Join us   

उन्हाळ्यात सहा महिन्यापेक्षा लहान बाळाला पाणी पाजावं का? बाळाला तहान लागत असेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2024 6:59 PM

अनेक मातांना वाटतं की उन्हाळ्यात सहा महिन्यापर्यंतच्या बाळांना तहान लागत असेल तर त्यांना पाणी द्यावं, पण तसं करणं योग्य नाही कारण..

ठळक मुद्दे बाळाला ‘हवे तेव्हा, हवे तेवढे, व हवा तेवढा वेळ’ आईचे दूध पिऊ द्या.

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे), रोगप्रतिबंधक व साथरोग तज्ज्ञ

उन्हाळ्यात सहा महिन्याखालील बाळाला पाणी द्यावं का असा प्रश्न अनेक माता विचारतात. जी बाळे नोव्हेंबर ते जून या कालावधीमध्ये जन्मतात त्यांच्या आयुष्यातील पहिल्या सहा महिन्यातील काही काळ तरी उन्हाळ्याचा असतो. आणि अशावेळी जरी डॉक्टरांनी सांगितले असले की ‘पहिले सहा महिने बाळाला निव्वळ आईचे दूध द्यायचे आहे’ तरी देखील बऱ्याचदा आई किंवा आजीला बाळाला पाणी देण्याचा मोह होतो. विशेषतः जेव्हा उन्हाळा कडक असतो , आपल्याला स्वतःला तहान लागत असते, त्यावेळेला बाळालाही तहान लागली असेल असा विचार करून आई किंवा आजी बाळाला पाणी देतात. पण तसे करावे का?

लक्षात ठेवायला हवे.. १. पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाखेरीस इतर कोणत्याही द्रव अन्नाची गरज नसते हे योग्यच आहे. २. आपण जर बघितलं तर दिवसभर बाळ हे आईचं दूध म्हणजे एक द्रव पदार्थच घेत असतं. आईच्या दुधातून बाळाला आवश्यक असणारे पाणी बाळाला मिळत असतं. ३. बाळाला भूक लागली तरी बाळ आईकडे दूध मागते आणि बाळाला तहान लागली तरी देखील बाळ आईकडे दूध मागते. शक्यता आहे की जेव्हा तापमान जास्त असते आणि घाम येत असतो अशा वेळेला बाळ वारंवार दूध प्यायला मागेल. मग ते भुकेमुळे असेल किंवा तहान लागल्यामुळे असेल. ४. आपण बाळाला पाजताना डिमांड फीडिंग म्हणजे ‘बाळाला हवे तेव्हा, हवे तेवढे, हवा तेवढा वेळ ‘ दूध द्यायचे असते आणि ज्या बाळांना अशाप्रकारे डिमांड फीडिंगने दूध दिले जाते त्या बाळांना अन्नाबरोबर पुरेसे पाणी देखील आईच्या दुधामधूनच मिळते.

५. उन्हाळ्यामध्ये बाळाच्या आईने भरपूर पाणी प्यावे किंवा इतर द्रव पदार्थ घ्यावेत. बाळाला पाजायला सुरू करण्यापूर्वी पाणी घेऊन मग पाजायला सुरुवात करावी. म्हणजे आईच्या दुधातून पुरेसे पाणी बाळापर्यंत पोहोचते. ६. स्तनपानाबाबत हा निर्देश ठरवण्यापूर्वी याविषयी प्रयोग करण्यात आले. गरम हवेच्या देशांमध्ये बाळांना ‘निव्वळ स्तनपान’ आणि ‘स्तनपानासोबत पाणी देणे’ यापैकी कोणता मार्ग योग्य आहे याचे उत्तर शोधणारे हे प्रयोग होते. या प्रयोगांमध्ये असे दिसून आले की बाळांना स्तनपानासोबत पाणी दिले किंवा दिले नाही तरी देखील दोन्ही गटातील बाळांना सारख्या प्रमाणातच लघवी होत होती आणि त्यांना कोणताही त्रासही जाणवत नव्हता. अभ्यासाची लिंक – https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/1678028/

७. पहिल्या पाच ते सहा महिन्यांमध्ये बाळाचे वजन हे त्याच्या जन्मतः वजनाच्या दुप्पट होते. मात्र जेव्हा या छोट्या बाळांना पाणी दिले जाते तेव्हा बाळाच्या पोटात दुधासाठी जागा कमी होते. त्यामुळे बाळ आईचे दूध कमी पिऊ शकते व बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढायला अडचणी येऊ शकतात. तसेच आईचे दूध कमी प्रमाणात प्यायल्याने आईच्या दुधाचे प्रमाण देखील कमी होऊ शकते. तसेच बाळाला दिले जाणारे पाणी जर सुरक्षित नसेल तर बाळाला विनाकारण जुलाबासारखे आजार होऊ शकतात आणि हा आजार लहान बाळांमध्ये गंभीर रूप घेऊन कधी कधी जीवघेणा ठरू शकतो.

८. त्यामुळे उन्हाळा असला, गरमी असली, आपल्याला तहान लागत असली तरी देखील चिंता करू नका. बाळाला ‘हवे तेव्हा, हवे तेवढे, व हवा तेवढा वेळ’ आईचे दूध पिऊ द्या. म्हणजे बाळाची तहानदेखील भागेल. स्तनपान देताना सुरुवातीला येणारे पुढचे दूध (foremilk ) हे तहान भागवणारे असते. ९. सहा महिन्याखालील बाळांना निव्वळ आईचे दूध द्यायचे आहे, वरचे पाणी देण्याची गरज नाही. बाळ दिवसातून किती वेळा सुसू करते यावर लक्ष ठेवा. फिकट पिवळ्या रंगाच्या, सहाहून अधिक वेळा सूसू होत असतील आणि बाळाचे वजन वाढत असेल तर बाळाला दूध पुरत आहे हे आपल्या लक्षात येईल.

(MBBS, MD (Preventive and Social Medicine) , IYCN (BPNI) सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज , जि - सांगली. drprdeshpande2@gmail.com https://askdrpriya.in/

टॅग्स : आरोग्यलहान मुलंजागतिक स्तनपान