करिअर झालं की नोकरी, मग लग्न आणि लग्न झालं की मूल ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. मुलगा किंवा मुलगी यांचे शिक्षण झाले आणि नोकरी मिळाली की त्यांना ‘लग्न कधी करणार’ आणि लग्न झालं की ‘काय मग आता पुढचे प्लॅन कधी’ असे प्रश्न विचारले जातात. हल्ली करिअरच्या नादात तरुणांमध्ये लग्न करण्याचे वय हे ३० झाले आहे. त्यानंतर एकमेकांसोबत किमान १ ते २ वर्ष वेळ घालवणे आणि मग मूल होऊ देणे हे अगदीच सामान्य आहे. मात्र या सगळ्यामध्ये मुलींचे वय वाढत जाते आणि त्यामुळे गर्भधारणा होण्यात अडचणी येतात.
गर्भधारणा झाल्यानंतर उद्भवणाऱ्या तक्रारी आणि एकूणच बाळाचे आरोग्य या सगळ्याबाबत कमी अधिक प्रमाणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते. गेल्या काही वर्षात अशाप्रकारच्या समस्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रुमा घरोटे यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींबाबत माहिती दिली आहे. त्या गोष्टी कोणत्या आणि त्याचा होणाऱ्या बाळाच्या आणि मातेच्या आरोग्यावर कसा परीणाम होतो हे समजून घेऊया...
१. मूल होऊ देणे हा सर्वस्वी त्या जोडप्याचा प्रश्न असला तरी त्यासाठी फार उशीर करणे योग्य नाही. अन्यथा जोडीदारांपैकी दोघांना किंवा एकाला शुगर, बीपी यांसारख्या जीवनशैलीविषयक समस्या उद्भवू शकतात. कमी वयात, प्रेग्नन्सीमध्ये अशाप्रकारचे त्रास होणे आरोग्यासाठी आणि मानसिकतेसाठीही अजिबात चांगले नसते.
२. तसेच तिशीनंतर मूल होऊ दिल्यास या मुलामध्ये Congenital Anomalies होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजेच मूल अबनॉर्मल असण्याची शक्यता असते. यामध्ये शारीरिक, बौद्धिक व्यंग असू शकतात. साधारणपणे एका महिलेने २५ व्या वर्षी मूल होऊ देण्याचा विचार केला आणि दुसरीने वयाच्या ३५ व्या वर्षी मूल होऊ दिले तर ३५ वर्षाच्या महिलेच्या बाबतीत हे चान्स जवळपास ५० टक्क्यांनी वाढतात.