मोनचे असते व ते दर तीन महिन्यांनी घ्यावे लागते. त्याचे अनियमित पाळी, किंवा पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव असे दुष्परिणाम दिसून येतात. परंतु दर ३ महिन्यांनी घ्यावे लागत असल्याने स्त्रियांना वारंवार रुग्णालयात यायची गरज भासत नाही.
ज्यांना कायमचेच मूल नको आहे, त्यांच्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया हा पर्याय चांगला आहे. यातही आपल्याकडे पुरुष नसबंदीबद्दल खूप गैरसमज आढळतात, जे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहेत. जसे की त्याने पुरुषांचे लैंगिक सुख कमी होते किंवा ‘पुरुषपण’ कमी होते.
त्यामुळे अगदी क्वचितच पुरुष नसबंदीसाठी तयार होतात. सर्रासपणे स्त्रियांनाच या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागते. आदिवासी भागात मात्र मी पाहिले आहे की अनेक पुरुष नसबंदी करून घेतात. बाकी पुरुषांनीही त्यांच्यापासून हा धडा घेतला पाहिजे.

(मुळच्या महाराष्ट्रातील असलेल्या डॉ. ऐश्वर्या रेवडकर स्त्री रोगतज्ज्ञ असून सध्या छत्तीसगड येथील दुर्गम भागात रुग्णसेवा बजावत आहेत. फेमिनिस्ट, ट्रॅव्हलर, लेखिकाही त्या आहेत. त्यांच्या ‘बिजापूर डायरी’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे.)

Web Title: Fear of contraceptives, misconceptions still deny women freedom of choice, unwanted pregnancy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.