Join us   

‘तो’ म्हणतो, काही धोका नाही म्हणून असुरक्षित सेक्सनंतर तीनदा ‘आयपील’ घेतली, आता जीवावर बेतलं तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2023 11:14 AM

What happens when you take emergency contraceptive pill? : असुरक्षित सेक्सनंतर झटपट आयपील घेऊन टाकली आणि गरोदर होण्याचा धोकाच संपला इतकं सोपं नसतं मेडिकलमध्ये जाऊन आयपील घेणं, महागात पडूच शकतं.

मी एवढ्यात तिसऱ्यांदा ‘आयपील’ घेतली, ‘तो’ म्हणतो प्रिकॉशनपेक्षा गोळी घेणं बरं. गोळी घेतल्यानं दिवस नाही राहिले पण  सतत अशी इमर्जन्सी पिल घेण्याचा माझ्या तब्येतीवर परिणाम होईल का?

आयपील किंवा इर्मजन्सी पिल म्हणजे काही गर्भनिरोधक साधन नाही वाटेल तेव्हा घ्यायला हेच तरुणींच्या लक्षात येत नाही. असुरक्षित लैंगिक संबंध येऊ नयेत म्हणून अनेक गर्भनिरोधक साधनं उपलब्ध आहेत. कंडोम त्यापैकीच एक. पण गैरसमज, सुख कमी होईल म्हणत पुरुष ते वापरत नाही आणि कुठलीही सुरक्षितता न घेता लैंगिक संबंध आले की तरुणींना आयपील घ्यायला सांगितले जाते.  मैत्रीणीने, मोठ्या बहिणीने किंवा आणखी कोणी सल्ला दिल्याने किंवा इंटरनेटवर याविषयी वाचून ही गोळी सर्रास घेतली जाते. एकदाच नाही तर प्रसंगी २- ३ आणि त्याहून अधिक वेळाही ही आयपील घेण्याचे प्रमाण आहे. मात्र हार्मोन घोळ होण्यापासून पिंपल्स, उलट्या, पचन बिघडणे ते दिवस राहण्यात अडचणी इथपर्यंतचे धोके त्यामुळे निर्माण होऊ शकतात.  (What happens when you take emergency contraceptive pill?)

 प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन सांगतात... 

आय पिल म्हणजे emergency contraceptive pill. या नावावरुनच अर्थ लक्षात येतो की ही आपत्कालीन वापरायची गोळी आहे. आता गर्भनिरोधकात इमर्जन्सी काय? तर ती असते वेळेबाबतची इमर्जन्सी. म्हणजे कुठलेही संरक्षण नसताना शारिरीक संबंध येण्याने गर्भधारणा होण्याची शक्यता-परिणामी भीती. अर्थातच नको असताना, शारिरीक / मानसिक तयारी नसताना गर्भ राहणे ही सामाजिक इमर्जन्सीच असते. एकामागे एक लागोपाठ ३ वेळा अशा प्रकारच्या गोळ्या घेतल्याचे शरीरावर परिणाम होण्याची शक्यता असतेच. गर्भधारणा झाली नाही ही गोष्ट फायद्याची असली तरी तो योगायोग समजावा. 

(Image : Google)

मुळात या गोळ्या होर्मोन्सच्या जास्त मात्रेच्या असतात. त्याकारणानेच गर्भधारणा होत नाही. पण हे हार्मोन्स जास्त मात्रेत घेण्याने शरीरातील त्यांचे संतुलन बिघडते. परिणामी मासिक पाळीचे चक्र बिघडू शकते. अनियमितता, अतिरिक्त रक्तस्त्राव अशा दुष्परिणामांची शक्यता असतेच. शिवाय गर्भधारणा होऊ नये म्हणून या गोळ्या घेतलेल्या असतात तोही अनेकदा अपयशी होतो. कारण काही वेळा गोळ्या घेऊनही गर्भधारणा होण्याची शक्यता असतेच. त्यामुळेच अशा पद्धतीने कोणत्याही गोळ्या घेताना प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्याशिवाय मनाने उपचार करु नयेत. म्हणजे त्याचे भविष्यात होणारे परिणाम भोगावे लागत नाहीत.

 

टॅग्स : आरोग्यप्रेग्नंसीलाइफस्टाइलहेल्थ टिप्स