गर्भधारणा रोखण्यासाठी हार्मोनल गर्भनिरोधक हा एक खात्रीशीर उपाय आहे. हार्मोनल गर्भनिरोधकांमध्ये बरेच प्रकार असतात. जसं की तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या, योनीमार्गात लावायची रिंग, गर्भनिरोधक स्किन पॅचेस, हार्मोन्स सोडणारी गर्भनिरोधक कॉइल्स.
वापरायच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांचा परिणाम एकच असतो. या सगळ्या पद्धतींचा प्रभाव स्त्रीच्या शरीरातील हार्मोन्सवर होतो, आणि अंडाशयातून परिपक्व झालेलं अंडं बाहेर सोडण्याची प्रक्रिया थांबवली जाते. पण हार्मोनल गर्भनिरोधक नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरले पाहिजेत.
हार्मोनल गर्भनिरोधकचे अनेक फायदे आहेत तसेच काही दुष्परिणामही आहेत. १) डोकेदुखी. विशेषतः मायग्रेनचा इतिहास असलेल्या स्त्रियांमध्ये अधिक प्रमाणात दिसते. २) दोन मासिक पाळीच्या मध्ये रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होणं. ३) मळमळ ४) स्तनांचा नाजूकपणा ५) व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन्स अर्थात योनीतील संसर्ग ६) वजनात वाढ ७) मूड स्विन्ग्स ८) काहीवेळा कामवासना कमी होणं वर दिलेले सगळे दुष्परिणाम काही काळासाठीच असतात. काही कालावधीनंतर हे त्रास थांबतात. या शिवाय अतिशय कमी शक्यता ब्लड क्लॉट्सची ( रक्ताची गुठळी ) असते. चाळीशी ओलांडलेल्या स्त्रियांमध्ये हा धोका अधिक आढळतो. शिवाय ज्या स्त्रिया लठ्ठ असतात, धूम्रपान करतात आणि घरात कुणाला रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार असतील तर त्यांनाही हा धोका असू शकतो. गरोदरावस्थेत रक्ताचे गोठणे या आजारापेक्षा ब्लड क्लॉट्सचा धोका कमीच म्हणायचा. हार्मोनल गर्भनिरोधक सर्वसाधारणपणे वापरले जातात. त्या स्त्रीचं आरोग्य, पूर्वीचे आजार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कमीतकमी दुष्परिणाम कशाचे होतील याचा विचार करून डॉक्टर्स इतरही पद्धती सुचवतात.
या परिस्थितीत सुचवल्या जातात इतर पद्धती
* स्तनपान करणारी आई असाल, * ३५ पेक्षा जास्त वयाचे आणि धूम्रपान करणारे असाल, * अति रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठ असाल, * डीप व्हेन थ्रोमोबीसीस किंवा पूलमोनारी एम्बोलिझमचा इतिहास असेल तर, * स्ट्रोक्स आणि दृदयविकार * यकृताचा आजार * स्तनांच्या कर्करोगाचा इतिहास * मायग्रेन * शूच्या जागेतून होणार रक्तस्त्राव * एखादी शस्त्रक्रिया असेल किंवा झाली असेल आणि फिरण्यावर बंधनं असतील, * गोळ्या घेत असताना किंवा गरोदरावस्थेत कावीळ झाली असेल, मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत असेल….
हार्मोनल गर्भनिरोधक मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. आणि डॉक्टर्सही घेण्याचा सल्ला देतात. पण कुठलंही हार्मोनल गर्भनिरोधक घेण्यापूर्वी पूर्व आजारपणाची माहिती डॉक्टरांना देणं अतिशय गरजेचं आहे. जर हार्मोनल गर्भनिरोधक प्रदीर्घ काळासाठी घ्यायच्या असतील तर त्याचे दुष्परिणाम टाळले पाहिजेत. आणि ते तेव्हाच कमी होतील जेव्हा डॉक्टरांना तुमची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री माहित असेल.
विशेष आभार: डॉ. शोभा एन गुडी
(MD. DNB, FICOG)